संकलन – सौ हेमा उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

एखाद्या आवाजावर आभाळा एवढी माया जडावी असे भाग्य फार थोड्या गायकांच्या नशिबात असते, मग त्या गायकाचा प्रत्येक सूर झेलण्यासाठी जीव आतुर झालेला असतो. त्यांचे स्वर्गीय सूर आपल्याला विलक्षण आनंद देऊन जातात व अशा स्वर्गीय सुरांची संगत आपल्याला जीवनाच्या एक अविभाज्य भाग बनते. नव्हे त्यांची संगत आपल्याला आयुष्यभरासाठी लाभते त्या विलक्षण सुरांचे नाव आहे, अर्थात,  आशा भोसले! १९९३ झाली “आशा भोसले-नक्षत्रांचे देणे” हे मराठी गाण्याचे पुस्तक प्रकाशित झाले, त्यावेळी आशाताई काय म्हणाल्या होत्या ते आज आशाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. (Birthday Greetings to the Legendary Singer Asha Bhosle)

आशा भोसले स्वतःच्या शब्दात–

“सुधीर फडके आणि गदिमा यांच्याबरोबर मी खूप कामं केली. आम्ही शनिवारी-रविवारी पुण्यात येऊन मराठी चित्रपट केले आहेत. मराठी चा मामला त्यामानाने थोडा स्लो असायचा. स्पष्ट आग्रही वळणाचं सुसंस्कृत असं सुधीर फडके यांचे संगीत तर वसंत पवार, रामभाऊ कदम यांचं मराठमोळ्या थाटाचं, साधंसुधं संगीत. ओ. पी नय्यर यांनी उर्दूचे उच्चार शिकवले. माझ्या आवाजाचा उपयोग करून तऱ्हेतऱ्हेची गाणी दिली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मी कधी सुचवलं तर ते ऐकायचे. अर्थात योग्य वाटलं तर. इतर संगीतकारांना म्हणजे सी रामचंद्र वगैरेंना तसे चालत नसे. सुरुवातीला मा. नवरंग यांच्याकडे शिकले. नंतर गोविंद प्रसाद जयपुरवाले यांच्याकडेही गाण्याचे पाठ घेतले. पण पहिला गाण्याचा खोल संस्कार बाबांचाच आहे. ते आम्हा भावंडांना घेऊन गायला बसल्याचे दृश्य अजूनही स्पष्ट आठवते. इतक्या वर्षानंतर आजही माझ्या गाण्याचा रोजचा रियाज चुकलेला नाही. “डाके की मलमल” मधलं “जादूगर सावरिया” मला आवडत. “भागम भाग” मधलं “छलके चंदाका पैमाना” तर “हावडा ब्रिज” मधलं “आईये मेहरबान” आवडत. “मी मज हरपून बसले गं ” “जिवलगा राहिले रे दूर घर माझे” ही गाणी खूप आवडतात. आम्हाला घडवलं लेखकांनी, कवींनी. हे लोक नसते तर आमचं काय झालं असतं कुणास ठाऊक? मी विपुल वाचन केलं, आजही करते, पूर्वी मी पेंटिंग करायची भोसल्यांनी ते साहित्य फेकून दिलं, वाचन मात्र माझं सुटलं नाही. मी शरत साहित्य वाचले आहे. पु.भा. भावे, खांडेकर, अप्पा दांडेकर, सुमती क्षेत्रमाडे यांचे साहित्य वाचून काढले आहे. पु ल देशपांडे, चि. वि. जोशी खूप आवडतात. तसेच आशापूर्णा देवींचं साहित्यही माझ्या संग्रही असत. मी भाषांतरित चार्ल्स डिकन्स वगैरे साहित्यही वाचते. आयुष्याचा जोडीदार दुःखच देऊन गेलेला. माझी मुलं मात्र माझं सर्वस्व आहेत. परमेश्वराजवळ मागेन काहीही सहन करण्यासाठी शक्ती दे. लाचारी म्हणजे मरण त्याची वेळ नको, माझी कोणी कीव करावी हे सहन होत नाही. ताठ मानेने जगण्याची हिंमत मात्र द्यावी.” अशा भावना आशाताईंनी त्या वेळी व्यक्त केल्या.

मराठी चित्रपटांसाठी आणि भावगीत, भक्तिगीतांसाठी सुद्धा आशाताईंची गाणी म्हणजे एक आनंद खेळच आहे. एका पाठोपाठ शेकडो सतारी वाजाव्यात तसा अनुभव आशाताईंच्या शेकडो स्वरांनी दिला. त्यांची असंख्य गाणी मनात कायम साठी घर करून बसली. मराठी गाणी ही हिंदी गाण्यांच्या तुलनेत तशी कमीच आहेत. मास्टर दीनानाथांची नाट्यगीते केवळ आशाताईंनीच सादर करावीत असे स्वरमंडळ त्यांनी छेडले आणि ती नाट्यगीते अमर केली. हिंदी चित्रपटात कितीतरी चित्रपट संगीत दिग्दर्शक त्यांच्या आयुष्यात येऊन गेले. प्रत्येकाकडे काही ना काही नवीन आणि चांगले शिकायला मिळाले ही त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे सगळ्याच संगीत दिग्दर्शकांच्या एकूणच शैलीचा त्यांच्या गाण्यावर प्रभाव पडला. बर्मन साहेबांच्या जीवघेण्या लकबी, मदन मोहन व जयदेव यांच्या तानाची स्टाईल आशाताईंच्या गाण्यात न विसरता येतील अशा रुजल्या गेल्या. ओ. पी नय्यर यांच्याबरोबर त्यांनी जी गाणी स्वरबद्ध केली, तो एक संगीत क्षेत्रातल्या चमत्कार समजला जातो. नशीली गाणी असोत की उदासी गाणी असोत की प्रेमाने फुलासारखी अलगदपणे वाकलेली गाणी असोत की अवखळ भाव व्यक्त करणारी असोत, आशाताईंचा सूर हा एक चमत्कार आहे याची जाणीव प्रत्येक स्वर दिल्याशिवाय राहत नाही. आशाताईंच्या स्वरा बद्दल शेवटी असेच म्हणावे लागेल की ‘एक वादळ संगीत होऊन या पृथ्वीवर गरागरा फिरत राहिले आणि त्या वादळातच स्वरांची रेशीम फुले झाली आणि पृथ्वीवर सडा होऊन पसरत राहिली.

आज आशाताई वयाची ८८ वर्षे पूर्ण करून ८९ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. तरीही चेहऱ्यावर तीच प्रसन्नता, तोच उत्साह. त्यांचा हा उत्साह सदैव असाच राहो, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना.

आशाताई …..वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा.

(साभार सौजन्य- “आशा भोसले नक्षत्रांचे देणे”, मोरया प्रकाशन)

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Hema Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.