-जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

रसिक बलमा, अजीब दास्तां है ये, आ जान-ए-जा, सत्यम शिवम सुंदरम, रैना बीत जाए, छोड दे सारी दुनिया, आयेगा आनेवाला, ये जिंदगी उसी की है, है इसी में प्यार की आबरू, लग जा गले, तुम्ही मेरे मंदिर, ज्योती कलश छलके, मोसे छल किये जाय, मौसम है आशिकाना, ओ बसंती पवन पागल, आजा रे परदेसी, ये समां, ना जिया लागे ना, ये दिन और उनकी

भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) म्हणजे विश्वविख्यात गायिका लतादीदी. भारतात अन परदेशातच नाही तर त्रिखंडात विजयपताका फडकवणाऱ्या लतादीदी. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि कृष्णाच्या मुरलीची साद हे सारे एकवटून विधात्याने एक सुरेल कंठ घडवला तो कंठ लाभलेल्या लतादीदी म्हणजे आपल्या आवाजानं कोट्यावधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. 

     २८ सप्टेंबर,१९२९ या दिवशी प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकरांच्या घरी इंदूरला लतादीदींचा जन्म झाला. लता मराठी माणसांना ठाऊक होती ती मा.दीनानाथ मंगेशकरांची मुलगी म्हणून ! दिनानाथ ज्योतिष्यशास्त्राचे अभ्यासक होते.त्यांनी या बालिकेची कुंडली मांडली. आकाशस्थ सर्व शुभग्रह कुंडलीच्या चौकोनात जमले होते हे पाहून त्यांना एका अलौकिक स्वराची चाहूल लागली.या लेकीच्या भावी उज्वल कर्तृत्वावर त्यांचा दृढ विश्वास होता. संस्काराची, शिक्षणाची शिदोरी त्यांनी तिच्या हाती दिली. देवदत्त प्रतिभा घेऊन आलेल्या या कन्येचा सूर तिनं सांभाळावा म्हणून त्यांनी तिला आपल्या बंदिशी शिकवल्या,आपल्या चीजा लिहिलेल्या वह्या आणि आपला तानपुरा वारसा म्हणून बहाल केला. ‘सौभद्र’ नाटकात छोटा नारद म्हणून आलेली, बाबांना सांगून पैज मारून

‘पावना वामना या मना’ हे पद गाऊन ‘वन्स मोअर’ घेणारी,गाण्याचे पाठ लहानपणीच मिळालेली नऊ दहा वर्षांची लता दीनानाथांच्या  थोडी हाताशी आलेली होती. सप्टेंबर १९३९ साली मा.दीनानाथांनी पितापुत्रीचा जलसा सोलापुरात केला.लता नाटकातील पद गात होती. बंदिशी गात होती ती मराठी श्रोतृवृंदापुढे. श्रोते मंत्रमुग्ध झाले ते दीनानाथांच्या लेकीच्या गाण्याने! त्यावेळी भारतीय चित्रपट १९३२ मध्ये बोलू लागला आणि लगेच गाऊही लागला होता.

     १९४१ मध्ये स्पर्धेत प्रथमच भाग घेतलेल्या आणि नंबर प्राप्त केलेल्या छोट्या लताला बक्षीस मिळताच ‘यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नकोस’ असा मोलाचा उपदेशही तिच्या बाबांनी केला. २४ एप्रिल १९४२ हा मंगेशकर कुटुंबियांच्या जीवनातला काळाकुट्ट दिवस ठरला .मा.दीनानाथ अकालीच काळाच्या पडद्याआड गेले. कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी मोठ्या लेकीच्या खांद्यावर आली. ही मोठी लेक अवघी बारा-तेरा वर्षांची होती. मीना, आशा, उषा, हृदयनाथ अशी लहान भावंडं आणि आई यांची जबाबदारी लतादीदींवर पडली. पण त्यावेळी अवघ्या साडेबारा वर्षांच्या या मुलीनं परिवाराच्या पोषणाची जबाबदारी घेतली असं नाही तर हिंदी चित्रपट संगीताच्या विशाल परिवाराचीही जबाबदारी घेतली. पुण्यात नवयुग स्टुडीओत नवयुगच्या ‘पहिली मंगळागौर’ साठी संगीतकार दादा चांदेकर यांनी तिच्याकडून गाणी गाऊन घेतली. ‘नटली चैत्राची नवलाई’ ह्या मधुर, कोवळ्या आवाजातल्या गाण्याची गायिका होती लता. ध्वनीमुद्रिकेवर नाव होतं बेबी लता.

या मराठी चित्रपटात फक्त गायिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. नंतर त्या मा.विनायक यांच्याबरोबर कुटुंबासह कोल्हापुरात येऊन राहिल्या. बोलपट स्थिरावून जेमतेम १५ वर्षं होत होती. मा.विनायकांच्या बरोबर कोल्हापूर ते पुढे मुंबई असा मंगेशकर कुटुंबियांचा स्थलांतराचा इतिहास घडला. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये लतादीदींनी  नोकरी धरली. त्यानंतरच्या पाच वर्षांच्या अविरत संघर्षानंतर ‘लता मंगेशकर’ हे नाव सर्वतोमुखी व्हायला १९४७ साल उजाडावं लागलं. भारतीय स्वातंत्र्याच्या सुमारासच  चित्रपटसृष्टीत एका चमत्काराचा उदय झाला. लता मंगेशकर हे त्या चमत्काराचं नाव. त्यांचा पुढील संघर्षमय प्रवास सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्याचा सूर्य ‘लता’ हा दिव्य स्वर घेऊन उदयाचली आला अन पुढे इतिहास घडला. विठ्ठलपंतांच्या चार मुलांनी म्हणजे ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनी मराठी संस्कृतीला तत्वज्ञान दिलं तसं दीनानाथांच्या या चार मुलांनी दुनियेला संगीत दिलं असं म्हंटल तर ते योग्यच ठरेल.

     मुंबईच्या मायानगरीतला, मोहमयी चित्रपट क्षेत्रातला लतादीदींचा उमेदवारीचा काळ प्रचंड संघर्षाचा होता. लतानं इथं हिंदी -उर्दूचे संस्कार घेतले आणि हिंदी चित्रपट संगीताचं आभाळ लताच्या स्वरांनी भरून गेलं. लताने हिंदी चित्रपटाच्या पार्श्वगायनाची सुरुवात दत्ता डावजेकर या मराठी संगीतकाराकडे ‘आप की सेवा में’ या चित्रपटापासून केली. ‘पा लागू कर जोरी रे श्याम मोसे ना खेलो होरी’ हेच लताचे पहिले पार्श्वगायन केलेले गीत ! हा चित्रपट १९४६ ला प्रदर्शित झाला; पण त्यापूर्वीच ‘जीवनयात्रा’ हा चित्रपट झळकला. यात लताचे गीत होते. ‘चिडिया बोले’ हा सिनेमा वसंत देसाईंनी स्वरबद्ध केला होता. म्हणजेच लताच्या हिंदी करिअरकरिता सुरुवात दोन मराठी संगीतकारांकडून झाली असे म्हणता येईल. लताच्या कारकिर्दीला खरा आकार देण्याचं काम पुढं आणखी एका मराठी संगीतकाराने केले ते म्हणजे अण्णा तथा रामचंद्र चितळकर अर्थात सी.रामचंद्र.

त्या कालखंडात लाहोरहून आलेल्या, ‘मास्टरजी’ नावाने ख्यातनाम असलेल्या गुलाम हैदर या संगीतकाराने एका छोट्या, कृश मुलीच्या आवाजाची चाचणी घेतली. शशीधर मुखर्जींसारख्या दिग्गज निर्मात्याने तो आवाज फारच पातळ असल्याचं सांगून नाकारला. मुखर्जी यांच्या नजरेसमोर आणि कानात गोहरजान, अमीरबाई, जोहरा अंबालावाली, अख्तरी फैजाबादी नंतर आलेली शमशाद या गायिका असल्यानं त्यांना लताचा आवाज पातळ वाटला असावा. त्याचवेळी हैदर म्हणाले, ‘एक काळ असा येईल की, सगळी भारतीय चित्रपटसृष्टी या मुलीच्या पायाशी असेल.’

     चित्रपटसंगीताचं सुवर्णयुग साकारण्यातही या स्वरसम्राज्ञीचं मोठं योगदान आहे. गुलाम हैदर यांची भविष्यवाणी खरी ठरली. नवा निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राजकपूर, नव्यानं प्रवेशणारे संगीतकार शंकर-जयकिशन आणि धडपडणारी लता एकत्र आले आणि ‘बरसात’ हा चित्रपट झाला. त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत आणि गाणं कायमचं बदललं. तेव्हापासून सुरु झालेला स्वरांचा सोहळा आजतागायत सुरूच आहे आणि असंख्य रसिक त्या सोहळ्यात पुन्हापुन्हा तृप्ततेची अनुभूती घेत आहेत. असं म्हणतात, ताजमहालात दुरुस्ती करणं जसं अशक्य तसंच लतादीदींनी गायिलेल्या रचनात देखील दुरुस्ती करणं अशक्य. आरशात प्रतिबिंब पडण्यास जेवढा वेळ लागतो अगदी तेवढ्याच वेळात लतादीदी चाल आत्मसात करतात. सुरांचे नाजूक नक्षीकाम करणारा त्यांचा भरजरी आवाज. स्वरांची आवर्तन घेत ज्यानं कोट्यावधी हृदयावर अधिराज्य गाजवलं त्या लतादीदींचा आवाज कसा तर देवटाक्याच्या पाण्यासारखा नितळ.

‘सृष्टीतल्या कोकिळा फक्त वसंतातच गातात पण या कोकिळेनं मात्र प्रत्येक ऋतूला वासंतिक स्वरांचा दिलासा दिला आहे.’ अशा शब्दांत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लतादीदींच्या अपराजित स्वरांचं वर्णन केलं आहे.‘ मानवी ध्वनीच्या सृष्टीतला एक अदभूत चमत्कार अन विश्वव्यापी सूर म्हणजे लता मंगेशकर. असं साहित्यकार आचार्य अत्रे यांनी त्यांच्या आवाजाचं वर्णन केलेलं आहे. ‘तंबोऱ्यातून निघणारा गंधार ऐकायचा असेल तर लताच्या गळ्यातून ऐका’. असं कुमार गंधर्व म्हणत. तर ‘लता नसती तर आकाशवाणी केविलवाणी झाली असती. संगीतामध्ये लयीतला प्रत्येक क्षण सुरांनी व्यापून टाकणारी लतासारखी गायिका हजारो वर्षांतून एखादीच होते.’ असं पु.ल. देशपांडे म्हणत. दत्ता डावजेकर संगीतकार म्हणत, ‘ल म्हणजे लय, ता म्हणजे तान आणि मंगेशकर म्हणजे श्री मंगेशाने लताच्या मस्तकावर ठेवलेला कर आहे.’

     पंकज मलिक म्हणत की, ‘रेकॉर्ड ऐकताना कोण गातीय, हे ऐकणाऱ्यापासून लपवलं, तर लताची मातृभाषा सांगणं कठीण. इतकी त्या भाषेत सफाई. त्या त्या भाषेतल्या स्वरांचं वळण, बिनचूक निर्दोष शब्दोच्चार हे तर त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होय.’ १९५० च्या दशकात गिरगावातल्या मारवाडी विद्यालयात बडे गुलाम अली खांसाहेबांची मैफिल होती. मध्यंतर झाली. त्यानंतर ते यमन राग गाणार होते. स्वरमंडलाच्या तारा जुळवत होते. एवढ्यात शेजारच्या चाळीतील घरातून यमन रागावर आधारित लतादीदींचे ‘ जा रे बदरा बैरी जा’ हे गाणं ऐकू आलं. खांसाहेबांनी स्वरमंडल एकदम खाली ठेवलं अन प्रेक्षकांना म्हणाले, ‘ये गाना सुनने के बाद आपको क्या यमन सुनाएं’ आणि त्यांनी यमन राग सोडून दुसरा राग गायचे ठरवले. याहून मोठी दाद काय असू शकते !

     संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल म्हंटलंय, ‘पहाटे पहाटे कुठं तरी दूरवर ‘सुंदर ते ध्यान’ ऐकू येतं. काही क्षणांत ‘मोगरा फुलला’ कानावर पडतं आणि त्यांच्या स्वरातला ‘मोगरा’ शब्द ऐकताना जाणवतो तो शुभ्र पांढरा रंग. जो मला डोळ्यांना कधीच दिसला नाही. एखाद्या शाळेच्या प्रार्थनेत एखादी ओळ ऐकू येते ती ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची आणि अचानक आपल्या गाडीत रेडीओवर, पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचे ‘रस्मे उल्फत को निभायें’ ऐकू येतं… अंगावर काटा येतो. तेवढ्यात गाडी एखाद्या मांडवाजवळ सरकते आणि त्या मांडवात ‘गणराज रंगी नाचतो’ चालू असतं. पलीकडच्या मांडवात ‘ओम नमोजी आद्या’ कानावर पडतं. एखाद्या शाळेत समारंभाला जावं आणि मग तिथं एकदम अलीकडच्या ‘ओ पालन हारे’ वर लहान मुलांचं नृत्य चालू असतं आणि विंगेत एक छोटी मुलगी दिदींनी गायलेलं पसायदान गायला थांबलेली असते. कोणाचा तरी फोन वाजतो आणि रिंग टोन असतो..’लग जा गले’…तुम्ही फक्त कान द्या…लतादीदींचा आवाज हवेतच असतो आपल्याजवळ…कायमचा !’

     भारत-चीन पराभवानंतरच्या एका संध्याकाळी दिल्लीच्या नैशनल स्टेडीअममध्ये २७ जानेवारी १९६३ ला पंडित नेहरू, मौलाना आझाद अशा अनेक उपस्थित मंत्रीगणांच्यासमोर, कवी प्रदीप यांच्या तरल लेखणीतून उतरलेलं आणि सी.रामचंद्र या प्रगल्भ संगीतकाराचं दिग्दर्शन लाभलेलं ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत लता मंगेशकर यांनी सादर केलं. त्यावेळी हे गाणं नव्हतंच ते होतं एका वेदनेचं शक्तीस्त्रोत,ज्यानं भारतीयांच्या मनाला प्रज्वलित करण्याचं काम केलं. इतकंच नाही तर उपस्थित श्रोतृवर्गासह प्रत्यक्ष जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. केवढी ही स्वरांची अजब किमया ! त्यांचं कोणतही गाणं ऐकताना एका प्रचंड दैवी अनुभूतीनं मन भरून येतं. डोळे घळाघळा वाहू लागतात. ही असते लता नावाची जादू ज्यामुळे चेहऱ्यावर पवित्र निर्मळ भाव उमटतात.

     अवकाशाच्या भव्यतेचं वर्णन अशक्य, महासागराच्या अथांगतेला लिटरचं माप लावणं अशक्य, सूर्याचं तेज थर्मामीटरनं मोजणं अशक्य तसं लतादीदींच्या गाण्याचं वर्णन अशक्य. ती एक अनुभवण्याची गोष्ट. त्यांच्या आवाजाबद्दल बोलणं म्हणजे एखाद्या उंच पर्वत शिखरावर उभं राहून अजस्त्र घनांतून सहस्त्रधारा दोन हातांनी कवेत घेण्याचा प्रयत्न करणं. आपण त्या वर्षावात अक्षरश : बुडून जातो. एखादं निखळ नितळ स्फटिकासारखं पारदर्शक या जगात दुसरं काय आहे तर लताचा स्वर असं म्हणतात. देव कधी कोणी पाहिला नाही पण त्याची अनुभूती या स्वरातून होते. रखरखलेल्या दुपारी रस्त्याकडेच्या एखाद्या झाडाच्या पानाआडून कोकीळ कंठी सूर पाझरावा आणि शिणलेल्या शरीराला लगेच चमत्कार झाल्यासारखी उभारी मिळावी तशी जादू म्हणजे लतादिदींचा आवाज. सर्वोत्तमलाही व्यापून दशांगुळे उरलेली ही लता नावाची दंतकथा.

     ‘शब्दफेक मी नूरजहां गायिकेकडून शिकले तर हिंदी, उर्दूचे उच्चार, आवाजावरचा ताबा हे मी सैगलच्या गाण्यांमुळे शिकले.’ असं म्हणणारा त्यांचा नम्र स्वभाव आहे. गप्पीष्टपणा, खट्याळपणा, मिश्कीलपणा आणि विलक्षण हळव्या स्वभावाच्या लतादीदी अत्यंत मृदू शैलीत बोलतात. ‘आयुष्यात लवकर किंवा उशिरा असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते.’ या त्यांच्या उदगारातून त्यांचा चिंतनशील व स्थितप्रज्ञ स्वभाव दिसून येतो. गायनाव्यतिरिक्त त्यांचा छंद म्हणजे फोटोग्राफी. कव्वाली, भजनं, लोकगीतं, भावगीतं, बालगीतं, शास्त्रीय संगीतावरील गीतं यात त्यांचा आवाज लिलया फिरतो. ३६ भाषांतील ५० हजारांहून अधिक गाणी त्यांनी म्हंटली आहेत. पावणेदोनशेच्या आसपास संगीतकारांची गाणी त्यांनी आजवर गायली आहेत. ज्ञानदेवांच्या पसायदानातून, तुकारामाच्या अभंगातून, भगवदगीता, जैन संप्रदायावरील भजनातून, कबीर, मीरा, सूरदासाच्या भजनातून, गालिबच्या गझलातून त्यांचा आवाज घुमला आहे. अनेक गैरफिल्मी गाण्यातून त्यांच्या सुरांचा अभिजात प्रवास चालू आहे.

     लताचा कोवळा विरहाने ओथंबलेला स्वर ऐकला की, आतून गलबल्यासारखं होतं. खरंच या स्वराने रसिक मनाला विस्तृत जीवनानुभव दिलाय. ‘गंगा-यमुना डोळ्यात उभ्या का?’ या गाण्याने मराठी मनं भिजवलं. ‘लाजली सीता स्वयंवराला, घरात हसरे तारे, आली हासत पहिली रात, प्रेमा काय देऊ तुला ’ हे  मराठी संगीताच्या विश्वातलं अपूर्व वैभव. ज्ञानेशाची ओवी ऐकून मनात अष्टसात्विकतेचे भाव दाटतात. ‘मोगरा फुलला, घनुवाजे घुण घुणा, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवचिता परिमळू, ओम नमोजी आद्या’ हे गणेशस्तवन आणि विश्वप्रार्थना ‘पसायदान’ हे मराठी माणसांच्या पदरात पडलेलं सर्वांत मोठं दान होय. ज्ञानदेवांचं सारस्वताचं झाड आणि लताच्या आर्त मधुर स्वरात गाणारा पक्षी असा योग पसायदानमुळे जुळून आला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात, जयोस्तुते श्री महन्मगले, ने मजसी ने परत मातृभूमीला’ ही गाणी मंगेशकरांची स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अनन्य निष्ठेची साक्ष देतील.   

‘प्रेमास्वरूप आई, मालवून टाक दीप, आनंदी आनंद गडे, माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, आनंदाचे डोही आनंदतरंग, भेटीलागी जीवा लागलीसे आस, जीवनात ही घडी अशीच राहू दे, या चिमण्यांनो परत फिरा रे ’ हा मराठी माणसाच्या मनातील  आनंदाचा ठेवा होय. ‘ लटपट लटपट तुझं चालणं ’ मधून मराठी स्त्रीच्या लावण्याचा आलेख त्यांनी मांडलेला आहे. ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या ’ या कवी भा.रा.तांबे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरशब्दचित्राला गाण्यांमधून लतादीदी एक सांध्यसंगीत देतात, गूढरम्यतेची भावछटा देतात.

     मराठी चित्रपटसृष्टीत एकदा ‘आनंदघन’ या नावाने मोठे वादळ उठविले होते. विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या १९६४ ते १९६६ ही वर्षे ‘आनंदघन’ ची अर्थात दीदींची होती. ‘मोहित्यांची मंजुळा, तांबडी माती, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं’ या अनेक चित्रपटात दीदीने संगीतबद्ध केलेली गीते आजही रसिकांच्या मनात घर करून बसली आहेत.

एकदा भालजींनी त्यांना लावणीची चाल बांधण्यास सांगितले. भालजींच्या कथानकातील स्त्री चांगल्या घरातील असल्याने त्यांना साधी लावणी हवी होती. त्याच दिवशी दिदींनी रेडिओवर एक मद्रासी गाणे ऐकले. दिदींनी प्रथम चाल तयार केली. ही चाल त्वरित शान्ता शेळकेना ऐकवली आणि शान्ताबाईनी त्या चालीवर ‘रेशमांच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ असे शब्द लिहून लावणी पूर्ण केली. ‘नको देवराया अंत आता पाहू, शूर आम्ही सरदार, जीवाशिवाची बैलजोड’ या गीतांच्या चाली ऐकल्या की, दीदींच्या संगीतातील उत्स्फूर्तता लक्षात येते.

     ‘ आ जाने जां, आ मेरा ये हुस्न जवां’, ‘अंग से अंग लगा ले, सांसो में है तूफान, जलने लगी है काया, जलने लगी है जान’, ‘थोडासा ठहरो…करती हूं तुमसे वादा, पुरा होगा तुम्हारा इरादा, मैं हूं सारी की सारी तुम्हारी, फिर काहे को जल्दी करो’ ही तीन रोमैंटीक गीते गाऊन अशा पद्धतीची गाणी आपण म्हणू शकतो हे त्या स्वरसम्राज्ञीने लीलया सिद्ध केलं. लतादीदींना अशा प्रकारचे ‘क्लब सॉंग्स’ गायला देण्याचा पहिला मान अर्थातच एस.डी.बर्मन यांच्याकडे जातो. १९५४ मध्ये ‘नवकेतन’ च्या ‘टैक्सी ड्रायव्हर’ मध्ये क्लब डान्सर शीला रमाणीसाठी दादा बर्मननी चक्क लतांकडून ‘दिल से मिला के दिल प्यार कीजीए, ऐ मेरी जिंदगी’ तसेच ‘जुगनू’ मध्ये एक नशीलं गाणं दिलं ‘जाने क्या पिलाया तुमने बडा मजा आया’ यासारखी गाणी गाऊन घेतली.

     शंकर- जयकिशन यांनीसुद्धा ‘आह’ साठी ‘सुनते थे नाम हम जिनका बहारमें’, ‘संगम’साठी ‘मैं क्या करूं राम मुझे बुढा मिल गया’, ‘एप्रिल फूल’ साठी ‘मेरा नाम रिटा..क्रिस्टीना’ यासारखे   कैब्रे सॉंग त्यांना म्हणायला दिले. तसेच ‘गुमनाम’ साठी ‘इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात बात’, ’धरती’ चित्रपटाकरिता ‘इश्क की मैं बीमार की वल्ला तीर-ए-नजर है पार’, ‘तुमसे अच्छा कौन है’ मधील ‘आंखो में आंखे ना डालो, मुझे कुछ होता है’, ‘मैं नशेमें हूं’ मधील ‘मैंने तो नहीं पी, मैं साकी बनी थी’  अशी गाणी गाऊन घेतली. सी.रामचंद्रांनी देखील लताकडून गाऊन घेतलेले ‘अनारकली’ मध्ये शहेनशहा अकबराच्या दरबारात अनारकलीने पेश केलेले ‘मुहब्बत में ऐसे कदम डगमगाए’ आणि त्यातीलच ‘जमाना ये समझा के हम पी के आये’ वरची लाजबाब उचकी त्याकाळात केवढी गाजली. 

     आर.डी.बर्मन यांनी देखील ‘सीता और गीता’ मध्ये ‘हां जी हां मैंने शराब पी हैं’, ‘झील के उस पार’ मधील ‘दो घुंट मुझे भी पिला दे शराबी,दे ख फिर होता है क्या’, ‘समाधी’ मधील ‘बंगले के पीछे,तेरे बेरी के नीचे’, ‘कारवां’ मधील ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ अशा पद्धतीची गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘गोरा और काला’ मध्ये ‘एक तो मेरा मस्ताना शबाब, उस पे गिरा दी तुने थोडी शराब’ हे गाणं दिलं. अशी ही वेगळ्या नजाकतीची नखरेल, मादक, नशीली गाणी नेहमीची चाकोरी सोडून लतानी थोडं वेगळ्या वाटेने जाऊन   तितक्याच ताकदीने गायली आहेत. अनिल विश्वास, नौशाद, श्याम सुंदर, खेमचंद प्रकाश, सज्जाद, बप्पी लहरी ते ए.आर रहेमानपर्यंत दिग्गज संगीतकारांनी लताना निमंत्रण दिलं. त्यांचा सुरेल आवाज प्रत्येक संगीतकाराच्या प्रतिभेसमोर नवे सृजनात्मक आव्हान उभे करत होता. या असंख्य संगीतकारांची शैली वेगळी, रंग वेगळा, त्यात समान सूत्र होतं फक्त लता मंगेशकर हेच.

     ‘ बिंदिया चमकेगी (दो रास्ते), झिलमील सितारों का आंगन (जीवन मृत्यू), मै तुलसी तेरे आंगन की (मै तुलसी तेरे आंगन की), सत्यम शिवम सुंदरम (सत्यम शिवम सुंदरम), रसिक बालमा (आह), रुक जा रात ठहर जा रे चंदा (दिल एक मंदिर), रैना बिती जाए (अमर प्रेम), हम थे जिनके सहारे (सफर), छोड दे सारी दुनिया (सरस्वतीचंद्र), ओ बाबूल प्यारे (जॉनी मेरा नाम), मेरे मनका बांवरा पंछी (अमरदीप), ये जिंदगी उसीकी है (अनारकली), डफलीवाले डफली बजा (सरगम), दिल पुकारे आरे आरे (ज्युवेल थीफ), अच्छा तो हम चलते हैं (आन मिलो सजना), कोरा कागज था ये मन मेरा (आराधना), तेरे बिना जिंदगी से कोई (आंधी), ये मौसम आया है (आक्रमण), एक प्यार का नगमा है (शोर), कभी कभी मेरे दिल में खयाल (कभी कभी), मैं ना भूलुंगा (रोटी,कपडा और मकान), आजा सनम मधुर चांदनी में (चोरी चोरी), झुमता मौसम मस्त महिना (उजाला), भंवर ने खिलाया फूल (प्रेम रोग), झुठ बोले कौवा काटे (बॉबी), जीत जाएंगे हम (मेरी जंग), मेहंदी लगा के रखना (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे), तेरे मेरे बिच में (एक दुजे के लिए),जिंदगी का ना टूटे लडी (क्रांती), तुमसे मिलकर (प्यार झुकता नहीं) ’ अशी लतादीदींची सदाबहार गाणी कोण बरं विसरेल?

     ‘झरा, मुळचाची आहे खरा’ असे लतादीदींच्या कोणत्याही गाण्याबद्दल म्हणता येईल. हजारो अप्रतिम गाण्यातून त्यांच्या कुठल्याही एका गाण्याचा उल्लेख करणे अशक्य. लतादीदींनी आपल्या आयुष्यात जवळजवळ ८० ते १०० नायिकांसाठी गाणी गायली आहेत. त्यापैकी महत्वाच्या नायिका म्हणजे मधुबाला, निम्मी, मीनाकुमारी, नर्गिस, वैजयंतीमाला, बिना रॉय, पद्मिनी, माला सिन्हा, मुमताज,  सायराबानू, शर्मिला टागोर, हेमामालिनी, तनुजा, नूतन, साधना, नंदा, सुचित्रा सेन, वहिदा रेहमान, आशा पारेख, रेखा, राखी, जया भादुरी, झीनत अमान, श्रीदेवी, जयाप्रदा, मौसमी चटर्जी, रीना रॉय, स्मिता पाटील, टीना मुनीम, माधुरी दीक्षित, काजोल, तब्बू, करिष्मा कपूर. यावरून असं म्हणता येईल की, एका गळ्याने चमकवले ८० ते १०० नायिकांचं सौंदर्य.    

   

    एखाद्या हुशार विद्यार्थ्याने तीन तासांचा गणिताचा पेपर अगदी थोड्या वेळात  अवघ्या अर्ध्या तासात सोडवून निघून जावं त्याप्रमाणे अगदी थोड्या वेळात, अवघड गाणं सोपं वाटावं अशा तऱ्हेने सादर करत दीदी सहजतेने पुढल्या रेकॉर्डिंगला निघून जात असत. लताजींचा संगीताचा स्वर आणि परमात्मा यांच्यात कोणते तरी अदभूत आणि विचित्र बंधन नक्की आहे. मनुष्याच्या आत्म्याला जोडणारी कोणती तार वा दुवा परमात्म्याशी जोडणारा असेल तर त्या तारेचे नांव लता मंगेशकर. त्यांच्या स्वरात-गाण्यात, आवाजातच इतकी ताकद  आहे की, त्यामुळे माणसाच्या आत्म्यातील आवाजांचे झंकार आपोआप वाजू लागतात.

     लतादिदी म्हणतात, ‘वडिलांना अत्तर आवडायचं आणि ते गोव्याहून बऱ्याच प्रकारची अत्तरं आणायचे तेच वेड मला पण लागले. म्हणून काहीजण मला म्हणतात, ‘तुम्हारे घर रेड हुई तो तुम परफ्युम की वजहसे पकडी जाओगी.’ लतादिदी आपल्या आवडी निवडी सांगताना म्हणतात, ‘विवेकानंद आणि मंगेश ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. धर्म, देश, इतिहास याचा मला जाज्वल्य अभिमान आहे. भालजी पेंढारकर, पं.नरेंद्र शर्मा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही माझी आदर स्थानं आहेत.ब डे गुलाम अली, मेहंदी हसन, सलामत अली, पाकिस्तानचे गुलाम अली हे आवडते गायक. मला किल्ले आणि कविता जवळचे वाटतात. माझं आंबा, आईस्क्रीम, पुरणपोळीवर अतिशय प्रेम आहे. चवीनं खाण्याची आणि चवीनं स्वयंपाक करण्याची आवड असलेने बारीक सारीक वास लगेच माझ्या नाकाला झोंबतात. मी सचिन तेंडुलकरची अत्यंत चाहती असून मला क्रिकेट मनापासून आवडतं.’   

     लतादीदींचे संगीत वैश्विक आहे. ते मधाळ व सहज असून स्फटिकासारखा स्पष्ट, अगदी योग्य वजन देऊन उच्चारलेला निर्दोष सूर. जडही नाही अन हलकाही नाही. फक्त इष्ट तेवढा. मेघाप्रमाणे नाजूक, पावसासारखा उत्स्फूर्त, महासागरासारखा खोल. निसर्गात सापडणारा एखाद्या घटकाचा अगदी लहानसा भाग गहाळ झाला आणि जणू दिदींच्या आवाजाने त्याची पूर्ती केली. नश्वरतेच्या मर्यादांच्या अगदी पलीकडे जाणारी भारावून टाकणारी परिपूर्णता त्यांच्या आवाजात आहे. लता मंगेशकर संगीताचं विश्वविद्यालय आहेत. निर्मळ, निर्दोष, निखालस सूर हाच लताबाईंच्या गाण्याचा प्राण आहे. एक्स्प्रेशन ही ‘देण्याची’ गोष्ट नसून ‘असण्याची’ गोष्ट आहे हे त्यांच्या गाण्यातून जाणवतं. गंधार म्हणजे नेमकं काय, यावर अनेक मतप्रवाह आहेत. मात्र या गंधाराचा रोकड पुरावा, त्याची अनुभूती म्हणजे लतादीदींच गाणं. या गायिकेच्या गळ्यात जन्मजात गंधार आहे व त्या गंधाराने कानसेनांच्या कैक पिढ्यांना परमोच्च श्रवणानंद दिला आहे.

     लतादिदींना मिळालेले मानसन्मान म्हणजे भली मोठी यादी आहे. भारतरत्न, दादासाहेब फाळके अवार्ड, पद्मभूषण, पद्मविभूषण, मोठमोठ्या विद्यालयाच्या डी.लिट.पदव्या म्हणजे रसिक मनाने त्यांच्यावर केलेली स्तुतीसुमनांची बरसातच आहे. एवढेच नाही तर ‘आनंदघन’ या टोपण नावाने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणूनही पुरस्कार मिळवले आहेत. हॉलंड, कॅनडा, लंडन, अमेरिका, बँकॉक, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका अशा परदेशातही त्यांनी गाण्याचे कार्यक्रम करून लाखो लोकांचं जीवन उजळवून टाकलं आहे. पुण्यात वडिलांच्या नावाने ‘मा.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ त्यांनी काढले असून त्यांच्यातर्फे आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च काम करून शिखर गाठणाऱ्या व्यक्तीला वडिलांच्या नावाने दरवर्षी पुरस्कारही देण्यात येतो.    

     हिंदी-उर्दू शब्दांचे उच्चार असोत किंवा लाहोर घराण्याची, पंजाबी-पतियाळा शैली असो, ठुमरीची बनारस शैली असो, बंगालमधून आलेली बाऊल शैली असो, आधीच्या सर्व गायिका बघता बघता विस्मरणात जातील असे गायकीचे रंग लतादीदींनी रसिकांसमोर पेश केले. त्यांचा स्वर आवाज व सर्व नादविश्व तसेच सगळी माध्यमं व्यापून दशांगुळे उरला आहे. लतादीदींचा गीता, गालिब,  ज्ञानेश्वरी, मीरेची भजनं यांचा अभ्यास आहे. गो.नी.दांडेकरांपासून पं.नरेंद्र शर्मांपर्यंत अनेकांनी त्यांना भाषा-अध्यात्म समजून दिलेलं आहे. आरंभीच्या काळापासून राम गणेश गडकरी, वीर सावरकर, कुसुमाग्रज, बालकवी, वि.स.खांडेकर, शरतचंद्र चटोपाध्याय यांच्या लेखनाचं वाचन केल्यानं त्यांच्या भाषेला डौल आलेला आहे.

     विविध प्रांतातून आलेल्या संगीतकारांनी आपल्या मातीचा वास, संस्कृतीचे रंग, तिथल्या लोकसंगीताचे गंध, दीदींच्या सुरेल स्वरांत मिसळविले आहेत. त्यामुळे देशभराच्या प्रत्येकाला दीदींचे सूर आपले वाटतात. सी.डी.देशमुख तर त्यामुळेच म्हणत असत की, ‘लता मंगेशकरांचे सूर हे राष्ट्रीय एकात्मतेचं सुरेल प्रतीक आहे. स्वातंत्र्यलढ्याचे मंतरलेले दिवस, बालगंधर्वांची वैभवशाली नाटकं, सी.के.नायडूंची नेत्रदीपक फटकेबाजी, सैगल, बडे गुलाम अली खां आम्ही पाहिले नाहीत; पण स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आमच्या पिढीचं बालपण एका सुरेल कालखंडात उमललं …त्या युगाचं नाव लता मंगेशकर….अ-लौकिक,दिव्य स्वरानं आमची आयुष्य उजळली.’

अवघ्या तेराव्या वर्षी प्रप्रंचाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. निर्वाहासाठी त्यांनी निवडलं चित्रपट संगीताचं क्षेत्र. कलोपासनेची दुष्कर वाट चालण्याचा वसा घेतला, वडिलांचे संस्कार एक क्षणभरही न विसरता वाटचाल केली एखाद्या व्रतस्थ योगिनीसारखी ! लतादीदी भारतीय स्त्रीचं सुरेल सांस्कृतिक प्रतीक वाटतात. अनेक भाषांच्या कविताशाखा पल्लवित करणाऱ्या दिदींनी भारतीय रसिक मनात नित्य आवाजानं, एक विशाल साहित्य परंपरा जपलेली आहे जणू सुरांचा सच्चेपणा शिकवणाऱ्या मार्गदर्शकच. जीवनातल्या सच्चेपणाला अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या गाण्यांच्या शतसूर्यमालिका, आपल्या अंधाऱ्या आयुष्याला झगमगून टाकत राहिल्या सतत, अविरत, अचूक, नित्य!  भारतरत्न झालेल्या लता मंगेशकर. गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी अशी अनेक आभूषणं ल्यालेली लता. प्राणवायू एवढाच जीवनात आवश्यक लतादीदींचा आवाज ! देवी स्वरस्वतींच दुसरं रूप म्हणजेच लता मंगेशकर. सहस्त्रकातला अजरामर स्वर म्हणजे लता मंगेशकर.

          लता मंगेशकर ! या सात अक्षरांमध्येच ‘सा रे ग म प ध नी’ हे सप्तसूर दडलेले आहेत. तमाम भारतीयांच्या रसिक मनावर गेली कित्येक दशके अधिराज्य गाजविणारी ही अनभिषिक्त सम्राज्ञी आहे. जगातील जेवढी म्हणून सुंदरतेची, गुणवत्तेची आणि कलात्मकतेची विशेषणं आहेत, ती लताच्या स्वराला-गीतांना दिलेली आहेत. तमाम साहित्यिकांनी, विचारवंतानी, राजकीय तत्ववेत्त्यांनी जसा लताचा स्वर आपल्या काळजात घर करून ठेवला तितकाच किंबहुना काकणभर सरस इथल्या सामान्य जिणं जगणाऱ्या कामगारांपासून थेट महालात राहणाऱ्या अमीरजाद्यांनी या स्वरावर प्रेम केलं. लतादीदी या नावाभोवतीचं वलय आजही कायम आहे. कलेच्या अवकाशात जे स्वयंभू आहे तेच चिरकाल टिकते. मानवी जीवाला शांत करण्याचे सामर्थ्य आणि तृप्तीचा आनंद ज्या अनभिषिक्त सूर सम्राज्ञीच्या आवाजात आहे. तिच्याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते…..

‘ ऐकता गाणे लताचे, मानितो आम्ही ईश्वराला ’

‘ युगायुगातुनी अवतरले ही सुरमयी स्वरलता

भारतकन्या या देशाची शान, मान, महता ’

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment