– © अजिंक्य उजळंबकर
१९६४ चा ‘हकीकत’ (Haqeeqat 1964 film) पुन्हा पाहिला. तेही ठरवून.  आज या सिनेमाने ५७ वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठरवत होतो की ‘हकीकत’ पुन्हा बघायचा. पण योग जुळून येत नव्हता. पण कालची  दुपार अखेर सत्कारणी लागली. यु-ट्यूब वर झी च्या अधिकृत चॅनेलवर ‘हकीकत’ उपलब्ध आहे. आता लिहिण्यासाठीच पाहिला असल्याने आज हा शब्दप्रपंच. पण हे काही हकीकतचे चित्रपट परीक्षण नाही. रिव्हिजिटींगचा अनुभव म्हणता येईल फारतर.
चेतन आनंद (Director Chetan Anand) . देव आणि विजय आनंद यांचे ज्येष्ठ बंधू. देव यांच्यापेक्षा ८ वर्षांनी तर विजय यांच्यापेक्षा १९ वर्षांनी मोठे. १९४६ साली नीचा नगर या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतल्यावर या चित्रपटासाठी थेट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म चे ग्रँड प्राईज चेतन आनंद यांनी पटकावले होते. ‘नीचा नगर’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मान मिळविणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटानंतर १९६३ पर्यंत आणखी सहा चित्रपटांचे चेतन यांनी यशस्वी दिग्दर्शन केले होते. पण २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर १९६२ दरम्यान महिनाभर चाललेल्या भारत-चीन युद्धानंतर चेतन यांच्या डोक्यात या विषयाने पक्के अतिक्रमण केले होते. अगदी चीनने तेंव्हा लदाख मधील भारतीय जमिनीवर केले तेवढे पक्के. चेतन हे मुळात इतिहासाचे विद्यार्थी. सिनेमात पाऊल टाकण्याआधी इतिहासाचे शिक्षक होते व उत्तीर्ण झाले नसले तरी लंडनला जाऊन ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस’ ची परीक्षा देऊन आले होते. काही काळ बीबीसी साठी पत्रकारिता पण केली. अशी सर्व पार्श्वभूमी असलेला चित्रपट दिग्दर्शक माणूस या युद्धानंतर गप्प बसेल ही अपेक्षा करणेच चुकीचे. ©
त्यादृष्टीने मग चेतन यांनी या विषयावर संशोधन सुरु केले, प्रत्यक्ष संबंधितांच्या भेटी घेतल्या व युद्ध भूमीवर घडलेल्या घटनांचा अभ्यास केला व चित्रपटाची कथा लिहिण्यास प्रारंभ केला. कथा लिहून पूर्ण झाल्यावर १९६३ साली हिंदी सिनेमाच्या पहिल्या युद्धपटाचे अर्थातच ‘हकीकत’ चे शूटिंग सुरु झाले. शूटिंग सुरु झाले थेट लदाख येथे. हो पहिला बॉलिवूड चित्रपट ज्याचे शूटिंग लदाखला झाले. १४००० फुट उंचीवर चित्रीकरण करण्याच्या, त्याही १९६३ साली, आर्थिक व तांत्रिक मर्यादा असल्याने, संपूर्ण चित्रपट जरी लदाख येथे चित्रीत झाला नसला तरी, बराच भाग ऍक्च्युअल लोकेशन्सवर शूट करण्यात आला होता. चित्रपट पाहताना ते जाणवते. चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट आहे ही सल मात्र मनाला बोचत राहते. नयनरम्य हिमालयाचा हा परिसर रंगीत रिळांमध्ये अजून खुलला असता. असो.
कथानक सुरु होते कॅप्टन बहादूर सिंग (धर्मेंद्र/Dharmendra) या लदाखजवळ पोस्टिंग असलेल्या सैनिकाच्या, त्याच परिसरातल्या रहिवाशी असलेल्या अंगमो (प्रिया राजवंश/Priya Rajvansh) सोबत असलेल्या प्रेमाच्या भावनेतून. बहादुरचे वडील ब्रिगेडिअर सिंग (जयंत/Jayant)असतात व बहादूरचे वरिष्ठ असलेले मेजर रणजित सिंग (बलराज साहनी/Balraj Sahni) यांचे जवळचे सहकारी असतात. अंगमोचा लहान भाऊ सोनम बहादूरचा लाडका असतो कारण सोनमला सैन्यात भरती होण्याची इच्छा असते. बॉर्डरवर तणाव वाढलेला असतो त्यामुळे सैन्याला सर्व फॉरवर्ड पोस्टवर अलर्ट ठेवलेले असते. एकीकडे ‘हिंदी-चिनी भाई भाई’ चा नारा देणारे चिनी सैनिक तर दुसरीकडे तेच सैनिक युद्धाची धमकीही देत असतात व सातत्याने चिथावणीखोर भाषा वापरत भारतीय सैन्यास पोस्ट सोडून जाण्याची धमकी देत असतात. भारतीय जमिनीवर पाय ठेऊन चिनी सैन्य उभे असते पण आपल्या सैन्यास पहिली गोळी न झाडण्याचे आदेश असतो. मग एके दिवशी अचानक चीनतर्फे हवाई हमला केला जातो व त्यानंतर हजारोंच्या संख्येने चिनी सैनिक चालून येतात. चीनच्या ३०० च्या वर सैन्याच्या एका तुकडीचा सामना करण्यास आपले २०-३० सैनिक इतकी कठीण परिस्थिती असते. शिवाय कित्येक दिवस सैन्याला हवाईमार्गे काही मदतही मिळत नाही. ना शस्त्रांची ना खाण्यापिण्याची. शिवाय एकानंतर एक पोस्ट रिकाम्या करून परत येण्याचे सातत्याने वरिष्ठांकडून आदेश दिले जातात. या सर्व प्रकारामुळे सैन्याचे पूर्णतः शारीरिक व मानसिक खच्चीकरण होत जाते व अखेर एका महिन्याच्या कठीण संघर्षांनंतर भारतीय सैन्य माघार घेते व जिथपर्यंत चिनी आत आले आहेत तिथपर्यंत ‘जैसे थे’ आदेशाने भारत हे युद्ध हरतो. ©
Dharmendra in Haqeeqat
चित्रपटात शहीद झालेल्या सैनिकांच्या पात्रात आहेत अभिनेते सुधीर (Sudhir), मॅकमोहन (MacMohan), संजय खान (Sanjay Khan) व धर्मेंद्र. आपल्या सैनिक प्रियकराच्या मदतीस क्लायमॅक्स मध्ये धावून येणारी लदाखी तरुणी अंगमो ही सुद्धा अखेरीस लढता लढता वीर गतीस प्राप्त होते. “कर चले हम फिदा जानो तन साथीयों, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों” गाण्याने चित्रपटाचा शेवट होतो.
हकीकत हा नावाप्रमाणेच हकीकत दाखवतो तेही अगदी नॉन फिल्मी स्टाईलने. कुठेही पात्रांच्या तोंडी फिल्मी डायलॉग्ज नाहीत, टाळ्या घेणारे युद्धखोर संवाद नाहीत व उगाचच घातलेली गाणी नाहीत. इथेच तो मनात घर करतो. चेतन यांनी जे घडलंय, तेच दाखवलंय. पण असे करतांना तो कुठेही डॉक्युमेंट्रीकडे पण झुकत नाही हे विशेष. कारण कथेला असलेली धर्मेंद्र-प्रिया राजवंश जोडीच्या नाजूक प्रेमाची झालर. सुधीर, मॅकमोहन, बलराज साहनी, विजय आनंद आदींनी साकारलेल्या प्रत्येक सैनिकाच्या कहाणीमुळे ‘हकीकत’ हा केवळ युद्धपट न राहता सैनिकाच्या मानवी भावनांचा एक आरसा बनून जातो. ©
Dharmendra in Haqeeqat
त्यात कैफी आझमी (Kaifi Azami) यांच्या महान लेखणीने लिहिलेल्या गीतांनी व मदनमोहन (Music Director Madan Mohan) यांच्या सुरेल संगीताने चित्रपटाचा पुरता माहोलच बदलून टाकलाय. “होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा” या गाण्यात सैनिकांना येत असलेली घरच्यांची आठवण व लागलेली घराची ओढ बघून प्रेक्षकांना दाटून न आले तर नवल. घरातील मुलाच्या, पतीच्या, भावाच्या, दिराच्या आठवणीत रडणारी मंडळी, दिवाळीचा सण आलाय पण आपला माणूस जिवंत आहे कि मेला हे सुद्धा माहित नसलेले त्याच्या घरचे जेंव्हा “आई अबके साल दिवाली मुंह पर अपने खून मले” हे गीत गातात तेंव्हा ती घालमेल बघवत नाही. “जरा सी आहट होती है तो दिल सोचता है” गाण्यातली आपल्या सैनिक प्रियकराच्या वाटेत बसलेली प्रेयसी बघतांना प्रिया राजवंश जरी तितकी प्रभावी वाटली नव्हती तरी लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने अगदी नेमका परिणाम साधलाय. अभिनयाच्या बाबतीत धर्मेंद्र असो वा बलराज साहनी सर्वच कलाकारांनी अविस्मरणीय असा अभिनय केलाय.
Haqeeqat 1964 film
हकीकत ने त्यावर्षीचा ‘उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार’ पटकावला. एम एस साथ्यु यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासाठी चित्रपटाचा स्पेशल शो ठेवण्यात आला होता. व्यस्ततेमुळे त्यांनी थोडा वेळच बसून चित्रपट बघण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राधाकृष्णन अखेरपर्यंत हलले नाहीत.© २ तास ५० मिनिटांचा पूर्ण चित्रपट पहिला व अखेरीस तोंडभरून कौतुक केले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मात्र हकीकत बघू शकले नाहीत कारण चित्रपट त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला होता.

बलराज साहनी अभिनीत चित्रपटातील तीन सीन्स मधले संवाद पण नेमके लिहिले गेले आहेत. एक सीन आहे ज्यात ते भारतीय सैनिकांना समजावून सांगतात की भारत कशा प्रकारे कधीच दुसऱ्या देशावर हल्ला करत नाही आणि त्यांची जमीन बळकावत नाही. दुसरा सीन ज्यात पूर्ण थकलेल्या सैन्यात ते जोश भरतात व म्हणतात के- “जिस्म जवाब दे नही सकता जब तक अंदर हिम्मत कि चिंगारी है” व तिसरा सीन ज्यात ते पोस्ट सोडायचा आदेश आल्यावर खचून जातात व म्हणतात की- ” मुझे सिपाही चाहिए, बंदुके चाहिए, मुझे क्यों यहां से निकलने के लिए कहा जा रहा है?”
चित्रपटाच्या अखेरच्या भागात दिवाळीच्या दिवशी ब्रिगेडिअर सिंग (जयंत) हरलेल्या, थकलेल्या सैन्याशी आपल्या खमक्या आवाजात संवाद साधतात तो सीन चित्रपटातला सर्वोत्कृष्ट ठरावा. विशेष म्हणजे हा संवाद साधण्याच्या वेळीच नेमकी त्यांना आपला मुलगा बहादूर शहीद झाल्याची बातमी कळालेली असते. ते म्हणतात “चीनला, त्यांच्या राष्ट्रप्रमुखाला आपल्या देशाने, नेहरूंनी किती डोक्यावर घेतले, प्रेम दिले पण तरीही चीनने आपला विश्वासघात केला. पाठीत सुरा खुपसला.” अशा आशयाचा तो संवाद. नेमका व थेट. आजही इतक्या वर्षांनी तितकाच खरा.
१९६२ पासून ते आजपर्यंत एकच सत्य सातत्याने वारंवार अधोरेखित होते जे आपण नाकारू शकत नाही ते म्हणजे चीनवर भारताने कधीच विश्वास ठेऊ नये. हीच ‘हकीकत’ आहे.
थँक्स चेतन आनंद जी. 
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.