हिंदी सिनेमात डिस्को रुजविणारा डान्सर!

– अजिंक्य उजळंबकर

१९७० च्या दशकात पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेला संगीतप्रकार डिस्को हिंदी सिनेमात आणला कोणी? सर्वसामान्यपणे उत्तर मिळते ‘बप्पी लाहिरी’ या संगीतकाराने. पण हे उत्तर चुकीचे आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणी संगीतकार नसून एक दिग्दर्शक आहे. तो दिग्दर्शक आहे ‘फिरोज खान’. भारतीय वंशाचा-इंग्लंड रहिवाशी व आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संगीतकार ‘बिड्डू’, ज्यांच्या प्रचंड आग्रहास्तव हिंदी सिनेमांकरिता ‘पहिले लोकप्रिय प्युअर डिस्को सॉंग’ बनविण्यास तयार झाला, ते होते फिरोज खान. वर्ष होते १९८०. सिनेमा ‘कुर्बानी’. कल्याणजी आनंदजींचे संगीत या चित्रपटास होते व त्यांच्या विरोधाला न जुमानता केवळ या एका गाण्यासाठी फिरोज खान यांनी ‘बिड्डू’ ला पाचारण केले होते.  “आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए, तो बात बन जाए” या कुर्बानी चित्रपटातील गीताने खऱ्या अर्थाने हिंदी सिनेमात डिस्को आणला. पुढे तो वारसा यशस्वीरीत्या सांभाळला तो बप्पीदांनी. ‘डिस्को डान्सर’ या सिनेमाला आज ३८ वर्षे पूर्ण झाली. असा पहिला हिंदी सिनेमा ज्याचे केवळ संगीतच नाही तर कथानक सुद्धा डिस्को संगीताच्या अवतीभोवती विणलेले होते तो म्हणजे ‘डिस्को डान्सर’. ‘डिस्को डान्सर’ ला जे ऐतिहासिक यश मिळाले ज्याचे श्रेय बप्पीदांना जाते. 

“आप जैसा कोई” गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर नाझिया हसन या पाकिस्तानी गायिकेच्या डिस्को दिवाने व बूम बूम या गाण्यांनी १९८१ व १९८२ साली प्रचंड लोकप्रियता मिळवली व खऱ्या अर्थाने डिस्को डान्सर साठी वातावरण निर्मिती करून ठेवली. त्याच दरम्यान बप्पीदांनी १९८१ साली अरमान नावाच्या चित्रपटात गायिका उषा उथप सोबत केलेला डिस्कोचा प्रयोग ‘रंभा हो हो हो’ प्रचंड यशस्वी झाला होता. १९७६ साली हिंदी सिनेमात पदार्पण केलेला मिथुन सुरक्षा, साहस, वारदात या सिनेमांच्या यशाने तरुणाई मध्ये हळूहळू लोकप्रिय होऊ लागला होता. असे असले तरीही अमिताभ नावाचं वादळ तितक्याच जोराने भारतभर घोंघावत होते. अमिताभ रूपात अन्यायाविरुद्ध हिंसेने उत्तर देणारा नायक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. अशात  १९८२ या एकाच वर्षी मिथुनचे तब्बल ११ सिनेमे प्रदर्शित झाले. त्यातला शेवटचा होता ‘डिस्को डान्सर’. यातही नायकावर अन्याय होतो परंतु यातील नायक याचे उत्तर हिंसेने न देता, डिस्को गाण्यांनी देतो. त्याकाळच्या प्रेक्षकांसाठी हे काहीतरी वेगळे होते. ‘इंट का जवाब पत्थर’ माहीत असलेला प्रेक्षक…  अचानकपणे त्याला ‘इंट का जवाब म्युझिकल गिटार अथवा सिंथेसायझर’ अशी कथा दाखविण्यात आली. रसिकांनी ती स्वीकारली.. डोक्यावर घेतली…खासकरून तरुणाईने.

mithun in disco dancer movie

८२ या वर्षी, डिस्को डान्सर येण्यापूर्वी, बप्पीदांच्या आणखी एका डिस्को-टाईप गाण्याने धुमाकूळ घातला होता. महानायक अमिताभ वर चित्रित झालेले ते गाणे होते ‘नमक हलाल’ सिनेमातील ‘पग घुंघरू बांध मीरा नाचती.’  असो. डिस्को डान्सर ला अभूतपूर्व यश मिळाले. केवळ भारतातच नव्हे तर जगभर. होय..जगभर! आधीचे दोन फ्लॉप चित्रपट खात्यावर असलेल्या दिग्दर्शक बी. सुभाष यांचा हा तिसराच चित्रपट. बप्पीदांच्या संगीताच्या ठेक्यावर नाचणारा मिथुन याआधी सुरक्षा व वारदात सिनेमात रसिकांना आवडला होता. डिस्को डान्सर रिलीज होण्याच्या पंधरा दिवस आधी लागलेल्या सुभाष घई यांच्या सुपरहीट विधाता सिनेमाचा सर्वत्र जोर होता. डिस्को डान्सर प्रदर्शित झाला आणि तरुणाई अक्षरशः वेडी झाली. अक्षरशः वेडी! 

विजय बेनेडिक्ट यांच्या आवाजातील “आय ऍम अ डिस्को डान्सर” गाण्याने भारतात काय विदेशात सुद्धा धुमाकूळ घातला. रशिया, चीन, जापान, युरोप, अमेरिका सर्वत्र. पार्वती खान यांच्या आवाजातील “जिम्मी जिम्मी जिम्मी आजा आजा आजा”; बप्पीदा व उषा उथप यांचे ड्युएट “कोई यहाँ आहा नाचे नाचे, औव्वा औव्वा”; बप्पीदांचे सोलो ‘याद आ रहा है तेरा प्यार’; किशोरदांच्या आवाजातले ‘ए, ओ, आ, जरा मुड़के मिला आँखें’; नंदू भेंडे यांच्या आवाजातील ‘कृष्णा धरती पे आजा तू’; राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेले व सुरेश वाडकर, उषा मंगेशकर यांचे ड्युएट “गोरों कि ना कालों की, दुनिया है दिलवालों की”. सर्व गाणी ट्युनफूल व ह्रिदमवर नाचायला भाग पाडणारी. बप्पीदांनी प्रत्येक गाण्यावर घेतलेल्या मेहनतीचे चीझ झाले. भारतात त्याकाळी दहा लाखांच्यावर एलपी रेकॉर्डस ची विक्री झाली जो एक उच्चांक होता. भारतानंतर ज्या देशांमध्ये डिस्को डान्सरची गाणी सर्वात जास्त लोकप्रिय होती ते देश होते रशिया व चीन. सिनेमाच्या नावावर त्याकाळातले कित्येक रेकॉर्ड्स जमा आहेत. चीन मध्येही या अल्बमने गोल्ड अवॉर्ड श्रेणीत स्थान मिळवले. हे फार कमी लोकांना ज्ञात असेल कि डिस्को डान्सर हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचे जगभरातले एकूण बॉक्स-ऑफिस कलेक्शन हे १०० कोटींचे होते. हा रेकॉर्ड नंतर मोडला १२ वर्षांनी ज्या सिनेमाचे नाव होते ‘हम आपके है कौन’. संपूर्ण युरोप, आफ्रिका, रशिया, चीन, सर्व आशियाई देश, मिडल ईस्ट, तुर्की असा जगभर या सिनेमाने धुमाकूळ घातला. 

mithun with b subhash
Mithun Chakravarty with Director B Subhash

हा सिनेमा १९८४ साली रशियात रिलीज झाला तो तब्बल १००० च्या वर प्रिंट्सने. ‘डिस्को डान्सर’ च्या खात्यावर रशियातील पुढील रेकॉर्ड्स जमा आहेत- १. १९८४ सालचा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस हिट. २. ८० च्या दशकातील सर्वात मोठा हिट परदेशी चित्रपट ३. ८० च्या दशकातील चौथा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस हिट ४. तोपर्यंतच्या मोठ्या परदेशी हिट सिनेमांमधील आठवा ५. आतापर्यंत सर्वात जास्त बॉक्स ऑफिस कमाई केलेल्या टॉप २५ सिनेमांपैकी एक. रशियामध्ये यापूर्वी असला गोंधळ राज कपूर यांच्या आवारा या सिनेमाने घातला होता. 

B.Subhash, Parvati Khan and Bappi Lahiri
B.Subhash, Parvati Khan and Bappi Lahiri

डिस्को डान्सरच्या संगीताने कित्येक पाश्चात्य संगीतकारांना, गायकांना प्रेरणा दिली व त्यांनी याची नंतर अधिकृत कॉपी केली. त्याची भली मोठी यादी आहे. हे सर्व खरंतर एका माणसाच्या मेहनतीने शक्य झाले. तो माणूस म्हणजे बप्पीदा. हिंदी सिनेसंगीताच्या इतिहासात ज्या सिनेमांच्या संगीताने ट्रेंड आणला, बदलाला व रुजवला त्या सिनेमांच्या यादीत डिस्को डान्सर हे नाव नेहमीसाठी कोरले गेले आहे. डिस्को डान्सर चे आणखी एक मोठे योगदान हिंदी सिनेमाला आहे. अय सिनेमाने मिथुन चक्रवर्ती या स्टार ला जन्म दिला. डान्सींग स्टार. सिनेमातील सर्व गाण्यात त्याच्या खास स्टाईलने नाचणाऱ्या मिथुनची तरुणाई वेडी झाली. त्याची बोलण्याची, चालण्याची, नाचण्याची, केसांची, बघण्याची सर्व सर्व गोष्टींची क्रेझ तरुणाईमध्ये निर्माण झाली ती याच सिनेमानंतर. मिथुनसोबत किम ही अभिनेत्री नायिका होती पण तिला या सिनेमाचा भविष्यात काही फायदा झाला नाही. अंजान व फारूक कैसर यांची गीतरचना होती तर ज्येष्ठ पटकथाकार राही मासूम रझा यांनी दीपक बलराज वीज यांच्यासोबत सिनेमाची कथा लिहिली होती. 

Mahurat Clap of Disco Dancer
Mahurat Clap of Disco Dancer

मिथुन आणि बप्पीदा यांच्या या डिस्कोवर आजही तरुणाई डान्स करते यातच सर्व आले. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment