– © अजिंक्य उजळंबकर
नुकतंच लॉक-डाऊनमध्ये आपण सर्वांनीच ८० च्या दशकातील दूरदर्शनवरील रामायण-महाभारताचा परत एकदा अनुभव घेतला. हनुमानाचे हिमालयात जाऊन संजीवनी पर्वत उचलून आणणे असो वा अर्जुनाचे स्वयंवरात फिरत्या माशावर बाण चालवणे असो वा यासारखी अगणित प्रसंग आणि दृश्ये, आज जर हे चित्रित करायचे म्हटले तर एका क्लिकवर सहज होते. रामायण-महाभारता सारख्या धार्मिक व ऐतिहासिक सिरियल्स मध्ये तर जवळपास प्रत्येक भागात एकतरी असा स्पेशल इफेक्टचा प्रसंग असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रामायण-महाभारतातील कुठलाही युद्ध प्रसंग वा त्याप्रकारचा स्पेशल इफेक्टसचा प्रसंग चित्रित करायचा असेल तर अद्ययावत असे ‘व्हीएफएक्स तंत्रज्ञान’ तुम्हाला ते सहजतेने करून देऊ शकते. परंतु ८० च्या दशकात जेंव्हा कॉम्प्युटर्सचा बोलबाला नव्हता तेंव्हा ट्रीक फोटोग्राफीची मदत घेतली जायची. भारतात बनलेल्या अनेक जुन्या धार्मिक चित्रपटात ही दृश्ये या ट्रीक फोटोग्राफीच्या तंत्रज्ञानानेच चित्रित केली गेली होती. भारतीय सृष्टीत या ट्रीक फोटोग्राफीचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे ‘बाबुभाई मिस्त्री’.

रामायण व महाभारत सिरियल्स मध्ये जेवढे काही स्पेशल इफेक्टस असलेली दृश्ये आहेत ती सर्व बाबूभाईंच्या मार्गदर्शनाखालीच चित्रित करण्यात आली आहेत. मार्गदर्शन हा शब्द यासाठी कि रामायण-महाभारत सिरियल्सच्या वेळी बाबुभाई ६७ वर्षांचे होते म्हणून. बाबूभाईंचा जन्म ५ सप्टेंबर १९१८ सालचा सुरत, गुजरात येथील. सिनेमाच्या वेडाने व कामाच्या गरजेने बाबूभाईंना मुंबईत आणले. १९३३ साली आलेला ‘इनव्हिजिबल मॅन’ या चित्रपटाच्या प्रेरणेने व दिग्दर्शक विजय भट्ट यांच्या सांगण्यावरून बाबूभाईंनी ‘ट्रीक फोटोग्राफी’ शिकण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे १८ वर्षे. १९३७ साली आलेला ‘ख्वाब कि दुनिया’ हा बाबूभाईंचा स्पेशल इफेक्टससाठी गाजलेला पहिला चित्रपट. या चित्रपटाने बाबूभाईंना ट्रीक फोटोग्राफर म्हणून ओळख मिळाली. या सिनेमाकरिता त्यांनी काळ्या दोऱ्याचा व पडद्याचा केलेला वापर ट्रीक फोटोग्राफीची मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. या प्रयोगाच्या यशाने पुढे बराच काळ बाबूभाईंना काला धागा या टोपण नावाने सिने-उद्योगात ओळखले जाऊ लागले.
१९४३-४४ च्या दरम्यान बाबूभाईंनी स्वतः कॅमेरामॅन व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नानाभाई भट्ट यांच्यासमवेत त्यांनी मुकाबला व मौज या सिनेमांचे दिग्दर्शन केले. १९५२ ते ६१ दरम्यान त्यांची ट्रीक फोटोग्राफी लाभलेले सिनेमे होते अलाद्दिन और जादुई चिराग, जंगल का जवाहर, हातिमताई, मीरा, झिम्बो इत्यादी. ट्रीक फोटोग्राफीचे असलेले वेड व त्यावर दिवसेंदिवस वाढत गेलेली मास्टरी यामुळे बाबूभाईंनी पुढील चार दशकात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व फॅंटेसी चित्रपटांचे स्वतः दिग्दर्शन केले. यात प्रचंड गाजलेली नावे म्हणजे मुकाबला (१९४२), मौज (१९४३), संपूर्ण रामायण (१९६१), किंग काँग (१९६२), पारसमणी (१९६३), महाभारत (१९६५), भगवान परशुराम (१९७०), डाकू मान सिंग (१९७१), हनुमान विजय (१९७४), माया मशचिंद्र (१९७५) ते अगदी १९९० चा हातिम ताई.
आज रामायण- महाभारत अथवा इतर कुठल्याही सीरिअल वा सिनेमात आपण जे काही स्पेशल इफेक्टस बघत आहोत त्याची मुहूर्तमेढ रोवली ती बाबूभाईंनी. ज्या काळात तंत्रज्ञान अजिबात प्रगत नव्हते व हाती पैसा सुद्धा फारसा उपलब्ध नसायचा अशा वेळी ट्रीक फोटोग्राफीचे हे शिवधनुष्य पेलायला बाबूभाईंसारखी माणसे होती म्हणून प्रेक्षकांना धार्मिक चित्रपट वा सिरियल्समधील या सर्व दृश्यांचा आनंद घेता आला. १९९९ साली त्यांचा झी-अवॉर्ड्स मध्ये लाइफटाईम पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच २००५ साली मामी चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेमाला दिलेल्या योगदानाबद्दल कोडॅक टेक्निकल एक्सलन्स ट्रॉफीने सन्मान झाला. आजच्या दिवशी २०१० साली त्यांचे निधन झाले. अशा या भारतीय सिनेमाच्या ट्रीक फोटोग्राफीमधील भीष्म पितामहास त्रिवार वंदन.
