— © नयना पिकळे

पावसाचं आणि संगीताचं जन्मोजन्मीचं नातं . म्हणून तर पाऊस म्हटलं की गुणगुणणं ओघाने येतंच.
लहानपणची पावसाची सर्वात पहिली आठवण म्हणजे आई, आजी सोबत बोबड्याने म्हटलेलं
“ये रे ये रे पावसा”
किंवा
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच”

गंमत म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तसतसा पाऊसही आपल्या सोबतच मोठा होत असतो.
मग शाळेत कधीतरी
“सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेमध्ये पाणी साचून
सुट्टी मिळेल काय”
असा प्रश्नही त्याला निरागसपणे विचारला जातो.

नंतर मात्र वाढत्या वयासोबत जसे आपले अनेक रंग इतरांना दिसतात ना अगदी तशीच ह्या पावसाचीही असंख्य रूपं आपल्यासमोर उलगडत जातात. जलतुषारांचा शिडकावा करत मनाला भिजवत राहतात.

आपल्याबरोबर जेव्हा हा पाऊसही तारुण्यात पदार्पण करतो तेव्हा तर ढगांच्या दर्शनाने सुद्धा मनात एक अनामिक हुरहूर दाटते.
मग कुणा तरुणीला कोणाची तरी सोबत हवीहवीशी वाटू लागते .
“काली घटा छाये मोरा जिया तरसाये”
तर दुसरी कुणी स्वप्नात येऊन छेडणाऱ्या “त्याची” प्रत्यक्ष भेट व्हावी म्हणून बेचैन होते.
“मेरे ख्वाबो में जो आये”

एखाद्या नवप्रेमी तरुणाला आपल्या प्रेयसीचं येणं पावसाच्या आल्हाददायक सरीसारखं सुखावणारं वाटत.
“कोई लडकी है
जब वो मिलती है
बारीश आती है”
तर दुसरा कुणी प्रेयसीला भेटूनही मन न भरल्याने ती लवकर आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून पावसाला हक्काने “रानी” अशी हाक मारत साकडंच घालतो …
“बरखा रानी जरा जम के बरसो
मेरा दिलबर जा न पाये
झूमकर बरसो”
आणि मग रानी देखील आपल्या याचकाची तमन्ना पूर्ण करत मुसळधार कोसळू लागते.

कधी बेभान कोसळणाऱ्या पावसाळी रात्री कोणा एका नशीबवंताला एक भीगीभागीसी लडकी (मधुबाला) भेटते. लडकी कसली अप्सरा देखील जिच्या समोर फिक्या पडाव्यात अशी सौंदर्यवतीच ती. अशावेळी त्या बिचाऱ्याची काय गत झाली असेल कल्पनाच केलेली बरी.

“एक लडकी भिगी भागी सी
सोती रातो में जागी सी”

तर दुसऱ्या एका भाग्यवंताचं मन ह्याच अप्सरे बरोबरची भर पावसातली अविस्मरणीय भेट आठवून त्या भेटी भोवती घुटमळत राहतं.
“जिंदगीभर नही भूलेगी
वो बरसात की रात”

कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सर्वांना कोड्यात पाडत एखादी चुलबुली लडकी पावसाचा मनमुराद आनंद घेते.
“ना जाने कहाँ से आई है
ना जाने कहाँ पे जायेगी
दिवाना किसे बनायेगी
ये लडकी” ……

तर असा हा अगदी अनादीकाळापासून चालूच असलेला पावसाचा सिलसिला.
पण पावसाचं पहिलं लख्खं दर्शन घडविण्याचा मान जातो राज कपूरला .
त्याच्या बरसात (१९४९) मध्ये.
“बरसात में हमसे मिले
तुम सजन तुमसे मिले
हम बरसात में”
म्हणत पावसाने खऱ्या अर्थाने वाजतगाजत पडद्यावर पदार्पण केलं.

नुकत्याच वयात आलेल्या ह्या पावसाचं धारिष्ट्य तरी बघा, एकट्या सुंदर गीता बालीला बघताच तिची छेड काढली. तिने तक्रार तरी किती गोड करावी ….
“देख के अकेली मोहे
बरखा सताए रे
गालों को चुमें
कभी छींटें उडाये रे
टीपटीप टीपटीप टीपटीप”

त्यानंतर आलेल्या श्री ४२० (१९५५) मध्ये मात्र
“प्यार हुआ इकरार हुआ है
प्यार से फिर क्यूं डरता है दिल”
अस गात राज – नर्गिस सोबत पावसानेही प्रेमाची गोडी चाखली …

कालाबाजार (१९६०) मध्ये देव आनंद – वहिदा सोबत हाच पाऊस
“रिमझिम के तराने लेके आई बरसात
याद आयी किसीसे वो पहली मुलाकात”
म्हणताना एकदम nostalgic झाला

मेरा गाव मेरा देश (१९७०) मध्ये धर्मेंद्र – आशा पारेख बरोबर ह्या पावसाने
“कुछ कहता है ये सावन”
म्हणत गुजगोष्टी केल्या

नया जमाना (१९७१) मध्ये
“रामा रामा गजब हुई गवा रे”
म्हणत हेमा मालिनीच्या मनातल्या मूक भावना व्यक्त केल्या ….

आणि मंझील (१९७९) मध्ये तर चक्क अमिताभ – मौशमी चटर्जीचं बोट पकडून हा पाऊस “रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन”
म्हणत South Mumbai च्या रस्त्यांवर भटकूनही आला.

अशा ह्या पावसाचं प्रत्येक रूप मनाला भुरळ पडणारं.

पाऊस एन्जॉय करायला ज्यांना जिवलगाची सोबत असते ना त्यांचं काही विचारूच नका.
पावसाचा मनसोक्त आनंद घेत, कधी दंगामस्ती करत, चिखलात यथेच्छ लोळत, तर कधी धिंगाणा घालत नायक नायिकांबरोबरच रसिकांनीही अशी कैक evergreen पावसाळी गाणी एन्जॉय केली.

“दिल तेरा दिवाना है सनम”
आणि
“झुमता मौसम मस्त महिना”

ही गाणी नुसती ऐकली तरी पावसात चिंब भिजल्याचा आनंद मिळतो . शम्मीकपूर – माला सिन्हाने पडद्यावर धुसमुसळेपणाने अस्सा काही हवाहवासा धुमाकूळ घातला आहे की विचारू नका . त्यामुळे ही गाणी जितकी श्रवणीय तितकीच प्रेक्षणीय सुद्धा आहेत.

जितेंद्र – लीना चंदावरकरचं “हाय रे हाय, नींद नहीं आय”
राजेश खन्ना – झीनत अमानचं “भिगी भिगी रातों में”
अमिताभ – स्मिता पाटीलचं “आज रपट जाये तो हमे ना उठैय्यो ”
ही सगळी गाणी सुद्धा ह्या धुमाकूळ पठडीतलीच.

आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे अनिल कपूर – श्रीदेवीचं
“लो आज मैं कहती हूँ …. आय लव्ह यू”
हे अफाट sensuous गाणं ऐकून तर तरुण, वृद्ध सगळेच रोमांचित होतात.

हे पाऊस प्रकरण खरंतर अजबचं म्हणायला हवं….
एकीकडे दोन प्रेमी जीव पावसात भिजून तृप्त होत असतात तर दुसरीकडे कोणी मजबूर होऊन प्रियकराला साद घालतं
“हाय हाय ये मजबुरी
ये मौसम और ये दूरी”

जिवलग जवळ असूनही त्याच्याबरोबर पावसाची मजा लुटता येत नाही तेव्हा हे अल्हाददायक पावसाचे थेंब अक्षरशः आग लावतात ….

“अब के सजन सावन में
आग लगेगी बदन में”

तनामनाची तहान भागवण्याऐवजी पावसाचं पाणी ती अधिकच भडकवतं
“टिप टिप बरसा पानी
पानी ने आग लागा दी”

कधी हा पाऊस दोन प्रेमिकांच्यात आगीचा नुसता भडका उडवून देतो.
“जाने दो ना पास आओ ना”
छुओ ना छुओ ना मुझे
छुओ ना छुओ ना मुझे
छु sss ओ sss ना”

तर कधी बिजली बनून त्यांच्यावर कोसळतो.
“बादल यु गरजता है
डर कुछ ऐसा लगता है
चमक चमक के
लपक के ये बिजली
हमपे गीर जायेगी”

प्रियकरा बरोबर पावसाची उत्कटता अनुभवलेली कोणी ललना मग पावसाच्या सरी बरोबरच सजनाच्या आठवणीत रमते.
“ओ सजना, बरखा बहार आई”
दुसरी आर्ततेन आपल्या प्रियकराला बोलवते ,
“सावन के झुले पडे तुम चाले आओ”
तर कुणी पावसाच्या पाण्याबरोबर डोळ्यातील आसवांनाही वाट करून देते
“लगी आज सावन की फिर वो झडी है”

अशावेळी विरहातही एक विलक्षण आर्तता जाणवते.
“घर आजा घीर आये बदरा साँवरिया”
“मेघ छाये आधी रात बैरन बन गयी निंदिया”

काहीजणांना मात्र हा पाऊस आपल्या प्रियकराशिवाय नकोसाच वाटतो
“जारी जारी ओ कारी बदरवा
मत बरसो री मेरी नगरिया
परदेस गये है सांवरिया”

किती असंख्य मनोहारी रूप आहेत ना पावसाची?
वरील सर्व गाण्यां व्यतिरिक्त आणखीनही काही अनोखी रूपं आहेत.
काही वेगळ्याच धर्तीची पावसाळी गाणी आहेत ज्यांचा उल्लेख टाळणं अशक्य.

दो आंखे बारह हाथ (१९५७) मधलं
“ओ उमड घुमड कर आयी रे घटा”
हे माझ्या मते वर्षा ऋतूच्या स्वागतार्थ गायलेलं सर्वोत्कृष्ट गीत.
ह्यातलं
“नन्हीं-नन्हीं बूँदनियों की
खनन-खनन खन
खन्जरी बजाती आई
देखो भाई बरखा दुल्हनिया ”
हे गीतकार भरत व्यास यांचे शब्द लताच्या आवाजात ऐकताना बरखा दुल्हनियाच्या नन्ही नन्ही बुन्दनियांचा तनामनावर गारेगार शिडकावा झाल्याखेरीज राहत नाही.

परदेसी (१९५७) मधलं
“रिमझिम बरसे पानी
आज मोरे अंगना”
हे मीना कपूर – मन्ना डे यांच्या आवाजात भिजलेलं असंच एक श्रवणीय गोड गाणं.

छलिया (१९६०) मधलं
“डमडम डिगा डिगा
मौसम भीगा भीगा”
एकटा जीव सदाशिव असलेल्यांच्याही चित्तवृत्ती प्रसन्न करून पाऊस त्यांना मस्तमौला बनवतो याचा पुरावा देणारं हे गीत ….

काही दुर्दैवी अभागी जीवांची मात्र पावसाची चाहूल लागताच तगमग होते, मन हळवं होत आणि मग त्यांची मूक व्यथा अशी व्यक्त होते …
“अब के बरस भेज भैय्या को बाबुल
सावन में दीजो भिजाय रे” (बंदिनी – १९६३)

सुनील दत्त – आशा पारेख यांच्या
“इतना ना मुझसे तू प्यार बढा” ( छाया – १९६१ )
गाण्यात देखील अशीच वेगळी भावना आहे.
या गाण्यात प्रत्यक्ष पाऊस नसला तरी बादल आणि जलधारेचं रूपक वापरून नायक नायिकेतलं प्रेम अतिशय वेगळ्या प्रकारे व्यक्त केलं आहे.
ह्यात तलतच्या आवाजातली कंपनं जणू बादलचं आवारापन दर्शवतात तर लताचा नितळ आवाज भटक्या जीवाला स्थैर्य देणारी जलधाराच बरसवते.

आणि ह्या सर्व गाण्यांवर मात करणारं Ultimate गाणं म्हणजे गाईड (१९६५) मधलं सचिनदांनी आपल्या आगळ्या आवाजात अजरामर करून ठेवलेलं
“अल्ला मेघ दे , पानी दे
छाया दे रे तू रामा मेघ दे”
ही आर्त विनवणी पावसाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व, चराचराचं अस्तित्व अबाधित राखण्यामागचं त्याचं स्थानच दर्शवते.

जसं Water is life तसंच Music is life हेही सत्यच. पाऊस आणि गाणी ह्यांना खरंतर समानार्थीच म्हणायला हवं. म्हणूनच तर सिनेसंगीतात पावसाला इतकं अढळ स्थान आहे.
एक मात्र नक्की की बरा, वाईट कसाही अनुभव असु दे कोणीही ह्या पावसात कोरडं मात्र राहूच शकत नाही.

 

Nayana Pikale
+ posts

Leave a comment