-© नयना पिकळे

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ठरलेले दिवस आहेत …..
सकाळ पासून दाही दिशांतून एकाच वेळी देशभक्तीची वेगवेगळी गाणी ऐकू यायला लागतात ….
३/४ गाणी ऐकली की मग मात्र अजीर्ण व्हायला लागतं …..
पण या सर्वात एक गाणं आजही असं आहे जे कितीदाही ऐकलं तरी त्याचा तजेला तसाच्या तसाच राहिला आहे ….
” ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
जो खून गिरा पर्वत पर
वो खून था हिंदुस्तानी
जय हिन्द… जय हिन्द की सेना
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द “
कितीही ठरवलं तरी या प्रत्येक वाक्यानंतर अंगावर रोमांच उठतात …… असं काय वेगळं आहे ह्या गाण्यात ?
अशी कोणती ताकद आहे जिने त्याकाळच्या पंत प्रधानांना, पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील रडवलं ? कुणी बनवलंय हे गाणं ?
हे गाणं जेवढं लोकप्रिय आहे तेवढीच ह्या गाण्याच्या निर्मितीची कथा सुरस आहे …..
ह्या अजरामर गाण्याचे बोल आहेत कवी प्रदीप यांचे आणि संगीतकार आहेत ,
The One and Only “सी रामचंद्र” ….
हो त्यांच्या सारखे फक्त तेच ….

१९६३ सालच्या २६ जानेवारीला, म्हणजेच जवळ जवळ ५८ वर्षांपूर्वी, नुकत्याच संपलेल्या चायना युद्धाच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली द्यायची होती.ह्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ एक गाणं बनवायची जबाबदारी सी रामचंद्र आणि कवी प्रदीप यांच्यावर सोपविण्यात आली. लता, जी एकेकाळी सी रामचंद्रांची गायिकेच्या आवाजासाठी एकमेव चॉइस होती तिच्याशी त्याकाळी त्याचं बिनसल्याने त्यांनी गायिका म्हणून आशा भोसले ला निवडलं होतं . कवी प्रदीप यांनी मात्र गाण्याचं प्रयोजन आणि महत्त्व ओळखून हे गाणं गाण्यासाठी लता ला कसबसं तयार केलं.
मग आशा व लता दोघी हे गाणं गातील असं ठरलं …. पण सी रामचंद्रांनी स्वतः जातीने आशाचं प्रवासचं तिकीट काढलेलं असूनही ऐनवेळी आशा हे गाणं गायला उपस्थित नाही राहिली ….आणि लताने हे गाणं आपल्या दिव्या स्वरात अजरामर केलं .
हे कसं व का झालं ह्याबद्दलचं गूढ अजूनही उकललेलं नाहीये ….. लता , आशा , स्वतः अण्णा ( सी रामचंद्र ) आणि कवी प्रदीप यांची प्रत्येकाची यावर वेगळीच कहाणी आहे . पण आपल्यासारख्या सामान्य गानरसिकांना याने काही फरक पडू नये कारण आपल्याला जे काही मिळालं ते अद्वितीय , अतुलनीय असंच होतं. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून पाहिलं तर कुणालाही हे कबुल करावंच लागेल की ” ऐ मेरे वतन के लोगो ” गाण्याला लताशिवाय पर्यायच नव्हता …….
असं म्हणतात की स्टेज वर लता ” ंऐ मेरे वतन के लोगों” एकटीच गात होती …. नेहरुजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि शेवटी अचानक …..
” जय हिन्द … जय हिन्द की सेना …. जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द” हा नारा चहूकडून ऐकू येऊ लागला तसे सगळेच अचंबित झाले ….
स्टेज वर तर कुणीच दिसत नाही … मग हा आवाज येतोय कुठून ? …..सी रामचंद्रांनी हा खास इफेक्ट निर्माण करण्यासाठी पडद्यामागे कोरस उभा केला होता ….. ह्याची कुणालाही कल्पना नव्हती.
अकल्पित पणे जय हिंद , जय हिंद , असा घोष ऐकून सगळेच रोमांचित झाले …….
तर असे होते अण्णा ( सी रामचंद्र ) – नेहेमीच वेगळं काहीतरी करून स्वतःचा खास ठसा उमटवणारे .
१२ जानेवारी १९१८ साली त्यांचा जन्म आणि ५ जानेवारी १९८२ मध्ये ते आपल्याला सोडून गेले. 

C Ramchandra with Lata Mangeshkar and Kavi Pradeep
C Ramchandra with Lata Mangeshkar and Kavi Pradeep

अहमदनगर येथील पुणतांबे इथे जन्माला आले रामचंद्र नरहर चितळकर. शिक्षणाची त्यांना जेमतेमच आवड होती पण अगदी लहानपणापासूनच सिनेमा , नाच , गाणी याकडे जास्त ओढा …. अनेकदा ह्यासाठी त्यांनी वडिलांचा मारही खाल्ला होता. त्यांची लहानपणची एक मजेशीर आठवण म्हणजे ते लहानपणी दत्तक जाता जाता वाचले ….अण्णांच्या ह्या अशा स्वभावामुळे आणि स्वतःच्या वाढत्या वयामुळे एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना एकीकडे दत्तक द्यायचं ठरवलं होतं … ही गोष्ट ऐकूनच छोटा राम रडवेला झाला. त्याने विचारले दत्तक गेल्यावर माझे आडनाव काय असेल ? वडील म्हणाले , गोसावी …. हे आडनाव ऐकून रामच्या डोळ्यासमोर दाढी मिशी वाढवलेला, जटाधारी , चिमटा घेतलेला , राख फासलेला गोसावी आला आणि त्याने भेदरून वडिलांना मिठीच मारली …..त्यांच्या अशा भेदारण्याने वडिलांचेही डोळे पाणावले आणि त्यांनी लेकाला दत्तक द्यायचा विचार बदलला. लवकरच दरमहा पंधरा रुपये पगारावर त्यांना मिनर्व्हा मुव्हीटोन मध्ये नोकरी मिळाली तिथे त्यांना चित्रपटात एक लहानशी भूमिका देण्यात आली …पण ती देखील त्यांना धड जमेना म्हणून मग शेवटी त्यांना संगीत विभागात काम देण्यात आले. त्यांना मिनर्व्हा मुव्हीटोनच्या संगीत विभागाचा पेटीवाला बनविण्यात आले. ह्याच सुमारास त्यांची भगवान दादांशी ओळख झाली आणि ह्या ओळखीचं अतिशय घट्ट मैत्रीत रुपांतर झालं जे शेवट पर्यंत टिकलं.

भगवान दादांच्या ओळखीने अण्णांनी सर्वात प्रथम एका “जय-कोडी ” नावाच्या तमिळ चित्रपटाला संगीत दिल ” जय – कोडी ” चा अर्थ होता ” विजय – पताका ” आणि इथूनच अण्णा आणि भगवान दादांची जोडी जुळली आणि त्यांनी संगीत सृष्टीत अगणित विजय पताका रोवल्या. वाय. वी. राव यांच्या १९४२ साली आलेल्या ” नागानंद ” चित्रपटात तर अण्णांनी प्रमुख भूमिका सुद्धा केली होती ….. दिसायला उंचेपुरे राजबिंडे अण्णा नायक म्हणून नक्कीच पुढे आले असते .
शिवाय ते गायचे देखील खूप छान …..पण आपलं सुदैव म्हणूनच तो व त्यांचे इतर चित्रपट चालले नाहीत आणि त्याऐवजी त्यांनी संगीत दिलेली गाणी लोकप्रिय होऊ लागली आणि एक असामान्य संगीतकार आपल्याला मिळाला . भगवान दादांनीच १९४२ मधल्या ” सुखी जीवन ” मध्ये त्यांना हिंदीत संगीत द्यायचा चान्स दिला आणि इथून त्यांची यशस्वी कारकीर्द सुरु झाली.

C Ramchandra with Lata Mangeshkar
C Ramchandra with Lata Mangeshkar

” सुखी जीवन ” मधल्या ज्या पहिल्याच गीताला संगीत द्यायची संधी त्यांना मिळाली ते गाणं होत डॉ महंमद इक्बाल यांनी लिहिलेलं भारत विख्यात गीत ” सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा ” ह्या गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळीच सी रामचंद्रांची ओळख झाली संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी .
अनिलदांना अण्णा आपले गुरु मनात असत. कारण हिंदी संगीतात पाश्चात्य वाद्यांचे स्वर बेमालूमपणे मिसळून अनिलदा भारतीय पद्धतीचे संगीत तयार करायचे . असे प्रयोग सर्वप्रथम हिंदी सिने सृष्टीत करायचं श्रेय अनिलदांकडेच जात आणि अण्णांनाही अशाच प्रकारच्या संगीताची आवड होती ….. ” अनिलदांची गाणी ऐकून ऐकूनच मी संगीत शिकलो ” असं तेच स्वतः नेहमी म्हणत. ” सारे जहाँ से अच्छा हिंदोसिताँ हमारा ” ऐकून अनिलदांनी कौतुकाने अण्णांची पाठ थोपटली आणि अण्णा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. मग आला फिल्मिस्तानचा ” शहनाई ” …… आणि त्यातलं तुमचं आमचं सर्वांच्याच आवडीचं ” आना मेरी जान मेरी जान संडे के संडे ” सिनेसृष्टीत सी रामचंद्रानी आपलं स्थान आधीच बनवलं होतं …. या गाण्याने रसिकांच्या हृदयातलं त्यांचं स्थानदेखील पक्क झालं ….
” संगीत हे खूप अवजड , अवघड असू नये …. सामन्य माणसाला सुद्धा सहज गाता येईल असं संगीत द्यायचं सामर्थ्य चित्रपट माध्यमात आहे आणि मी तसंच संगीत देणार ” हीच अण्णांची कल्पना होती आणि हे तत्व त्यांनी कायम पाळलं ….आणि म्हणूनच त्याचं प्रत्येक गाणं आजही चिरतरुण आहे.

१९४७ साली आलेल्या ” शहनाई ” मधल्याच गीता दत्त आणि अण्णांनी गायलेल्या ” जवानी के रेल चली जाये रे ” ह्या मजेशीर गाण्यातील कोरस मध्ये एक मंजुळ आवाज होता. वसंतात जरी सगळेच पक्षी गात असले तरी जाणत्या कानाला कोकिळेचा स्वर बरोबर ऐकू येतो , त्याप्रमाणेच कोरस मधून अण्णांनी गान कोकिळेचा स्वर अचूक हेरला आणि सुरु झाले सी रामचंद्र – लता यांचं सुवर्ण युग …..
त्यानंतर काय बहार आली हे आपण सगळेच जाणतो. पतंगा , समाधी , सरगम , निराला या चित्रपटातून दोघांनी आपली जादू दाखवायला सुरुवात केली .
आणि मग आला ” अलबेला ” …… भगवान आणि गीता बाली ह्यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या.
दिसायला यथातथा , सामान्य असलेला , पण चित्रपटात नट व्हायची स्वप्नं पाहणारा नायक ….. सामान्यांना आपलीच वाटावी अशी कथा , आणि चित्रपटातली गाणी ? ती तर एक से एक कहर ……
यातील एकूण एक गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतलं …..
” दिल धडके नजर शरामाये तो समझो “
” बलमा बडा नादान रे “
” धीरे से आजा री अखियन में “
” भोली सुरत दिल के खोटे “
” किस्मत की हवा कभी नरम कभी गरम “
” मेहफिल में मेरे कौन ये दिवाना आ गया “
” मेरे दिल की घडी करे टिक टिक टिक “
” शाम ढले खिडकी तले “
” शोला जो भडके दिल मेरा धडके “
लोक अक्षरशः वेडी झाली होती ही गाणी ऐकून …. आजही होतात
अलबेला चित्रपटाच्या गाण्यांनी सगळीकडे नुसता धुमाकूळ घातला ….

Mohd Rafi, Naushad, C Ramchandra and Talat Mehmood
Mohd Rafi, Naushad, C Ramchandra and Talat Mehmood

त्यानंतर आलेले अनारकली , आझाद , परछाई , यास्मिन , नौशेरवान ए आदिल , नवरंग , स्त्री , या सर्वच चित्रपटांचं संगीत ओरडून ओरडून हेच सांगतं की सी रामचंद्र Was , Is and Will remain THE BEST ….आपल्या संगीतात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग अण्णांनी बेधडकपणे केले आणि ते यशस्वी करून दाखवले. ” आना मेरी जान मेरी जान संडे के संडे ” मध्ये केलेला शिट्टीचा वापर आणि त्याच बरोबर जाझ या पाश्चात्य शैलीचा चा भारतीय संगीताबरोबर केलेला बेमालूम मेळ. अनेकदा निरर्थक शब्द वापरून लिहिलेल्या गाण्याला अतिशय सुरस चाल लावून ते गाणं अफलातून उंचीवर नेवून ठेवत असत .
याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ” आशा ” चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले ने गायलेलं ” इना मीना डिका ” …. दोघांनी भन्नाट गाऊन ह्या गाण्याला योग्य न्याय दिला आहे. अनेक गीतकारांच्या रचनांना अण्णांनी संगीत दिलंय पण अण्णांची बहुतेक गाणी पी एल संतोषी किंवा राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली आहेत ….अण्णांसाठी अतिशय निरर्थक पण मजेशीर शब्द वापरून गाणी लिहिणं ही पी एल संतोषींची खासियत होती …..
” टमटम से झांको न रानी जी गाडी से गाडी लड जायेगी ” ( नमूना )
” आना मेरी जान मेरी जान संडे के संडे ” ( शेहनाई )
” या बीबी साकीया मोंबासा ” ( सरगम )
” तिनक तीन तानी दो दिन की जिन्दगानी ” ( सरगम )
” शिन शिनाकी बुबला बु ” ( शिन शिनाकी बुबला बु )
पण तुम्हाला जर असं वाटत असेल की पी एल संतोषींनी , अण्णांच्या चित्रपटात फक्त अशीच गीत लिहिली आहेत तर ते मात्र साफ चुकीचं आहे …. वरच्याच चित्रपटातील ही दुसरी गाणी देखील पहा …..
” मार कटारी मर जाना ” ( शहनाई )
” एक ठेस लगी आंसू टपके ” ( नमूना )
” जब दिल को सतावे गम तू छेड सखी सरगम ” ( सरगम )
” तुम क्या जानो तुम्हारे याद मे ” ( शिन शिनाकी बुबला बु )
संगीत देताना सी रामचंद्रांनी असंख्य कल्पक प्रयोग केले …..
नवरंग मध्ये ” अरे जा रे हट नटखट ना छेड मेरा घुंघट ” आणि अलबेला मध्ये ” भोली सुरत दिल के खोटे ” या गाण्यांसाठी केलेला बाजा , झांझ , ढोल , ताशे , पिपाणी यांचा अप्रतिम वापर .
ही गाणी ऐकताना अगदी जख्ख म्हाताऱ्यांचे पाय देखील नकळत ठेका धरतात …..कानांना गोड वाटणारा , हवाहवासा कर्कशपणा कशाला म्हणतात माहीत आहे का ? कधी अनुभवलाये ? वरची नवरंग आणि अलबेला ची गाणी ऐका ….
मग कळेल मी काय म्हणतेय ते.

एकीकडे ” सरगम ” मधील शास्त्रीय संगीत ” जब दिल को सतावें गम तू छेड सखी सरगम ” तर दुसरीकडे उडत्या चालीचं ” आझाद ” मधलं ” अपलम चपलम ” …एकीकडे ” शिन शिनाकी बुबला बु ” मधलं आर्त ” तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये ” आणि दुसरीकडे rock n roll च अफलातून भारतीय version असलेल ” आशा ” चित्रपटातल ” इना मीना डिका ” ….
असं म्हणतात की ज्या काळी अण्णांनी भारतात ” इना मीना डिका ” मध्ये यशस्वी रित्या rock n roll चा प्रयोग केला त्या काळी ते पाश्चात्य देशातही एवढं लोकप्रिय नव्हतं ….
एकीकडे ” कान्हा बजाये बांसुरी और ग्वाले बजाये मंजिरे के गोपिया नाचे छुमक छुम ” हे गुजरातच्या गरबा पद्धतीच ” नास्तिक ” मधलं लोकगीत तर दुसरीकडे ” अनारकली ” मधलं प्रणयी आणि विरही असे दोन्ही बाज असलेलं ” ये जिंदगी उसीकी है ” शेवटच अलविदा अलविदा ऐकताना तर निव्वळ शहरा येतो अंगावर …
एकीकडे ” अलबेला ” मधलं हळवं , मंजुळ , अलगदपणे स्वप्नांच्या दुनियेत नेणारं ” धीरे से आज री अँखियन में ” तर दुसरीकडे ” पतंगा ” मधलं ओठांवर मिश्कील हसू आणणारं ” मेरे पिया गये रंगून ” …..
अलबेला मधल्या ” शोला जो भडके ” मध्ये बॉन्गो ड्रम्स , सॅक्सोफोन , ट्रम्पेट वगैरे वाद्यांच्या मदतीने आणलेला कॅब्रे इफेक्ट तर अफलातून …

Albela movie posterAzad movie posterAnarkali movie poster

यादी खरंतर न संपणारी आहे …..
शब्द कोणतेही असो , त्यांना अण्णांचा परीसस्पर्श झाला की त्या गाण्याचं शंभर नंबरी सोन व्हायचं .
काय नव्हतं त्यांच्या संगीतात …. उत्साह , सळसळत्या तरुणाईचा जोश , विनोद , मिश्कीलपणा , कारुण्य , दुख , आर्तता या सगळ्या भावनांच्या विविधतेने नटलेल सजलेलं असंच ते संगीत ……
त्यांच्या सारखच त्याचं संगीतही जिवंत आहे …..
आणि म्हणूनच त्याचं संगीत आणि ते आजही अजरामर आहेत .
ह्यातच त्याचं विलक्षण वेगळेपण होत आणि म्हणूनच मी म्हटलं की ते आजही आपल्यातच आहेत आणि उद्याही असणारच .

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

1 Comment

  • Aparna sarang
    On January 4, 2022 11:21 pm 0Likes

    Madam
    Khup chhan lihilat tumhi

Leave a comment