– © अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

1976 Evergreen Cult Classic Hindi Film Chhoti Si Baat Starring Amol Palekar, Vidya Sinha and Asrani, Directed by Basu Chatterjee. 

आत्मविश्वास नसलेला परंतु मनाने तितकाच खरा. तरुण, प्रामाणिक, मेहनती व सरळमार्गी. पण बावळट इतका कि कोणीही सहज फसवेल. ऑफिसला जात असतांना रोज बस स्टॉप वर दिसणाऱ्या एका तरुणीवर त्याचे निस्सीम प्रेम. अव्यक्त कारण व्यक्त होण्याची हिम्मत नाही. तिलाही तो आवडत असतो पण तीही त्यासारखीच सरळ व संस्कारी तरुणी. तिच्या पुढाकाराने दोघांची ओळख होते व एकदा हॉटेलात भेटही. तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा व एक्स्ट्रा स्मार्ट कलीग अशात तिला स्वतःच्या स्कुटरवर बस स्टॉप ते ऑफिस लिफ्ट देतोय हे बघून हा आमचा बावळट तरुण एका गॅरेजमधून अवाच्या सव्वा भावात एक सेकन्ड हॅन्ड मोटारसायकल विकत घेतो. गॉगल वैगरे लावून, नवे जॅकेट घालून सिनेमाच्या हिरोप्रमाणे बस स्टॉप वरून तरुणीवर शान मारत तिला आपल्या मोटारसायकलवर बसवून ऑफिसला सोडायला निघतो. काही अंतर पुढे गेल्यावर हि खटारा मोटारसायकल बंद पडते. तरुणीचा ऑफिसमधील तोच कलीग मागून स्कुटरवर येतो व यांना बघून थांबतो. त्याची मोटारसायकल बघून म्हणतो- “ही सेकंड हॅन्ड मोटारसायकल तू त्या गुरनामच्या गॅरेजमधून घेतली आहेस ना? ३०० रु किंमत नाही याची आणि तू ३००० दिलेस? तुला तर फसवले गेलंय!”

झालं. आधीच आत्मविश्वासाची बोंब. त्यात आपल्या प्रेमासमोर झालेला पोपट. त्यात या एक्स्ट्रा स्मार्ट कलिगने आगीत ओतलेले तेल!  बेचारा अरुण! म्हणजे आपला हा तरुण. आणि त्याचं प्रेम म्हणजे प्रभा. आणि तिच्या ऑफिसमधील एक्स्ट्रा स्मार्ट कलीग म्हणजे नागेश. अनुक्रमे अमोल पालेकर, विद्या सिन्हा व असरानी. १९७६ साली सुपरहिट झालेल्या या चित्रपटाचे सार, त्याची थीम, पात्रांची मानसिक स्थिती सर्व वरील एका सीनमध्ये आलंय. चित्रपट बासू चॅटर्जी दिग्दर्शित “छोटीसी बात”

१९६९ साली दिग्दर्शनात पाऊल टाकण्याआधी बासू चॅटर्जी अर्थात बासूदा यांनी बासू भट्टाचार्य यांना ‘तिसरी कसम’ (राज कपूर, वहिदा रहेमान) मध्ये असिस्ट केलं होतं. ‘छोटीसी बात’ हा त्यांचा पाचवा चित्रपट. त्याआधी ‘पिया का घर’ व ‘रजनीगंधा’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते. हे यश पाहून निर्माता बी.आर.चोप्रा यांनी बासूदा यांना ‘छोटीसी बात’ साठी निर्माता म्हणून होकार दिला. अमोल पालेकर, विद्या सिन्हा ही जोडी ‘रजनीगंधा’ मध्ये प्रेक्षकांना आवडली होतीच. रजनीगंधा नंतर अमोल पालेकरांचा हा नायक म्हणून दुसराच मेनस्ट्रीम व्यावसायिक सिनेमा. शहरात राहणारा व मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा साधा सरळ तरुण ही अमोल पालेकरांची वेगळी ओळख यातून निर्माण होत होती. एकीकडे अमिताभचा लार्जर दॅन लाईफ सिनेमॅटिक ऍक्शन हिरो उदयास येत असतांनाच दुसरीकडे हा शांत, नॉन फिल्मी, मध्यमवर्गीय तरुणाशी लगेच कनेक्ट होणारा तरुण असे दोन प्रवाह ७० च्या दशकाच्या मध्यात एकाच वेळी वाहत होते हे विशेष.

‘छोटीसी बात’ मधील आत्मविश्वास गमावलेला व स्वतःचे प्रेम मिळविण्यासाठी धडपडणारा नायक अरुण त्याकाळी नवोदित असूनही अमोल पालेकर यांनी कमालीचा रंगविला होता. टेन्शन आलं, गोंधळला, खचला कि सारखं नाकावरून बोट फिरविणारा. या अरुणशी त्याच्या ऑफिसमध्ये चपराशी सुद्धा नीट बोलत नसतो. जॅक्सन तोलाराम कंपनीत काम करणारा त्याकाळचा मुंबईतील टिपिकल सरळमार्गी मध्यमवर्गीय नोकरदार तरुण. त्याच्या या साधेपणामुळेच तो खरंतर प्रभाला आवडत असतो पण ती काही न बोलता त्याची गम्मत बघत असते. वर उल्लेख केलेल्या सीन नंतर अरुण मधील न्यूनगंड खूपच वाढत जातो. रस्त्यावरील पोपटाच्या तोंडून भविष्य सांगणारे, हात बघून भविष्य सांगणारे, चुंबकीय विद्या अवगत असणारे, बुवाबाजी करणारे फसवे साधू अशा सर्वांकडे जाऊन, हाताला गंडेदोरे बांधून, राशिभविष्याची विविध पुस्तके वाचून अरुण यातून मार्ग काढण्याचा व प्रभाचे प्रेम मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतो. मग एके दिवशी अरुणला कळते कर्नल ज्युलियस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग (अशोक कुमार) यांच्याबद्दल. कर्नल खंडाळ्याला राहत असतात व अशा आत्मविश्वास गमावलेल्या तरुणांना प्रॅक्टिकल सह मोटिव्हेशन देत असतात. समाजातील मोठेमोठे लोकं, बिझनेसमॅन, राजकारणी, अभिनेते मंडळी कर्नल यांचा सल्ला घेत असतात. अरुण त्यांच्या सल्ल्याने नंतर प्रभाचे प्रेम कसे मिळवतो हा पुढील कथाभाग.

अरुण जेंव्हा कर्नल साहेबांना भेटण्यासाठी थांबलेला असतो तेंव्हा तिथे त्यांना भेटायला येतो अमिताभ बच्चन. आणि हो अमिताभ बच्चन म्हणूनच. कर्नल साहेबांचा सल्ला घ्यायला. कर्नल साहेबांना किती मोठे लोकं भेटायला येतात हे दाखविण्यासाठी बासुदांनी अमिताभ यांना हा गेस्ट रोल करण्याची विनंती केली होती. याच वर्षी ‘छोटीसी बात’ चे निर्माते बी.आर. चोप्रा यांचा अमिताभ अभिनित ‘जमीर’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यांचे चिरंजीव रवी चोप्रा यांचा दिग्दर्शक म्हणून तो पहिला चित्रपट होता. अरुण आणि प्रभा ज्या बस स्टॉपवर थांबलेले असतात त्याच बस स्टॉपवर लावलेले ‘जमीर’ सिनेमाचे मोठे पोस्टरही चित्रपटात दिसते. म्हणून ज्या दृश्यात अमिताभ कर्नल साहेबांना भेटायला येतात त्यात अमिताभ यांचा गेटअप सुद्धा ‘जमीर’ मधलाच घेण्यात आलाय.

अरुण, प्रभा व नागेश या तीन व्यक्तिरेखानंतर चित्रपटातील महत्वाची व्यक्तीरेखा म्हणजे कर्नल साहेबांची. प्रभा या आपल्या पूर्व प्रेयसीच्या नावामुळे कर्नल साहेब अरुणच्या केसमध्ये वैयक्तिक लक्ष घालतात. अरुणच्या रस्त्यात आलेला नागेश नामक काटा काढत ते अरुणचा आत्मविश्वास कमालीचा वाढवितात. आधीचा खचलेला अरुण व नंतरचा भरपूर आत्मविश्वासाने नागेश वर तुटून पडणारा अरुण, दोन्ही अमोल पालेकर यांनी लाजवाब सादर केलेत. “जानेमन जानेमन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन” म्हणत स्वतःला व प्रभाला सिनेमातील धर्मेंद्र-हेमामालिनी च्या जागी बघणारा मध्यंतरापूर्वीचा अरुण नंतर खरोखर एखाद्या हिरोप्रमाणे नागेशची सुट्टी करतो. कर्नल साहेबांमुळे झालेल्या बदलानंतर अरुणच्या शारीरिक हालचालीत, बोलण्यात, वागण्यात वाढलेला आत्मविश्वास बासुदांनी इतका अचूक दाखवलाय कि बस्स. तो दाखविण्यासाठी पटकथेत लिहिलेली दृश्ये फारच गमतीशीर व काही ठिकाणी तर अगदीच धमाल उडवून देणारी आहेत. स्वतःच्या ऑफिसमध्ये वावरतांना, विद्यासोबत बस स्टॉपवर, हॉटेलमध्ये, टेबल टेनिस खेळतांना, गॅरेजमध्ये गाडी घेतांना मनात न्यूनगंड घेऊन वावरणारा व आत्मविश्वास नसलेला अरुण नंतर याच साऱ्या दृश्यात कर्नलच्या सांगण्यावरून वागतांना जी धमाल आणतो ते बासुदांच्या भक्कम पटकथेमुळे व दिग्दर्शनामुळे शक्य झाले आहे.

अमोल पालेकर सोबतच विद्या सिन्हा व असरानी या दोघांनीही आपल्या भूमिका अप्रतिम सादर केल्यात. १९७० च्या दशकातील मुंबईतील मध्यमवर्गीय साधी सरळ नेहमी साडीत वावरणारी वर्किंग वुमन प्रभा. अरुण जेंव्हा कर्नल साहेबांकडे ट्रेनिंगला जातो तेंव्हा त्याच्या आठवणीत “ना जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ” म्हणणारी, अरुण चुकीचा वागणार नाही असा क्लायमॅक्स पर्यंत विश्वास असणारी प्रभा विद्या सिन्हा यांच्या सुंदर अभिनयामुळे कायम लक्षात राहील. अशोक कुमार यांच्याबद्दल तर काय बोलावे. अभिनयाचे दादामुनीच. त्यांनी रंगविलेला कर्नल खूपच सहज. असरानी तर धमाल. अरुणमध्ये बदल झाल्यानंतर गोंधळलेला नागेश केवळ असरानीच सादर करू शकतात यात दुमत नाही. विशेष म्हणजे अमोल पालेकर यांच्यासोबत अशोक कुमार व असरानी या दोघांनाही त्यावर्षीचे फिल्मफेअर अवॉर्ड नॉमिनेशन मिळाले होते. सोबत बेस्ट फिल्म साठी बी. आर. चोप्रा यांना तर बेस्ट डायरेक्टर साठी बासुदांना नॉमिनेशन मिळाले होते. परंतु पुरस्कार मिळाला उत्कृष्ट पटकथेला म्हणजेच बासुदांना.

‘सलील चौधरी यांचे श्रवणीय संगीत हा ‘छोटीसी बात’ चा अजून एक प्लस पॉईंट. ‘रजनीगंधा’ नंतर बासुदांसोबत त्यांचा हा लगेचच दुसरा सिनेमा गाजला. ‘जानेमन जानेमन’ (आशा भोसले, येसूदास) व लता दीदींच्या सुमधुर आवाजातील ‘ना जाने क्यों’ या गाण्यांसोबत मुकेश यांच्या आवाजातील ‘ये दिन क्या आये’ हे गीत सुद्धा मस्तच जमले होते. ‘छोटीसी बात’ च्या पोस्टर्स वर तेंव्हा गेस्ट रोल मध्ये असूनही धर्मेंद्र हेमा मालिनी यांना ठळकपणे दाखविण्यात आले होते म्हणून सुरुवातीला प्रेक्षकांना असे वाटले कि हे दोघेच प्रमुख भूमिकेत आहेत. आत गेल्यावर खरे काय ते लक्षात येऊनही चित्रपट आवडल्यामुळे त्या बाबीकडे प्रेक्षकांनी मग दुर्लक्ष केले.

१९६० सालचा ब्रिटिश चित्रपट ‘स्कुल ऑफ स्काउंड्रल्स’ या चित्रपटावरून छोटीसी बात प्रेरित होता. २००५ साली हॉलिवूडमधील विल स्मिथचा ‘हीच’ व २००७ सालचा बॉलिवूडमधील गोविंदा-सलमान खानचा ‘पार्टनर’ चित्रपटांच्या कथाही ‘छोटीसी बात’ सारख्याच होत्या.

तर असा होता ‘छोटीसी बात’. एव्हरग्रीन. अरुणसारखा साधा व प्रभासारखा सुंदर. नंतर नागेशसारखा एक्स्ट्रा स्मार्ट झालेला. कर्नल प्रमाणेच बासुदांच्या एक्स्पर्ट मार्गदर्शनाखाली ट्रेन झालेला. ७० च्या दशकातील अरुणसाठी बनलेला होता पण आजही अवतीभोवतीच्या असंख्य अरुण यांना आत्मविश्वास देणारा. प्रेमातला सरळ मार्ग दाखविणारा.

थँक्स बासूदा. थँक्स अमोल पालेकर. थँक्स दादा मुनी. थँक्स विद्या व असरानी.

हिंदी सिनेमाच्या १९७० व ८० च्या दशकातील अनेक दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.