– अशोक उजळंबकर 

 

मनमोहन देसाई यांनी अमिताभला आपल्या अनेक चित्रपटांत संधी दिली. त्यांचे सुपरहिट चित्रपट अमिताभची प्रमुख भूमिका असलेले होते, तर सुपरफ्लॉपदेखील अमिताभच्याच प्रमुख भूमिकेचे. दारी रथ व घरी चांदीचे ताट असलेल्या घरात मनमोहन देसाई यांचा जन्म झालेला. त्यांचे वडील किकूभाई देसाई खूपच श्रीमंत असामी. त्यांचे एक सुपुत्र सुभाष देसाई फिल्म लाईनमध्येच होते. ‘सम्राट चंद्रगुप्त’, ‘बेदर्द जमाना क्या जाने’ या चित्रपटांचे निर्माते सुभाष देसाई हे होते. त्यांच्याकडेच सहायक म्हणून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मनमोहन देसाई यांनी काम सुरू केले. ‘सम्राट चंद्रगुप्त’ या चित्रपटाच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनमोहन देसाई यांनी चांगली कामगिरी बजावली होती. सुभाष देसाई यांनी मनमोहन देसाई यांच्यावर जर स्वतंत्र कामगिरी सोपवली, तर ते यशस्वी करून दाखवतील असा विश्‍वास वाटला व त्यांनी राजकपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छलिया’ चित्रपटाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

producer director manmohan desai     

1959 साली ‘छलिया’ सुभाष पिक्चर्स या बॅनरखाली सेटवर गेला व 1960 मध्ये प्रदर्शित झाला. राजकपूर, नूतन, रेहमान यासारखे बडे – बडे कलावंत यामध्ये होते. राजकपूर हा मनमोहन देसाई यांचा आवडता नायक. त्याचाच चित्रपट आपल्याला दिग्दर्शित करायला मिळेल असे त्यांना वाटले नव्हते. राजकपूरदेखील मनमोहन देसाई यांच्यासारख्या नव्या दिग्दर्शकाकडे काम करायला तयार नव्हता; परंतु सुभाष देसाई यांनी राजकपूरची समजूत काढली व राजकपूरला तयार केले. पहिल्या चार रिळांचे चित्रीकरण झाल्यावर राजसाहेबांनी या रिळाचे अवलोकन केले व त्यांचे समाधान झाल्यावर ते काम करायला तयार झाले. ‘डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा’ हे मुकेशच्या आवाजातील गाणे व त्या गाण्यावर राजचा पदन्यास यांना तुफान लोकप्रियता मिळाली होती. ‘छलिया’ या चित्रपटास कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिले होते. लताच्या आवाजातील ‘हो हो बाजे पायल छम छम, हो के बेकरार, जाने मेरा जिया करे किसका इंतजार’ हे समूहगीत मेळ्यात सर्वत्र गाजत होतं. तर लताच्या आवाजातील नूतनच्या ओठावर राजकरिता दिलेली आर्त हाक ‘तेरी राहो मे खडे है दिल थाम के, हाये हम है दिवाने तेरे नाम के’, तरुणांच्या दिलाची धडकन बनली होती. ‘छलिया’ या मनमोहन देसाई यांच्या पहिल्याच चित्रपटाला रौप्यमहोत्सवी नव्हे तर सुवर्णमहोत्सवी यश लाभले. चित्रपट कृष्णधवल होता. राज कपूरसोबत या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे मनमोहन देसाई खूप खुश होते.

chhalia 1960 movie poster

त्यानंतर राजचा धाकटा भाऊ शम्मी कपूर यास घेऊन त्यांनी ‘ब्लफ मास्टर’ सेटवर नेला. ‘गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला’ हे गाणं कृष्ण जन्माष्टमीस आजही सर्वत्र लावलं जात. ‘ब्लफ मास्टर’ सुभाष पिक्चर्सचीच भेट होती व शम्मीसोबत सायराबानो ही नायिका होती. कल्याणजी आनंदजी यांची सर्व गाणी जरी गाजली नाहीत तरी जी गाणी होती ती बऱ्यापैकी लोकप्रिय ठरली. शम्मी कपूरला घेऊन त्यांनी लगेच ‘बद्तमीज़’ची निर्मिती केली. शम्मी कपूरच्या अवखळ स्वभावाला व हालचालींना शोभतील अशाच या भूमिका होत्या. ‘बद्तमीज’ मात्र वर्मा ब्रदर्स यांनी तयार केला होता व संगीत शंकर-जयकिशन यांचे होते. नायिका होती साधना. ‘बद्तमीज कहो या कहो जानवर, मेरा दिल तेरे दिल पे फिदा हो गया, हो लल्ला, हो लल्ला’ हे रफीच्या आवाजातील गाणे हायलाईट होते. तसं पाहिलं तर ‘ब्लफ मास्टर’ व ‘बद्तमीज’ या दोन्ही चित्रपटांना कथानक असं खास नव्हतं, तरी मनमोहन देसाई यांनी शम्मी कपूरकडून सुरेख काम करून घेऊन दोन्ही चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी करून दाखवले होते.

Budtameez poster

      मनमोहन देसाई यांनी ‘ब्लफ मास्टर’ व ‘बद्तमीज’ या दोन चित्रटांवर बरीच मेहनत घेतली होती, तरी बॉक्स ऑफिसच्या खिडकीवर अपेक्षित यश या चित्रपटांना लाभले नाही. मनमोहन देसाई यांच्याकडे निर्मात्यांनी पाठ फिरवायला सुरुवात केली. शम्मी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राजकुमार’ची कथा-पटकथा त्यांनीच लिहिली होती; परंतु श्रेय मिळाले रामानंद सागर यांना. चित्रपटाच्या श्रेय नामावलीत कथा कल्पना म्हणून मनमोहन देसाई यांचे नाव आले; परंतु कथा-पटकथा लिहिल्याचे मानधन देसाई यांना देण्यात आले. ‘राजकुमार’ला मिळालेले यश पाहून निर्माते विनोद दोशी व रजनी देसाई यांनी मनमोहन देसाई यांना कथा लिहायला सांगितले. नाझ सिनेमाच्या इमारतीबाहेर बसून देसाई यांनी ‘सच्चा झुठा’ चित्रपटाची कथा लिहिली. दोन जुळ्या भावांची ही कथा होती. राजेश खन्ना ‘आराधना’ पासून फॉर्मात होता. ‘सच्चा झुटा’ मात्र 1970 साली प्रदर्शित झाला. राजेश खन्नाच्या लोकप्रियतेचा फायदा देसाई यांनी करून घेतला व चित्रपट कमालीचा यशस्वी करून दाखविला. संगीताची बाजू मात्र कल्याणजी-आनंदजी यांनी सांभाळली होती. ‘मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया’ हे किशोरकुमारच्या आवाजातील गाणं अजूनही लग्न समारंभात बॅन्डवर वाजविलं जातं. ‘सच्चा झुठा’चे कथानक मामुली होते; परंतु कथेची मांडणी देसाई यांनी सुरेख करून घेतली होती.

sachaa jhutha movie poster

      ‘सच्चा-झुठा’ नंतर मात्र देसाई यांचे नशीब उजळले व निर्माते त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन येऊ लागले. रतन मोहन यांच्या ‘शरारत’चे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यात विश्‍वजित व मुमताज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘शरारत’ नंतर ‘किस्मत’, ‘भाई हो तो ऐसा’मध्ये जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मनमोहन देसाई यांना मिळत असलेल्या चित्रपटांपैकी अनेक चित्रपट भावा-भावांच्या संबंधावर आधारित असेच होते. काही कौटुंबिक, हळुवार प्रेमकथा तर काही मारधाड. ‘भाई हो तो ऐसा’नंतर ‘आ गले लग जा’ हा चित्रपट देसाई यांनी खूप जीवन ओतून तयार केला होता. एका अपंग मुलाच्या आई-वडिलांच्या प्रेमाची कथा यात होती. शशी कपूर, शर्मिला टागोर, शत्रुघ्न सिन्हा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. खरं तर ‘आ गले लग जा’ या चित्रपटाचा शेवट खूप दुःखद केला होता; परंतु प्रेक्षकांना दुःखद शेवट आवडणार नाही, असे वाटल्यामुळे त्यांनी शेवट बदलला. मास्टर टिटो या बालकलावंताची भूमिका यात चांगली झाली होती; तर शशी कपूर – शर्मिला टागोर यांच्यावरील काही प्रसंग देसाई यांनी सुरेख चित्रित केले होते. चित्रपट चांगला बनवून देखील बॉक्स ऑफिस खिडकीवर त्याला मर्यादितच यश मिळाले.

Rajesh Khanna and Mumtaaz in Roti
Rajesh Khanna and Mumtaaz in Roti

      निर्माता रजनी देसाई यांनी 1974 साली त्यांना ‘रोटी’ चित्रपटाची कथा दिली. या चित्रपटाच्या कथेत देसाई यांनी थोडासा बदल करून त्याला पडद्यावर पेश केले. राजेश खन्नाचा फॉर्म संपत चालला होता. तरीदेखील ‘रोटी’चा नायक म्हणून त्यांनी राजेश खन्ना यास संधी दिली व नायिका होती ‘नकटी’ मुमताज. ‘दो रास्ते’ तसेच ‘सच्चा झुठा’करिता गाजलेली जोडी व लक्ष्मीकांत – प्यारेलाल आपल्या यांचे संगीत. ‘रोटी’नंतर मनमोहन देसाई यांनी निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचे ठरविले. आपला लॉस्ट अँड फाऊंड फॉर्म्युला त्यांनी अमलात आणायचे ठरविले व ‘अमर अकबर अँथनी’ सेटवर नेला. तीन धर्मांचे तीन नायक घेताना त्यांनी बराच विचार केला होता. खलनायकाचा नायक झालेला विनोद खन्ना, ‘बॉबी’ द्वारा दाखल झालेला राजसुपुत्र ऋषी कपूर व ‘जंजीर’ द्वारा वेगळी इमेज घेऊन आलेला अमिताभ बच्चन यांना त्यांनी या चित्रपटात घेतले नीतू सिंग, शबाना आजमी, परवीन बाबी या नायिका होत्या, तर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे होते.

Vinod Khanna, Rhishi Kapoor and Amitabh Bachchan in Amar Akbar Anthony
Vinod Khanna, Rhishi Kapoor and Amitabh Bachchan in Amar Akbar Anthony

      निर्माता दिग्दर्शक म्हणून आपला चित्रपट सेटवर असताना इतर तीन निर्मात्यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई करीत होते. ‘धरमवीर’, ‘चाचा भतीजा’, ‘परवरीश’ हे तीन चित्रपट दुसऱ्या बॅनरचे होते. दोन भावांच्या कथेवर ‘धरमवीर’ बेतला होता. एकाचे नाव धरम, तर दुसऱ्याचे वीर. ‘धरमवीर’ प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. ‘चाचा भतीजा’ मध्ये धर्मेंद्र, हेमामालिनी, रणधीर कपूर, योगिताबाली हे कलावंत होते. ‘काका – पुतण्या’ची ही मराठी कथा प्रेक्षकांना आवडली नाही. रणधीर कपूर नायक म्हणून प्रेक्षकांना फार कमी वेळा आवडला आहे. संगीत लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांचेच होते. 1977 साली मनमोहन देसाई यांचे जेवढे चित्रपट निघाले त्या सर्वांना एल.पी. हेच संगीतकार होते. ‘परवरीश’ निर्माते ए. ए. नाडियावाला यांचा होता. यात मनमोहन देसाई यांनी अमिताभ बच्चन व विनोद खन्ना यांना संधी दिली होती, तर एके काळचा त्यांचा आवडता नायक शम्मी कपूर यात चरित्र भूमिकेत होता. ‘परवरीश’च्या नायिका होत्या नीतूसिंग व शबाना आझमी. ‘अमर अकबर….’ व ‘धरमवीर’ या दोन चित्रपटांना घवघवीत यश मिळाले. ‘अमर अकबर…’ ची कथा वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीवरून घेतली होती. एक दारुडा बाप आपल्या तीन मुलांना घेऊन घराबाहेर पडतो व तीन मुलांची कशी वाताहत लागते हे ‘अमर अकबर…’ मध्ये होते. ‘अमर अकबर…’ या चित्रपटाने मात्र देसाई यांच्याकरिता यशाचे दरवाजे उघडे केले होते. एम. के. डी. हे बॅनर चमकले.

‘नसीब’ हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला पुन्हा एकवार त्यांचा आवडता अमिताभ बच्चन हेच नसीबचे सर्वेसर्वा होते. शत्रुघ्न सिन्हा व ऋषी कपूर यांना फारसा वाव नव्हता. ‘जॉन जॉनी जनार्दन’ हे गाणं रफीने अगदी मस्त गायलं होतं. रफी 1980 साली गेला. मनमोहन देसाई व अमिताभ यांचे ‘नसीब’ बदलून टाकणारा हा चित्रपट. ‘नसीब’मध्ये ‘जॉन जॉनी जनार्दन’ या गाण्याच्या वेळी देसाई यांनी ‘धरमवीर’ची पार्टी दाखवून सारी फिल्म इंडस्ट्री एकत्र गोळा केली होती. नंतरच्या काळात शाहरुख खान याने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामध्ये ‘नसीब’ या चित्रपटातील हा प्रसंग जसाच्या तसा उचलला होता. ‘नसीब’च्या वेळी मनमोहन देसाई यांना साथ द्यायला त्यांचे सुपुत्र केतन देसाई दाखल झाले होते.

manmohan desai with amitabh bachchan on the sets of naseeb
Manmohan Desai with Amitabh Bachchan on the sets of Naseeb

      मनमोहन देसाई यांच्या चित्रपटात नायक म्हणून अमिताभ हे जणू ठरलेले होते. निर्माते सुभाष देसाई यांच्या ‘देशप्रेमी’चे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनीच केले. अमिताभ, हेमामालिनी प्रमुख भूमिकेत होते; परंतु ‘देशप्रेमी’ या चित्रपटास यश मिळाले नाही. त्यांना नेहमीच पटकथा – लेखनात मदत करणारे प्रयाग राज यांना त्यांनी ‘कुली’चे दिग्दर्शक म्हणून संयुक्तरीत्या संधी दिली. निर्माता म्हणून केतन देसाईचे नाव चमकले. ‘कुली’, ‘मर्द’, ‘तुफान’ हा इतिहास अगदी ताजा आहे. याशिवाय ‘गंगा जमना सरस्वती’ बद्दल सर्वांनाच माहिती आहे. ‘कुली’च्या सेटवर झालेल्या अपघातात अमिताभ गंभीर जखमी झाला होता. पैसा फेको तमाशा देखो हे तत्त्व स्वीकारून मनमोहन देसाई यांनी चित्रपट बनविले.   

Manmohan Desai, Amitabh Bachchan and Puneet Issar on the sets of Coolie
Manmohan Desai, Amitabh Bachchan and Puneet Issar on the sets of Coolie

              

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.