-अजिंक्य उजळंबकर
गेली तेंव्हा तिचे वय होते अवघे १९ वर्षांचे व तिच्या अभिनय कारकिर्दीचे वय होते केवळ ३ वर्षांचे. परंतु या तीनच वर्षात तिने ७ तेलुगू, १ तामिळ व १३ हिंदी अशा एकूण २१ चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. म्हणजे तिच्या वयापेक्षा २ चित्रपट जास्तच होते. एखादी थंड वाऱ्याची झुळूक काही क्षणांसाठी का होईना पण जीवाला जशी सुखावून जाते तशी ती आली खरी मात्र जातांना चटका लावून गेली. ‘दिवाना’ चित्रपटात मध्यंतरापूर्वी तिने रंगविलेली काजल सतत एक वाक्य म्हणत असते … “मार डालूंगी!”. ३ वर्षांच्या अल्पायुषी कारकिर्दीत तिने आपल्या निरागस व सुंदर दिसण्याने रसिक प्रेक्षकांना मारलं जरी नसलं तरी पुरतं घायाळ नक्कीच केलं होतं. आज तिला जाऊन २८ वर्षे झाली तरी रसिकांच्या मनातून ती जाणे शक्य नाही. दिव्या भारती. हिंदी सिनेसृष्टीला ९० च्या दशकाच्या सुरुवातीला पडलेलं एक सुंदर स्वप्न.
एक असं स्वप्न ज्याने तत्कालीन कित्येक हिरोईन्सची झोप उडविली होती. श्रीदेवी सारख्या तिच्या लुक्स मुळे, तिच्या सहज सुंदर अभिनयामुळे, तिच्या निरागस दिसण्यामुळे ही पोरगी हिंदी सिनेमाची पुढची सुपरस्टार आहे असे समजले जायचे. मला अजूनही आठवतं. मी तेंव्हा नववीत होतो. १९९३ साली ५ एप्रिल रोजी रात्री दिव्या तिच्या बाल्कनीतून खाली पडली. तिच्या निधनाची बातमी सकाळी येऊन धडकली तेंव्हा आमचा वार्षिक परीक्षेचा पेपर चालू होता. वडील सिनेपत्रकार असल्याने कलावंतांच्या भेटी होणे तसे माझ्यासाठी नित्याचे होते. परंतु या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच एक योग जुळून आला होता. राज कंवर यांच्या ‘लाडला’ या सिनेमाचे शूटिंग औरंगाबादेत व्हिडीओकॉन कंपनीत होत असतांना व शूटिंगच्या प्रसिद्धीची सर्व जबाबदारी वडिलांवरच असल्याने मला दिव्या भारतीला (Divya Bharti) भेटण्याची आयतीच संधी चालून आली होती. औरंगाबादचे सुप्रसिद्ध उत्तम उपहार गृहाचे मालक संजय कछवा यांनी लाडला च्या सर्व युनिटला त्यांची सुप्रसिद्ध इम्रती खाऊ घातली होती व त्यानंतर सुप्रसिद्ध तारा पान सेंटर चे पानही त्यांच्यातर्फेच होते. या सर्व गडबडीत रात्री हॉटेल अँबेसेडर अजंता येथे दिव्याला आम्ही भेटलो होतो. दिव्या प्रचंड मुडी होती हे तेंव्हा मला अनुभवास आले. चुलबुली, बबली, नटखट, निरागस आणि तितकीच तापट असे त्या तारुण्यातल्या सौंदर्याचे वर्णन करावे लागेल.
‘लाडला’ चे जवळपास अर्धे शूटिंग झाले असतांना दिव्या गेल्याने नंतर त्यात श्रीदेवीला घेऊन परत शूटिंग करावे लागले. वर्षभराने १९९४ साली २५ मार्च रोजी लाडला प्रदर्शित झाला तेंव्हा आमची दहावीची परीक्षा झाली होती. दहावीची बोर्डाची परीक्षेनंतर पाहिलेला सिनेमा कायम लक्षात राहतो. पण मला तो कायम लक्षात राहण्यामागे दिव्या हे आणखी एक प्रमुख कारण होते. त्या कुमार वयात ‘मी या सिनेमाचे शूटिंग पाहिले आहे व मी दिव्याला भेटलोय’ अशी आपल्या मित्रांसमोर फुशारकी मारायची एक वेगळीच मजा असते. लाडला मध्ये दिव्याला रिप्लेसमेंट म्हणून श्रीदेवीला घ्यावे लागले मला वाटते यातच सर्व काही आले. श्रीदेवीचे ‘लाडला’ मध्ये येणे हे केवळ दोघींच्या सारख्या दिसण्यामुळेच होते असे नाही वाटत. त्या भूमिकेसाठी लागणारे अभिनय कौशल्य पण बघितले गेले होते. हा खरंतर दिव्याला तिच्या निधनानंतर मिळालेला मोठा सन्मान आहे असे मला वाटते. एखाद्या तरुण अभिनेत्रीची भूमिकेची रिप्लेसमेंट नंतर एखाद्या सुपरस्टार अभिनेत्रीने करावी असे फार क्वचितच दिसते.
लाडला प्रमाणेच जे सिनेमे दिव्याच्या अकाली मृत्यूनंतर दुसऱ्या नायिकांकडे गेले ते होते- मोहरा (रविना टंडन), कर्तव्य (जुही चावला), विजयपथ (तब्बू), आंदोलन (ममता कुलकर्णी) इत्यादी. रंग आणि शतरंज या सिनेमांचे शूटिंग दिव्याने पूर्ण केले होते मात्र तिच्या निधनानंतर तिच्या आवाजाचे डबिंग इतर कलाकारांनी केले. हिंदी सिनेसृष्टीत एखाद्या नायिकेने केवळ ३ वर्षात इतके नाव कमविल्याचे दुसरे उदाहरण नाही. मुंबईच्या जुहू येथील मानेकजी कूपर या शाळेत कसेबसे नववीपर्यंत शिक्षण पूर्ण करून अभिनयाकडे वळलेल्या दिव्याचे आज २८ वर्षांनंतरही इंटरनेटवर असंख्य फॅन्स क्लब कार्यरत आहेत. आनंद मध्ये राजेश खन्ना च्या तोंडी असलेला सुप्रसिद्ध संवाद ही पोरगी खरा करून गेली… “बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए..लंबी नही! ”
भावपूर्ण श्रद्धांजली.
सुदैवाने दिव्यावर चित्रित झालेल्या ‘लाडला’ मधील काही प्रसंगांचे व्हिडीओज यु-ट्युब वरआहेत त्यापैकी एक इथे देत आहोत..