-अशोक उजळंबकर

चित्रपती व्ही शांताराम यांची कारकीर्द संपूर्णपणे यशस्वी म्हणावी लागेल. कारण अपयश जरी त्यांना मिळालं तरी ते इतरांच्या यशासारखं होतं. व्ही. शांताराम यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून सगळी सूत्रं आपले चिरंजीव किरण शांताराम यांच्या हवाली केली व राजकमलचा हा डोलारा किरण शांताराम यशस्वीरित्या सांभाळीत आहेत. गादीचा वारस देखील ती गादी सांभाळण्याच्या लायकीचा झाला पाहिजे व ते केवळ नशिबावर अवलंबून असतं. ‘हमारी याद आयेगी’ असं म्हणत आलेला दिवस पुढे लोटणारा नामवंत दिग्दर्शक म्हणजे केदार शर्मा! ‘कभी तन्हाईयो में हमारी याद आयेगी’ हे मुबारक बेगमच्या आवाजातील गाणं गाऊन घेणारा केदार शर्मा! ‘तेरी दुनिया में दिल लगता नही’, असे बावरे नैनमध्ये नायकाच्या माध्मातून सांगणारा केदार शर्मा आज फार कमी रसिकांच्या लक्षात असणार. तरीदेखील ज्यांनी एक काळ गाजविला, नायक – नायिका यांना संधी देऊन पुढे आणलं तो केदार शर्मा (Kidar sharma). आपला मुलगा अशोक शर्मा याला येथे संधी मिळावी म्हणून त्याने ‘हमारी याद आयेगी’ची निर्मिती केली; परंतु अशोक शर्मा येथे जम बसवू शकला नाही.

      चित्रपट व्यवसायात आपण नाव कमवावं असं केदार शर्माला वाटलं ते देबकी बोस यांचा ‘पूरण भगत’ हा चित्रपट पाहिल्यानंतर. त्याकाळी कोलकता येथे बोस निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर होता. त्यांना भेटायला केदार शर्मा (Producer Director Kidar Sharma) गेले; परंतु भेट झाली नाही. स्वतः चित्रकार व पेंटर असल्यामुळे काही काळ कोलकता येथे त्यांनी हा उद्योग केला. नंतर देबकी बोस यांची भेट झाल्यावर त्यांनी न्यू थिएटर्समध्ये पोस्टर-पेंटर म्हणून त्यांना संधी दिली. चित्रपटाच्या निर्मितीत हमाली काम जरी मिळाले तरी ते करायचे, या उद्देशाने केदार शर्मा कोलकता येथे आले होते. न्यू थिएटर्सचे बी. एन. सरकार यांनी त्यांना ‘देवदास’ या चित्रपटाचे संवाद लिहिण्याची संधी दिली. पी. सी. बरुआच्या ‘देवदास’चे संवाद लेखक म्हणून केदार शर्मा यांना बरीच प्रसिद्धी मिळाली व त्यानंतर लगेच देबकी बोस यांच्या ‘विद्यापती’चे संवाद त्यांनीच लिहिले. त्याकाळी न्यू थिएटर्समध्ये 150 रुपये महिन्यात त्ायंनी काम सुरू केले. नंतर काही कारणास्तव शर्मा न्यू थिएटर्समधून बाहेर पडले व स्वतंत्ररित्या दिग्दर्शन करायचे त्यांनी ठरवले. खरंतर अनेक वेळा सहायक म्हणून जर तुम्ही काम केलं असेल तरच तुम्हाला दिग्दर्शक म्हणून संधी मिळते; परंतु केदार शर्मा चक्क आपल्या घरावर पाटी लावूनच बसले, ‘केदार शर्मा, दिग्दर्शक’ योगायोग असा की फिल्म कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचा, ‘हमारी जीत’ (Hamari Jeet) हा चित्रपट अर्धवट अवस्थेत होता व तो पूर्ण करण्याची जबाबदारी शर्मावर येऊन पडली. एक प्रकारे ‘शर्मा की जीत’ असाच प्रकार झाला. मूळ दिग्दर्शक परदेशी गेल्यामुळे शर्माला ही संधी मिळाली व तिचा त्यांनी पूर्ण फायदा उचलला. त्यानंतर मात्र निर्माते केदार शर्माचा विचार करू लागले. ‘हमारी जीत’ नंतर ‘औलाद’ (Aulad) या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांना मिळाले.

      रमोला ही नवी नायिका शर्मा यांनी ‘औलाद’ मध्ये पुढे आणली. दोन पिढ्यांमध्ये असलेल्या गॅपमध्ये विचारांची भिन्नता निर्माण झाल्यावर कसे प्रश्‍न उभे राहतात, हे शर्मा यांनी ‘औलाद’ मध्ये दाखविलं होतं. त्यानंतर मेहताबची प्रमुख भूमिका असलेला ‘चित्रलेखा’ हा थोडासा ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेला चित्रपट शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. आंघोळ करणारी नायिका दाखविण्याचं धाडस करणारा केदार शर्मा हा पहिलाच दिग्दर्शक. असं म्हणतात की, ज्यांनी मेहताबचा चित्रलेखा पहिला त्यांना मीनाकुमारीचा नंतर आलेला ‘चित्रलेखा’ अजिबात आवडला नाही. आम्हाला मात्र मीनाकुमारीचा ‘चित्रलेखा’ आवडला होता. केदार शर्मा यशस्वी होत आहेत हे पाहून त्यावेळी आघाडीवर असलेल्या रणजित स्टुडिओचे मालक चंदूलाल शहा यांनी त्यांना आमंत्रित केले. त्यानंतर मात्र रणजीतकरिता अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. त्यापैकी ‘गौरी’, ‘अरमान’, ‘जोगन’ हे चित्रपट खास गाजले.

      ‘जोगन’ (Jogan) मध्ये नर्गिस-दिलीपकुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर ‘अरमान’मध्ये त्यावेळचा आघाडीचा नायक मोतीलाल काम करीत होता. ‘जोगन’ ची गाणी गाजली व ‘अरमान’ मधील मोतीलालचे काम सर्वांना आवडले. एका वेगळ्या विषयाची हाताळणी केदार शर्मा यांनी ‘जोगन’ मध्ये कली होती. दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘अरमान’ व ‘जोगन’ द्वारा खास कामगिरी केली होती. शहरात राहणारा युवक ज्याला नेहमी मुजरा पाहण्याची सवय असते तो एकदा गावी जातो व तिथे त्याची भेट एका जोगनशी होते, तेव्हा त्या भेटीनंतर झालेला कायापालट केदार शर्मांनी ‘जोगन’मध्ये सुरेख चित्रित केला होता. राजेंद्रकुमारची पहिली भूमिका माझ्या माहितीप्रमाणे जोगनमध्येच होती. ‘मुलाखती’ घेणारी तबस्सुम हिचा ‘जोगन’ हा पहिलाच चित्रपट. रणजितच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर शर्मांकडे बराच पैसा जमा झाला होता. 500 रु. पगारावरून स्वारी 30,000 रु. पर्यंत जाऊन पोहोचली होती व स्वतंत्र निर्मितीच्या क्षेत्रात उतरावे असे त्ायंना वाटू लागले होते. त्यावेळी पृथ्वीराज कपूर यांना आपला मुलगा राज याच्या भवितव्याची खूपच काळजी लागून होती. पृथ्वीराज स्वतः या क्षेत्रात होते; परंतु नायक म्हणून त्यांनी केदार शर्मांना विनंती केली की, त्यांनी राज कपूरला सहायक म्हणून त्यांच्याकडे काम द्यावे. केदार शर्मा आपल्या‘नीलकमल’ चित्रपटाची आखणी करीत होते. मधुबालाचे वडील आताउल्ला हे केदार शर्मांना तिला संधी द्यावी म्हणून विनवीत होते. राज कपूरला केदार शर्मांनी सहायक म्हणून घेतले; परंतु त्याच्या अंगी नायक व्हावे असे गुण आहेत हे लक्षात येताच त्यांनी त्याला ‘नीलकमल’मध्ये नायक म्हणून चमकवलं. बेगमपारा, मुमताज, मधुबाला अशा तीन नायिका ‘नीलकमल’मध्ये शर्मांनी एकत्र आणल्या होत्या.

Neel Kamal Movie Poster
Neel Kamal Movie Poster

      राज कपूर (Raj Kapoor) व मुकेश (Mukesh) यांच्या बाबतीत एक गोष्ट खूपच योगायोगाची ठरली. मुकेश जेव्हा अनिल विश्‍वास यांच्याकडे गायला गेला तेव्हा त्याला पोहोचायला उशीर झाला म्हणून अनिल विश्‍वास यांनी त्याच्ाय श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर मुकेश खूप रडला व त्याने ‘दिल जलता है तो जलने दे’ सारखी रचना पेश केली. राज कपूरदेखील काम नीट करीत नाही हे पाहून केदार शर्मांनी त्याच्या श्रीमुखात लगावली होती व त्यानंतर लगेच त्याच्या हाती नायकाचा करार करणारा कागद ठेवला होता. श्रीमुखात खाऊन घेणारे नायक, गायक आज सापडू शकतील काय? ‘नीलकमल’मध्ये राज नायक म्हणून बरा चमकला व नंतर केदार शर्मांनी त्याला ‘बावरे नैन’ (Baware Nain) मध्ये संधी दिली. ‘बावरे नैन’चे कथानक खूपच वेगळ्या धर्तीचे होते. काही ठिकाणी या चित्रपटात केदार शर्मांनी आपल्या दिग्दर्शनकौशल्याचा सुरेख उपयोग करून दृश्‍यांमध्ये रंगत आणली होती. ‘बावरे नैन’ आठवला की लगेच मुकेशच्या आवाजातील, ‘तेरी दुनिया में दिल लगता नही वापस बुला ले’ हे गाणं आठवतं.

      गायिका-नायिका सुरैया त्या काळी आघाडीवर होती. तिच्या गाण्यांना प्रेक्षक अगदी डोक्यावर घेत असत. ‘शोखियाँ’मध्ये केदार शर्मांनी सुरैयाला संधी दिली. त्यावेळी सुरैयाचं मानधन 1 लाख रु. होतं. शर्माजींनी दीड लाखाची ऑफर देऊन काम करून घेतले. ‘सपना बन साजन आये’ हे ‘शोखियाँ’चं गाणं लतानं खूपच सुरेख गायलं होतं. ‘शोखियाँ’मध्ये सुरैयाचा नायक होता प्रेमनाथ. जमाल सेन यांनी संगिताची बाजू सांभाळली होती. शम्मी कपूरची प्रथम पत्नी गीताबाली हिलादेखील नायिका म्हणून केदार शर्मा यांनीच संधी दिली. ‘सुहाग रात’ची नायिका गीताबाली होती.

      गीताबाली एक अवखळ नायिका होती. विनोदी, तसेच गंभीर प्रसंग ती खूपच ताकदीने खुलवत असे. सुहागरातच्या वेळी भारत भूषण तिच्या समोर खूपच लाजरा वाटत होता. गीताबाली-भारत भूषण ही जोडी खुलणार नाही, असा अनेकांचा होरा होता; परंतु जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा गीताबालीचे काम बघून सर्वजण दंग झाले. माला सिन्हाला चित्रपटात काम मिळावे म्हणून गीताबाली शिफारस घेऊन शर्मांकडे आली होती व त्यांनी ‘रंगीन राते’ मध्ये माला सिन्हाला संधी दिली. शम्मी कपूरदेखील या चित्रपटात काम करीत होता. संपूर्ण चित्रपटात केदार शर्मांनी गीताबालीला पुरुषाच्या वेशात चमकावले होते. जोपर्यंत गीताबालीला दुसरीकडच्या ऑफर्स येत नव्हत्या तोपर्यंत ती केदार शर्मा यांच्याकडेच काम करीत असे. नंतर मात्र तिने शर्मा यांची साथ सोडली.

      केदार शर्मा गीताबालीला खूप स्कोप देत असत. याचं कारण असं सांगितलं जातं की, तिचा चेहरा त्यांची पत्नी कमल सारखा दिसत असे. आपल्या पत्नीचे रूप तो गीताच्या रूपात पाहत असे. अनेक चित्रपटांत त्याने गीताचे नावदेखील कम्मी किंवा कम्मो असेच ठेवले होते. गीता निघून गेल्यानंतर शर्मांनी स्वतः ‘हमारी याद आयेगी’ (Hamari Yaad Aayegi) हा चित्रपट बनवायचे ठरविले. मुलगा अशोक शर्मा याला त्यांनी नायक म्हणून यात काम दिले होते. तनुजा या चित्रपटाची नायिका होती. हमारी याद आयेगी चालणार नाही असं वाटत होतं; परंतु बरा चालला. मुबारक बेगमच्या आवाजातील ‘कभी तन्हाईयो में यूं हमारी याद आयेगी’ हे गाणंदेखील खूप गाजलं. हे गाणं गाण्यापूर्वी मुबारक बेगमची अवस्था खूपच वाईट होती. ती यांच्याकडे गायला आली तेव्हा दोन दिवसांपासून ‘जेवली’ नव्हती. तिने गाणं म्हणण्यापूर्वी शर्मा यांना विनंती केली की, मला थोडे खाण्यास द्या, म्हणजे मी चांगलं गाऊ शकेन. थोडं जेवल्यानंतर मुबारक बेगमने हे गाणं गायलं. मराठी संगीतकार स्नेहल भाटकर यांनी तिच्याकडून हे गाणं सुरेख गाऊन घेतलं होतं. आज ‘हमारी याद आयेगी’ रसिकांना आठवतो तो स्नेहल भाटकर/मुबारक बेगम, तनुजा यांच्यामुळे. दिग्दर्शक म्हणून हमारी याद आयेगीमध्ये शर्मांची कामगिरी खूपच उल्लेखनीय ठरली होती. गीताबालीचा चेहरा केदार शर्मांच्या डोळ्यासमोरून हलायला तयार नव्हता. नंतरच्या काळात सपना सारंग नावाची एक नायिका घेऊन त्यांनी ‘पहला कदम’ चित्रपट तयार केला होता. गीताबालीच्या चेहऱ्यासारखा तिचा चेहरा होता. खूप प्रयत्नांनी केदार शर्मा यांनी ‘पहला कदम’ तयार केला; परंतु एकाही वितरकाने तो घेतला नाही. त्यानंतर मात्र शर्मा यांनी कोणतेच धाडस केले नाही. स्नेहल भाटकर या संगीतकारांने त्यांना प्रत्येक वेळा साथ दिली आहे.

      निर्माता – दिग्दर्शक – गीतकार अशी तिहेरी भूमिका त्यांनी येथे पार पाडली होती. काही चित्रपटांतील गाणी त्यांनीच लिहिली होती, ‘कभी तन्हाईयो में यूं हमारी याद आयेगी’ हे अप्रतिम गाणंदेखील शर्मा यांचंच होय. ‘बावरे नैन’ मधील मुकेशच्या आवाजातील ‘तेरी दुनिया में दिल लगता नही’ हे गाणं त्यांचचं होय. आपल्या मनाची व्यथा या गाण्यात खूप सुरेख सादर केली होती. शर्मा यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पुढे आणले; परंतु या लोकांनी नंतर त्याची आठवण ठेवली नाही. त्यांनी बऱ्यापैकी पैसा जमवून योग्य ठिकाणी गुंतवला होता. केदार शर्मा दिग्दर्शक म्हणून ‘बावरे नैन’, ‘चित्रलेखा’, ‘गौरी’, ‘जोगन’, ‘शोखियाँ’मध्ये खास वाटला होता. संपूर्ण कुटुंबाला घेऊन बघता यावे असे चित्रपट त्याने दिले होते. उद्या जेव्हा केव्हा शर्माचा उल्लेख होईल, तेव्हा ‘नीलकमल’ (Neel Kamal), ‘जोगन’, (Jogan) ‘बावरे नैन’, ‘चित्रलेखा’ (Chitralekha) या त्यांच्या कलाकृतींचा खास उल्लेख करावा लागेल.

chitralekha 1964 movie poster
Chitralekha 1964 movie poster

***

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.