– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

30 Years of Music Director Duo Jatin-Lalit
“बिन तेरे सनम मर मिटेंगे हम, आ मेरी जिंदगी … 
आना ही पडा सजना, जालीम है दिल की लगी … “
माझा इयत्ता आठवीत प्रवेश झालेला. म्हणजे हायस्कुल मध्ये पदार्पण. मिसुरडं फुटायला अवकाश असतो  पण हलकी लव आलेली असते असे ते कुमार वय. या वयात जी गाणी कानांना आनंद देतात ती आयुष्यभरासाठी ‘गोल्डन मेमरी’च्या रकान्यात जाऊन बसतात. अशा रकान्यातील पहिल्या काही गाण्यांपैकी वरील गाणं. तेंव्हा ना हिरो आवडलेला ना ती काहीशी चकन्या डोळ्याची हिरोईन. पण गाणं मात्र भन्नाट आवडलेलं. संगीतकार कोण वैगरे हे प्रश्न या वयात गौण असतात. असो. तर आता मूळ विषयाकडे येतो. आज या गाण्याची आठवण काढायचं कारण म्हणजे हे गाणं रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा दिसण्याला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. होय, ‘यारा दिलदारा’ सिनेमा नावाचा आसिफ शेख आणि रुचिका पांडे या जोडीचा सिनेमा आजच्या दिवशी १९९१ साली प्रदर्शित झाला. तेंव्हा गौण असलेला संगीतकार कोण होता हा प्रश्न आज मात्र महत्वाचा ठरतो. कारण या सिनेमाने पदार्पण झाले होते सुप्रसिद्ध संगीतकार जोडी ‘जतीन-ललित’ चे! (Music Director Duo Jatin-Lalit) म्हणजे आज या जोडीला पूर्ण झाली आहेत ३० वर्षे. 

आम्ही आमचे कुमार वय आणि नंतर तारुण्यात पदार्पण केले ते ९० च्या दशकात. म्हणजे पदवी हातात आली ती बरोबर २००० साली. कोणी कितीही नावे ठेवली तरी १९९० ते २००० हा आमच्यासाठी तसे पाहता संगीताचा सुवर्णकाळ. या सुवर्णकाळावर माझ्यासारख्या सिनेरसिकांना तुम्ही कुठलाही विषय द्या … आम्ही कितीही कागद काळी करू शकतो .. (सॉरी आता लिहिणं बंदच झालंय त्यामुळे स्क्रीन म्हणावे लागेल. तर आम्ही कितीही स्क्रीन काळी करू शकतो.) आणि नेमका हाच काळ जतीन-ललित या संगीतकार जोडीसाठी अत्यंत महत्वाचा ठरला. आमची बाप मंडळी सुद्धा म्हणतात की ९० च्या गाण्यांचे बोल अगदीच सुमार जरी असले तरी या दशकात मेलडी जिवंत होती. हिंदी चित्रपटसंगीताच्या मेलडीचे हे अखेरचे दशक असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी होतो.

मग ही मेलडी ज्यांनी जिवंत ठेवली अशा संगीतकार जोड्यांमध्ये जसे नदीम श्रवण होते तसेच जतीन-ललित सुद्धा अग्रस्थानी होते. ‘यारा दिलदारा’ पासून सुरु झालेल्या या प्रवासातील महत्वाचे टप्पे कोणते होते त्या प्रमुख नावांवर एक नजर टाकू यात. जो जीता वही सिकंदर, खिलाड़ी, राजू बन गया जेंटलमैन, कभी हाँ कभी ना, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, खामोशी, यस बॉस, जब प्यार किसीसे होता है, कुछ कुछ होता है, प्यार किया तो डरना क्या, प्यार तो होना ही था, खूबसूरत, सरफरोश, गुलाम, मोहब्बतें, कभी ख़ुशी कभी गम, चलते चलते, हम तुम आणि अखेरचे नाव म्हणजे २००६ सालचा फना. १५ वर्षात असे १९ चित्रपट (ज्यातील काहींनी तर इतिहास घडविला) ज्यांची प्रमुख ओळख त्यांचे सुमधुर आणि सुपरहिट संगीत हीच होती. २००६ नंतर या दोघांनी वेगळे होण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला म्हणून ‘फना’ हा अखेरचा चित्रपट. या १९ चित्रपटांव्यतिरिक्त फरेब, संघर्ष इत्यादी सिनेमांसारखी अशीही नावे आहेत ज्यातील एक किंवा दोन गाणी आजही एव्हरग्रीन या सदरात मोडतात. असो. उल्लेख केलेल्या सर्वच चित्रपटातील गाण्यांविषयी विस्ताराने लिहीत बसण्यात अर्थ नाही.

अतिशय दुर्भाग्य म्हणावे अशी एक गोष्ट जतीन-ललित या जोडीविषयी इथे सांगतो. बहुतांश संगीत रसिकांना त्याबद्दल माहिती असेलही. खासकरून त्यांच्या संगीताच्या चाहत्यांना. उत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड साठी तब्बल ११ वेळा नामांकन होऊनही एकही वेळेला ते स्वीकारण्यासाठी त्या स्टेजवर चढण्याचे भाग्य या जोडीला त्यांच्या उभ्या करिअर मध्ये मिळाले नाही. वर उल्लेख केलेल्या १९ पैकी चला १८ चित्रपट सोडून देऊ यात पण निदान ‘डीडीएलजे’ म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारखा सुमधुर संगीताने सजलेला व हिंदी चित्रपट इतिहासात सर्वाधिक चालणारा चित्रपट अशी ज्याची नोंद आहे असा चित्रपट व त्याच्या संगीतकाराला किमान एक तरी फिल्मफेअर मिळायला हवे की नाही? पण दुर्दैव. जतीन ललित यांना ११ वेळा नामांकन मिळूनही बहुतांश वेळा पुरस्कार जिंकला तो नदीम-श्रवण आणि ए.आर. रहेमान या दोघांनी.  डीडीएलजे च्या वेळी अगदी हाताशी आलेला हा पुरस्कार ए. आर. रहेमान यांनी जिंकला. सिनेमा होता रंगीला. अर्थात त्यांच्याच सिनेमाच्या नावाप्रमाणे बोलायचे झाल्यास जो जिता वही सिकंदर. अर्थात फिल्मफेअर म्हणजेच प्रमाण अथवा उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब मानण्याचे काहीही कारण नाही. त्यामागे चालत असलेल्या राजकारणाची बरीच चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. असो. मध्यंतरी बीबीसीने ऑनलाईन वोटिंग घेतली होती. अलीकडच्या दोन दशकातील बॉलिवूडमधील टॉप टेन अल्बम्स वर. त्यात डीडीएलजे पहिल्या तर कभी ख़ुशी कभी गम दुसऱ्या व  कुछ कुछ होता है तिसऱ्या क्रमांकावर होते. 

पण असे असूनही जतीन-ललित प्रेमींच्या यादीत टॉप वर कुठला सिनेमा असेल तर तो आहे नाना पाटेकर-मनीषा कोईराला अभिनीत ‘खामोशी-दि म्युझिकल’. यातील प्रामुख्याने बाहों के दरमियाँ, ये दिल सुन रहा है व आज मैं ऊपर आसमाँ नीचे ही तीन अवीट गोड अशी गाणी म्हणजे जतीन-ललित जोडीने हिंदी चित्रपट संगीतावर ९० च्या दशकात चढविलेला कळस होता असे मला वाटते. त्यात या गाण्यांमधील कविता कृष्णमूर्ती चा आवाज …अहाहा!  रबडी सोबत जिलेबी अथवा आईस्क्रीम सोबत गुलाब जामून असं काहीसं हे कॉम्बिनेशन आहे! 

मला या जोडीच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी काही गाणी अगदी ऑल टाईम फेव्हरेट लिस्ट मध्ये आहेत. ती म्हणजे – १. रूठ के हमसे कभी जब चले जाओगे तुम (जो जीता वही सिकंदर) २. सीने में दिल है (राजू बन गया जेंटलमैन) ३. दिल तेरे नाम से धड़कता है (आदमी)  ४. वो तो है अलबेला (कभी हाँ कभी ना) ५. दिल क्या करे (शीर्षक गीत) ६. होशवालों को खबर क्या (सरफ़रोश) ७. मेरी दुनिया है (वास्तव) ८. मैं अधूरी सी एक उदासी हूँ (खूबसूरत) ९. अजनबी मुझको इतना बता (प्यार तो होना ही था) १०. एक दिन आप यूँ हमको मिल जायेंगे (यस बॉस) ११. आँखों दिलमें उतर के तू मेरी धड़कन में है (फरेब)

९० च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीतातील “यहाँ के हम सिकंदर” असं काहीसं या जोडीबद्दल म्हणावं लागेल ज्यांच्या जादुई संगीताने त्या काळातील तरुणाईवर ‘पहेला नशा पहेला खुमार’ चढावा अशी जादू केली. २००० चं दशक मध्यावर येईपर्यंत ज्यांच्या संगीताची जादू ओसरली नव्हती कारण तोवर ही रसिक गातच होते “जिद है अब तो है खुद को मिटाना, होना है तुझमें फना “

थँक्स जतीन-ललित जी आमच्या कुमार वयात आणि तारुण्यात रंग भरल्याबद्दल. ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. अजूनही एकत्र येऊ शकता. विचार करा. तुमचा चाहता. 

हिंदी सिनेमाच्या ९० च्या दशकावरील इतर लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment