-जयश्री जयशंकर दानवे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

गीता दत्त, एक असामान्य प्रतिभाशाली गायिका (Singer Geeta Dutt). तिच्या एका आवाजात अनेक पैलू लपलेले होते. कधी अतृप्त आत्म्याची व्याकुळता तर कधी भारावून टाकणारा, भावनेचा परमोच्च बिंदू गाठणारा, कधी उद्दीपित करणारा मादकपणा तर कधी अल्लड तरुणीचा खट्याळपणा, कधी व्याकुळतेची परिसीमा तर कधी योगिनीचा आर्त उत्कट भक्तिभाव. भारतीय नारीच्या मोहक भावछटा तिने आपल्या गाण्यातून खुबीने व्यक्त केल्या आहेत. जगाच्या अंतापर्यंत प्रतीक्षा करणारी विरहिणी, उपेक्षेच्या दारूण दु:खाने उन्मळून पडणारी अर्धांगिनी, प्रियकराच्या नुसत्या चाहुलीने नखशिखांत मोहरून जाणारी अभिसारिका, त्याची अलगद फिरकी घेणारी अल्लड प्रेमिका, त्याच्यात आत्मविश्वास जागृत करणारी स्फूर्तिदायिनी, त्याच्या जवानीला आव्हान देणारी मदिराक्षी. ही तिची शेकडो गाणी ऐकूनही यातली खरी गीता कोणती हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. (Geeta Dutt One of the Finest Singer of Golden Era of Hindi films)

पूर्व बंगालमधील फरीदपूर शहरात तिचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. सरंजामशाही अर्थव्यवस्थेतील जमीनदाराच्या कुटुंबात गीतादत्तचा जन्म झाला हे खरे पण ते रईसपण आणि रुबाब गीतासाठी नव्हते.बंगालमधील राजकीय सारीपटावर काही वेगळेच घडत होते. जमीनदारी विरुद्ध जनक्षोभ होताच शिवाय साहजिकच एक अस्थिरता सगळीकडे होती. देवेंद्रनाथ राय चौधरी यांनी अखेर जमीनदारीचा व्यवसाय संपवून मुंबईला स्थलांतरणाचा निर्णय घेतला तो काळ होता १९४२ चा. तेव्हापासून हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यावेळी गीता १२,१३ वर्षाची होती. गीता दहा जणांपैकी एक अपत्य होती. सावळ्या पण देखण्या चमकदार डोळ्यांच्या गीताला लहानपणी रंगा म्हणायचे. रॉय कुटुंबीय आता मुंबईकर झाले होते. अस्थिरता ही गीताच्या आयुष्यात कायमची वस्तीला आली ती येथपासूनच. त्या काळात ते दादरच्या एका चाळीवजा इमारतीत एका शाळेच्या वरच्या मजल्यावर राहात होते. एका सकाळी गीता स्वत:च्याच तंद्रीत गात होती. तिचे मधाळ स्वर तिच्या घराखालून जात असता संगीतकार हनुमान प्रसादजींच्या कानी पडले. त्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी गीताचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सर्व जगाला ऐकविण्याचा निर्धार केला. त्यांच्या ‘भक्त प्रल्हाद’ चित्रपटासाठी गीताने सर्वप्रथम पार्श्वगायन केले. या चित्रपटामधील गाणी विशेष लोकप्रिय झाली नसली तरी गीताच्या भावनाप्रधान आवाजाने संगीतकार सचिन देव बर्मन मात्र भारावून गेले.

बर्मनदांच्या पुढच्या चित्रपटासाठी त्यांनी गीताला बोलावले आणि हा गीतासाठीचा मोठा ब्रेक-थ्रू नक्कीच होता. शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी, नूरजहां, सुरैय्या यांच्या आवाजाची मोहिनी रसिकमनांवर अधिराज्य गाजवत होती. सचिन देव बर्मन यांचा विश्वास मात्र अनाठायी ठरला नाही. ‘मेरा सुंदर सपना ’ सोबत ‘याद करोगे’ हे गाणे देखील गाजले. गाण्यामध्ये तिनं टाकलेला हलका उसासा दर्दी रसिकांची दाद घेऊन गेला. हे असले बारकावे कुणी शिकवून आत्मसात करता येत नाहीत; तर ते उपजतच गळ्यात असावे लागतात. ‘दो भाई’ (१९४७) च्या या दोन गाण्यांमुळे गीता रॉय प्रकाशात आली.खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचली. तिच्या आवाजात बर्मनना आपले भावी यश दिसत होते. या चित्रपटाच्या यशामुळे साहजिकच इतर संगीतकारांना देखील गीताचे अस्तित्व जाणवले. खेमचंद प्रकाश, ज्ञानदत्त, गुलाम हैदर, श्यामसुंदर, सज्जाद इत्यादी संगीतकारांचे देखील या नव्या आवाजाकडे लक्ष गेले. गीता रॉयने देखील त्यांचा विश्वास सार्थ केला.

संगीतकार रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘बावरे नैन’ (१९५०) मधील मुकेश बरोबर गायलेले ‘मुहब्बत करनेवाले गम से घबराया नहीं करते, खयालोंमे किसी के इस तरह आया नहीं करते ’ हे युगलगीत हा लोकप्रियतेचा कळस होता. या गाण्यामुळे रोशन एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. १९५० हे सालच गीता रॉयच्या दृष्टीने अनेक नितांत सुंदर गाण्यांचे वर्ष होते. ज्ञानदत्त यांच्या ‘दिलरुबा’ मध्ये नऊ,अविनाश व्यास यांच्या ‘हरहर महादेव’ मध्ये आठ तर बुलो सी रानी च्या ‘जोगन’ मध्ये १२ गाणी गीताने गायली होती. सी.रामचंद्रच्या ‘शहनाई’ मध्ये ‘जवानी की रेल चली जाये रे’ या गाण्यात तिच्याबरोबर कोरसमध्ये लता होती तर हंसराज बहलच्या ‘चुनरिया’ मधील तिच्या गाण्यात आशा भोसलेने कोरसमध्ये गाऊन फिल्मी संगीतक्षेत्रात पदार्पण केले होते. ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिए है, ये फूल ये खुशबू ये चमन तेरे लिए है, सजन तेरे लिए है ’ या खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात गीता देहभान हरपून गायली. ‘जोगन’ मध्ये गीताने मीराबाईच्या रचना गायल्या होत्या. ‘घुंगटके पट खोल मैं तो गिरीधरके घर, ए री मैं तो प्रेम दिवानी’ आणि ‘जोगी मत जा’ या मीराबाईच्या रचनांमुळे गीतारॉयच्या आवाजातील आर्ततेला एका दृष्टीने मान्यताच मिळाली. ‘प्यासा’मधील ‘आज सजन मोहे अंग लगा ले,जनम सफल हो जाए’ गाण्यात समर्पणाची उदात्त भावना आहे तर ‘काला बाजार’ मध्ये ‘ना मै धन चाहूं ना रतन चाहूं, तेरे चरणोंकी धूल मिल जाए’ हे भजन सुधा मल्होत्राच्या साथीने तिने अतिशय सुंदर रंगविले आहे. बंगाली शैलीतील ‘देवदास’मधील ‘आन मिलो आन मिलो श्याम सावरे’ हे भजनही कानाला गोड लागते. ‘राजरानी मीरा’ मधील तिने गायलेली ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ ही पारंपारिक रचनाही उल्लेखनीय ठरली.

हा सात्विक आवाज जेव्हा ‘बाजी’ चित्रपटात आला तेव्हा बेहोशीने भरलेला हा आवाज खरा का ‘जोगन’ मधल्या साध्वीचा असा प्रश्न पडला. बर्मनदांचा बाजी (१९५१) प्रदर्शित झाला. ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, अपनेपे भरोसा है तो ये दांव लगा ले ’ असं म्हणत गीता आली. त्यावेळी पुन्हा एकदा नवा साक्षात्कार सर्वांनाच झाला. उत्तेजक, आत्मविश्वास जागरूक करणारा गीताचा आवाज, साहिरची अर्थपूर्ण रचना आणि सचिनदांचे संगीत सारेच धुंद करणारे होते. या चित्रपटाने शब्दश: बाजी मारली आणि एक नवा इतिहास घडवला. ‘जाल’ चित्रपटातसुद्धा  ‘छोडो भी ये राग पुराना दिलका’ या गाण्यातून नखरेलपणाने ‘पुराना’चा उच्चार ‘पुर्राना’ करून सहजसुंदरपणे खट्याळपणा तिने व्यक्त केला आहे. ‘सुनो गजर क्या गाए, ये कौन आया के मेरे, लाख जमानेवाले डाले दिलोंपे डाके, आज की रात पिया’ ही सगळी नवी लहेर घेऊन गीता अवतरली आणि बर्मनदाच नव्हे तर हेमंत कुमार, ओ.पी.नय्यर सारखे संगीतकार देखील गीताला झुकते माप देऊ लागले. १९५२ च्या ‘आनंदमठ’ चित्रपटात गीतादत्तला संधी देऊन हेमंत कुमारनीही आपले नशीब अजमावले. ‘जय जगदीश हरे’ म्हणत तिने त्यांना स्फूर्ती दिली.

‘बाजी’चे दिग्दर्शक आणि निर्माते गुरुदत्त गीताच्या प्रेमात पडले. २६ मे १९५३ रोजी गुरु दत्त आणि गीता रॉय विवाहबद्ध झाले. गीता रॉयची सौ. गीता दत्त झाली. यशोमंदिराची दालने त्यांच्यासाठी उघडली गेली. तिच्यातील अभिसारिका आनंदाने गिरक्या घेत गुणगुणु लागली ‘ये कौन आया मेरे दिल की दुनिया में बहार आयी’, ‘न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे ’ १९५४ च्या ‘शर्त’ चित्रपटातले गीता दत्तचे गाणे आणि हेमंतकुमारचे संगीत म्हणजे त्याकाळी प्रितीचा आदर्श होता. ओ.पी. नय्यरनी गीताच्या गळ्यातील नजाकतीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. गुरु दत्त,गीता दत्त आणि ओ.पी.नय्यर या त्रिवेणी संगमातून एक कलाकृती निर्माण झाली. चित्रपट होता ‘आरपार’ (१९५४).‘ बाबुजी धीरे चलना प्यार में जरा संभलना, आss बडे धोखे है बडे धोखे है इस राहमें ’ या गीतातील सेक्सी आलाप, धुंदी आणि नशा निर्माण करणारा होता.

‘जा जा जा बेवफा, कैसा प्यार कैसी रीत रे, तू ना किसीका मीत रे, झूठी तेरे प्यारकी कसम ’ या गाण्यात भडकपणा नाही.‘ये लो मै हारी पिया, हुई तेरी जीत रे’ ही गाणी कर्णमधुर होती. ‘मिस्टर एंड मिसेस ५५’ मध्ये ‘ठंडी हवा काली घटा आ ही गयी झुमके’, ‘ उधर तुम हंसी हो इधर मै जवां हूं ’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली. १९५६ च्या ‘भाई भाई’ चित्रपटात संगीतकार मदन मोहननी सर्व गाणी लताकडून गाऊन घेतली पण एकच गाणे गीताला दिले.‘ ए दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर, ख्वाबोंपे छा गया है ’ तसेच ‘सी.आय.डी’ मधील ‘जाता कहा है दिवाने, सबकुछ यहा है सनम, बाकी के सारे फसाने, झुठे है तेरी कसम, फीफी, कुछ तेरे दिल में फीफी, कुछ मेरे दिल में फीफी, जमाना है बुरा ’ तसेच  ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहां, जरा हटके जरा बचके ये है बम्बई मेरी जान’ या गाण्यांची नशा आजही आहे.

‘गरीब जान के हमको न तुम मिटा देना, तुम्ही ने दर्द दिया है तुम्ही दवा देना ’ हे लाडिक मनधरणी करणारे गाणे असो वा ‘नन्ही कली सोने चली, हवा धीरे से आना’ हे ‘सुजाता’ मधील अंगाई गीत असो ही गीते भावप्रधान आहेत. ‘तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ या गाण्यात गीता अगदी खळखळून हसली आहे. तसेच ‘जानू जानू री काहे खनके है तोरे कंगना’ या ‘इन्सान जाग उठा’ चित्रपटात गीताने आशा भोसलेसोबत अवखळ मिश्कीलपणा छान प्रदर्शित केला आहे. ‘रिमझिम के तराने लेके’ (काला बाजार) मधला गीता दत्तचा गोड आविष्कार बाहेर कोसळत असलेल्या पावसाची रंगत वाढवतो अन पाऊस शांत झाल्यावरही तिचा आर्त स्वर घुमत असतो. ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ (सुजाता) या गाण्यात ती निरागस तर ‘आंखों में तुम दिल में तुम’ (हाफ टिकट) मध्ये ती खट्याळ अन खोडकर असते. ‘कोई दूर से आवाज दे’ (साहिब बीबी और गुलाम) मधला गूढ स्पर्श तिचाच असतो अन ‘मेरा नाम चिन चिन चू’ (हावडा ब्रिज) सारखा गिर्रेबाज आविष्कार घडवणारीही गीताच असते.

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणून गुरु दत्तने तीन क्लासिक चित्रपट केले. प्यासा, कागज के फूल आणि साहिब बीबी और गुलाम मधील गीताने गायलेले ‘न जाओ सैंय्या छुडाके बैय्या’, ‘पिया ऐसो जियामें समाय गयो रे’ तसेच ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ (कागज के फूल) किंवा ‘आज सजन मोहे अंग लगा ले’ (प्यासा) ही गाणी तर चिरंतन स्वरूपाचीच आहेत. ‘प्यासा’ चित्रपटातील ‘हम आपकी आंखोंमें आणि जाने क्या तूने कही’ ही गाणीसुद्धा खूप लोकप्रिय झाली. सुरेलता आणि माधुर्य यांची परमावधी गाठणारी लता, चतुरस्त्र गायकीचं मूर्तिमंत उदाहरण असलेली आशा; पण गीताच्या आवाजात एक वेगळंच अजब रसायन होतं. काहीजणांनी त्या आवाजाला ‘मादक’ असं विशेषण खुशाल लावलं. पण एवढ्या एका शब्दात बंदिस्त करण्याएवढा हा आवाज एकसुरी नव्हता. ऐकताना थक्क व्हावं अशा नाना छटा या आवाजाला होत्या. विलक्षण काही तरी गीता दत्तच्या आवाजात होतं. ओ.पी.नय्यर तर तिला ‘नैचरल मिरैकल’ म्हणायचे.  

खरं तर  दोन कलासक्त मनं एकत्र आली की, त्यांच्या जीवनात सुखाची बरसात होते; पण कारणं काहीही असली तरी गुरु दत्त व गीताच्या प्रीतीला दृष्ट लागली. भारतीय पतिव्रतेचं एकनिष्ठ जीवन जगणाऱ्या गीताच्या वाट्याला ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ म्हणण्याची वेळ आली. तीन मुले असूनही गुरु दत्तने १० ऑक्टोबर १९६४ रोजी अचानक आपली जीवनयात्रा संपवली. संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी काहीतरी करणे अपरिहार्य होते. गीता दत्त मग नाईलाजाने स्टेज शोज करीत राहिली. गुरु दत्तच्या मृत्युनंतर १९६६ मध्ये गीतानं ‘बधू बरन’ या बंगाली चित्रपटात नायिकेची भूमिका केली. हा चित्रपट चांगला चालला अन बंगालीत अभिनयासाठी तिला आणखी प्रस्तावही आले.पण मुंबई सोडून कोलकत्याला स्थायिक होणं तिच्या जीवावर आलं अन तिचा अभिनय प्रवास तिथंच संपला.

‘अनुभव’ चित्रपटातल्या ‘कोई चुपकेसे आके, मुझे जा न कहो, मेरा दिल जो मेरा होता’ या गाण्यांनी गीताच्या पुनरागमनाची सुखद जाणीव करून दिली. पण आता फिरून उभारी मिळणार नव्हती. शारीरिक अन मानसिकरित्या खचलेल्या या एकेकाळच्या आघाडीच्या गायिकेचे त्यानंतरचे आयुष्य गाण्याविना गेले. २० जुलै १९७२ रोजी म्हणजेच गुरु दत्त गेल्यानंतर आठ वर्षांनी स्वप्नांच्या मोहमयी दुनियेत घेऊन जाणारा हा भावुक नशीला आवाज अंतरिक्षात अखेर विलिन झाला. एका उत्कट, उत्फुल्ल आणि जीवनरसानं परिपूर्ण अशा गायकीचा अस्त झाला. मागे उरली ती तिच्या याच गायकीचा समृद्ध अनुभव देणारी गाणी. हिंदी सिनेमाच्या संगीतातील १९५० ते १९७० ही २० वर्षे सुवर्ण युगाची होती. या सुवर्णयुगाची एक साक्षीदार होती गीता दत्त. सारेच विझून गेले. मागे उरल्या फक्त हुरहूर लावणाऱ्या गीताच्या गीतरूपी आठवणी. 

हेही वाचा – कहानी ज्युबिलीकुमार….अर्थात राजेंद्र कुमारची!

 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.