– अजिंक्य उजळंबकर
ती फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आली आहे… तसे नसते तर आम्ही बरोबर शाळेत असतांनाच (तेही चौथी/पाचवीत) कसे काय बरे तिने ‘एक, दो, तीन, चार, पांच, छे, सात… ‘ चे धडे आम्हाला शिकवले, आम्ही हायस्कुल मध्ये प्रवेश घेतला तेंव्हाच कसे तिला ‘धक धक’ व्हायला लागले? आम्ही १०वीत असतानांच ‘चॉकलेट लाईम ज्यूस’ म्हणत ‘पहले जैसे अब मेरे शौक है कहां?’ असं नेमकं हिने हेरलंच कसं काय सांगा? ११वी/१२वी च्या कॉलेज-लाईफमध्ये आम्ही प्रवेश करताच ही बाई ‘नजरे मिली दिल धडका, लव्ह यु राजा’ म्हणत आम्हाला आजूबाजूची हिरवळ बघा असे सुचवू लागली. इतक्या सगळ्या अडथळ्यातून सही सलामत सुटून आम्ही पदवीला प्रवेश घेतला तर ही तिथेही हजर! ‘दिल तो पागल है…दिल दिवाना है’ म्हणत हिने ग्रॅज्युएशन मध्येही वेड लावले. बरं हिचं ऐकून आम्ही आजूबाजूला प्रयत्न सुरु केले… पण आमचं नशीबच फुटकं? अहो या धक्क्यातूनही स्वतःला सावरले. स्वतःचा ‘देवदास’ होऊ दिला नाही. पदवीचे शिक्षण घेऊन पोटापाण्याचं बघावं म्हटलं.. दोन चार पैसे कमवायला सुरुवात केली तर ही बया तिथेही हजर. देवदासची चंद्रमुखी बनून. आली जखमांवर फुंकर घालायला. काय म्हणावं हिला? म्हणून एका गोष्टीची जाम खात्री झाली आहे. ती फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आली आहे. (Birthday Special Madhuri Dixit)
माधुरी दीक्षित. (Madhuri Dixit) ८० च्या दशका अखेर हिंदी सिनेमाला पडलेलं एक सुंदर स्वप्न. या स्वप्नाने ९० च्या दशकात आमच्यासारख्या कुमार वयातील व त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केलेल्या एका पिढीला अक्षरशः वेड लावलं होतं. जिच्या सौंदर्याची तुलना थेट मधुबालाशी केली गेली अशी एकमेवाद्वितीय माधुरी. सौंदर्य आणि प्रतिभा याचे अभूतपूर्व समीकरण. ८० च्या दशकाअखेर जिने श्रीदेवी नामक महानायिकेस थेट आव्हान दिले अशी माधुरी. अमिताभ आणि दिलीप कुमार या जोडीचा सामना हिंदी रसिकांना जसा शक्ती मधून अनुभवला तसा योग मात्र या दोन महानायिकेंच्या बाबतीत कधी जुळून आला नाही. २०१४ साली निदान गुलाब गॅंग चित्रपटातून माधुरी-जुही हा सामना तरी रसिकांना बघायला मिळाला. माधुरीचा चित्रपट प्रवास कसा घडला किंवा एकंदरीत तिची कारकीर्द कशी सजली यासाठी हा शब्दप्रपंच नाही. त्याचा उपयोगही नाही कारण बहुतांश वाचकांनी तिचा प्रवास गेल्या काही वर्षात पाहिला आहे. पण म्हणून काही तिच्या मेहनतीने, जिद्दीने आणि प्रतिभेने तिने या हिंदी सिनेजगतात स्वतःचे असे जे अढळ स्थान निर्माण केले आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणेही शक्य नाही. आज माधुरी वयाच्या ५५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. करिअरची दुसरी इनिंग म्हणजेच चरित्र भूमिकांमध्ये प्रवेश करण्याचे वय.

१९८४ साली राजश्री फिल्म्स च्या ‘अबोध’ मधून तिने या जगतात प्रवेश केला तेंव्हा तिचे वय होते अवघे १७ वर्षांचे! १९८८ साली ‘तेजाब’ मधून खऱ्या अर्थाने व्यावसायिक सिनेमांमध्ये तिची ओळख निर्माण झाली. या काळात श्रीदेवी नामक राणी नायिकांच्या सुपरस्टार नामक सिंहासनावर विराजमान होती. तिच्या तोडीस तोड नृत्य, तिच्या सारखाच सहज सुंदर अभिनय, सौंदर्याबाबतीत तर क्या कहने.. या सर्वांना जोड होती मेहनतीची आणि नशिबाची. १९८८ ते १९९८ या जवळपास १० वर्षांच्या कालावधीत दक्षिणेच्या ताब्यात असलेले हिंदी नायिकांच्या सुपरस्टार नामक सिंहासनाला महाराष्ट्राने ताब्यात घेतले. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एखाद्या मराठी स्त्रीला नायिका म्हणून, रसिकांचे इतके प्रेम मिळाल्याचे दुसरे उदाहरण नाही. क्रिकेटमध्ये तरी निदान सचिन तेंडुलकर च्या आधी सुनील गावस्कर हे मराठी नाव आहे परंतु हिंदी सिनेमात माधुरीच्या आधी मेनस्ट्रीम व्यावसायिक सिनेमात असे उदाहरण नाही. स्मिता पाटील या मराठी नावाने त्याकाळी समीक्षकांचे व रसिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक मिळवले खरे परंतु इथे मी श्रीदेवीने जे स्थान मिळवले होते त्याच्याशी माधुरीची तुलना करतोय. स्मिता पाटील प्रमाणे माधुरीने वैविध्यपूर्ण व आव्हानात्मक भूमिका कमी केल्या याची खंत वाटते. कारण माधुरी मध्ये स्मिता पाटील यांच्यासारखा अभिनयाचा स्पार्क होता. जो दिसला मृत्यूदंड, लज्जा, प्रेमग्रंथ, अंजाम, प्रहार, संगीत सारख्या मोजक्या सिनेमांमधून. प्रहार मधील मेक-अप विना असलेली तरुण माधुरी तर जबरदस्त आहे. बहुधा माधुरीने आपल्या करिअरमधील वेगळ्या वाटेची रिस्क तोलून मापून घेतली असावी असे वाटते.
आता मात्र तिचा निस्सीम चाहता म्हणून एक सल्ला द्यावा वाटतो. ‘टोटल धमाल’ सारख्या तद्दन टुकार भूमिका तिला शोभत नाहीत. दुसऱ्या इनिंगमध्ये तिने आता जास्तीत जास्त विविधांगी व तिच्यातल्या अजोड प्रतिभेला आव्हान देणाऱ्या भूमिका स्वीकाराव्यात. ओटीटी चा जमाना आहे. एकाहून एक प्रतिभाशाली लेखकांच्या लेखणीतून व दिग्दर्शकांच्या नजरेतून जबरदस्त व्यक्तिरेखा बाहेर पडत आहेत. आता माधुरीला प्लेय सेफ हे धोरण स्वीकारण्याची गरज नाही. ‘झलक दिखला जा’ आणि ‘डान्स दिवाने’ सारख्या टीव्ही शोजमध्ये परीक्षक/जज मधून माधुरीला बघण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नाही. अमिताभ जसा त्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये प्रत्येक भूमिकेत स्वतःला चॅलेंज देत असतो तसे धोरण माधुरीने स्वीकारावे.
परत प्रेमात पडायला आम्ही आहोतच. कारण आम्हाला एका गोष्टीची जाम खात्री झाली आहे.. तू फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माधुरी.

