‘टू सर विथ लव्ह ‘ आणि  ‘इम्तिहान’….त्या वर्षी, आजच्या दिवशी! 47 Years Of Imtihan

धनंजय कुलकर्णी 

सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमा कडे आपण जेंव्हा बघतो तेंव्हा  आपल्या ला काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. हे दशक राजेश खन्ना अमिताभ बच्चन या दोघांनी  व्यापून टाकले असले  तरी या काळात रुपेरी पडद्यावर झालेले बरेच नवीन प्रयोग दुर्दैवाने सुपरहिट सिनेमाच्या भाऊ गर्दीत हरवून गेले. प्रेक्षकांपासून हे सिनेमे थोडेसे मागे राहिले. त्यांच्यावर समीक्षकांनी फार काही ही चर्चा देखील केली नाही. त्यामुळे हे सिनेमे तसे दुर्लक्षितच राहिले. आज अशाच एका चित्रपटाबद्दल आता बोलणार आहेत.१९७४ साली  दिग्दर्शक मदन सिन्हा यांनी ‘इम्तिहान’ (Imtihan 1974 Hindi Film) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पुढे आणला.  या चित्रपटात विनोद खन्ना (Vinod Khanna) आणि तनुजा (Tanuja) हे प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा ख्यातनाम लेखक ई. आर. ब्रेथवेट यांनी १९५९ साली लिहिलेल्या ‘टू सर विथ लव्ह’ (To Sir with Love Novel) या कादंबरीवर होता. जगभरातील सर्व प्रमुख भाषात हि साहित्य कृती भाषांतरीत झाली आहे. आपल्या भारत्तातील शाळांमधून देखील या कादंबरीवर आधारीत धडा आहे. ई. आर. ब्रेथवेट यांच्या याच आत्मचरित्रात्मक कादंबरीवर आधारित १९६७ साली  ‘टू सर विथ लव्ह’ हा सिनेमा आला होता. आज जे वाचक साठ वर्षांच्या वरील आहेत त्यांनी नक्कीच हा चित्रपट पहिला असणार!

‘इम्तिहान’ चित्रपटाचा प्लॉट साधारणतः याच कथानकावर बेतलेला आहे. कॉलेज लाईफ वर आपल्याकडे असे फुल लेंथ चित्रपट कमी आहेत. या चित्रपटात नायक नायिका  कॉलेजमधील विद्यार्थी नाहीत. अभिनेता विनोद खन्ना याने या चित्रपटात प्रोफेसर ची भूमिका केली आहे!  अतिशय मॅच्युअर्ड ,धीरगंभीर , अभ्यासू प्रोफेसर ! विनोद खन्नाच्या एकूणच चित्रपट कालखंडातील त्यांची ही भूमिका खरोखरच अप्रतिम अशी होती कारण या चित्रपटा पूर्वी विनोद खन्ना चे आगमन जरी रुपेरी पडद्यावर पाच वर्षांपूर्वी (१९६९ – मोम कि गुडिया ) झालेले असणे तरी त्याची सिनेमातील सुरुवात हे खलनायकाच्या या भूमिकेतून झाली. सुरुवातीचे तीन-चार वर्षे विनोद खन्ना ने चित्रपटातून व्हिलन च्या भूमिका केल्या.  परंतु १९७४ साली  आलेल्या गुलजार यांच्या ‘अचानक’ आणि मदन सिन्हा यांच्या ‘इम्तिहान’ या चित्रपटाने त्याच्या चित्रपट कारकिर्दीतील नायकाच्या भूमिकांना सुरुवात झाली. (तसा नायक म्हणून तो या पूर्वी ही ‘हम तुम और वो’, ‘अन्नदाता’ या चित्रपटात आला होता पण हे सिनेमे फारसे यशस्वी झाले नाही.) ‘इम्तिहान ‘ या चित्रपटातील  किशोर कुमार यांनी गायलेले ‘रुक जाना नही तू कही हार के’ हे गाणे आज देखील कल्ट क्लासिक म्हणून लोकप्रिय आहे.

चित्रपटाचे कथानक हिंदी सिनेमाच्या त्या काळाशी अजिबात न जुळणारे असे होते. अतिशय गर्भश्रीमंत असलेल्या एका व्यावसायिकाचा (मुराद)  प्रमोद शर्मा म्हणजेच विनोद खान हा एकुलता एक मुलगा. परंतु याला वडिलोपार्जित श्रीमंती मध्ये अजिबात रस नसतो त्याला त्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून पुढे जायचे असते. लोकांच्या श्रमातून मिळविलेल्या पित्याच्या संपतीचा त्याला तिटकारा असतो. त्यामुळे तो वडिलांच्या संपत्ती चा त्याग करून तो एका महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. घर सोडताना वडिलांशी त्याचे वाद होतात. “अपने कारोबार  मे दस हजारो  लोग काम करते है और तू मामुली तीनसो (त्या काळातील प्रोफेसरचा पगार !)  रुपये की नोकरी के लिये घर छोड रहा है?’ असा त्यांचा प्रश्न असतो.पण  आदर्शवादी विचारांच्या प्रमोद ला  संपत्तीचा मोह नसतो. तो घर सोडतो. महाविद्यालयात आल्यावर सुरुवातीला त्याच्या डोळ्यात खूप स्वप्न असतात. विद्यार्थ्यांना घडवण्याचे. त्यांना मोठं करण्याचे. पण सुरुवातीच्या काही दिवसातच त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो. कारण महाविद्यालयातील विद्यार्थी  अतिशय बेशिस्त असतात. राजरोसपणे रोजच्या मारामाऱ्या, मुलींची छेड छाड काढणे,गुंडागर्दी, प्राध्यापकांची  टिंगल करणे असले प्रकार चालू असतात. सुरुवातीला हतबुद्ध होऊन तो सारा प्रकार पहात रहातो. प्रसंगी मुलांशी वाद घालतो.वरच्या व्यवस्थापनाशी बोलतो.  पण एकूण सिस्टीम चुकीची आहे त्याच्या लक्षात येते. खूप विचारानंतर त्याच्या लक्षात येते की या मुलांना वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे.ते ज्या सामाजिक स्तरातून वर आलेले आहे, ज्या वातावरणात त्याची वाढ झाली आहे इथेचे समस्येचे मूळ आहे. त्यांना समजून घेण्याचे तो ठरवतो.

इथे मी ‘इम्तिहान’ या चित्रपटापाशी थांबतो . कारण इथवर हा सिनेमा मूळ कादंबरी आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास करतो आहे पण पुढे मात्र तो trac बदलताना दिसतो. इंग्रजी चित्रपटात तो शिक्षक (सिडनी पायटियर) कृष्णवर्णीय दाखवला आहे. चित्रपटाचा कालखंड हा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचा आहे. त्या काळात वंशवाद जगभर फार उफाळून आलां होता. हा शिक्षक मूळचा इंजिनियर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर तो बेरोजगार झाला आहे. इंजिनियरिंग मधील जॉब मिळत नाही म्हणून तो इंग्लंड मध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. या शाळेत ही त्याला वंशभेदाला सामोरे जावेच लागते. शाळेतील विद्यार्थी अतिशय बेशिस्त असतात. इतर शाळेतून गुंडगिरी केल्याने काढून टाकलेले सगळे नग इथे जमा झालेले असतात. मारामाऱ्या , टगेगिरी, मुलींची छेड छाड हा रोजचाच प्रकार असतो. सिडनी त्यांना सुधारायचे ठरवतो. त्याच्या बाजूने कुणीही नसते. हि मुलं काय सुधारणार हाच प्रश्न असतो. पण तो हे आव्हान स्वीकारतो. मुलांशी  वेगळ्या पद्धतीने तो संवाद साधतो. क्वचित त्यांचा मित्र बनतो. ते असे का बनले याचा मानस शास्त्रीय दृष्टीने विचार करतो. त्यांना तो स्वत:बद्दलचा रिस्पेक्ट वाढवायला शिकवतो. मुलींशी आदरार्थी कसं बोलायचं ते सांगतो. हसत खेळत संवाद साधत तो मुलांना शेक्सपिअर वाचायला शिकवतो. सगळ्या सुरवंटाची फुलपाखरे करण्यात तो यशस्वी होतो आणि त्याचं मिशन संपतं. तो जाताना ती मुलं गहिवरतात.त्यांना फेयरवेल कार्ड देतात ‘टू सर विथ लव्ह..’ या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स क्लवेल यांनी केले होते. यात साठच्या दशकातील पोप सिंगर लुलू हिने गायलेले टायटल सॉंग अजून लक्षात असेल.

आता आपण आपल्या मूळ ‘इम्तिहान’ या हिंदी चित्रपटाकडे येवूत . विनोद खन्ना त्याचं मिशन हाती घेवून कामाला लागतो पण त्याच वेळी कथानक थोडे बदलते. त्यांच्या प्राचार्याच्या (अभी भट्टाचार्य) यांची मुलगी असते मधू (तनुजा)तनुजा  खूप दुःखी आहे ज्या मुलावर तिचं  प्रेम असतं त्याचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे तिचं आयुष्य दु:खमय झालेले असते. सदैवनैराश्यात ती बुडालेली असते. विनोद खन्ना तिच्या आयुष्यात येतो तो तिला खूप समजावतो. तिला पुन्हा नवे स्वप्न दाखवतो. तिला दुःखाच्या खाईततून  बाहेर काढतो. तिच्या चेहऱ्यावर आता पुन्हा हास्य फुलू लागतं. तिच्या आवडत्या पेंटीग करायला ती सुरुवात करते. विनोद तिच्या आयुष्याला नवा आयाम देतो. तनुजा  ने ही भूमिका अतिशय अप्रतिम रित्या वठवली आहे. महाविद्यालयात रिटा(बिंदू) हि विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या चेअरमन यांची मुलगी असते.ती प्रोफेसर विनोद खन्ना वर एकतर्फी प्रेम करत असते. पैशाने सारे विकत घेता येते असा कायम उध्दट भाव तिच्या वागण्यात असतो. विनोद खन्ना हर तऱ्हेने तिला त्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला देत असतो . एकदा महाविद्यालयाची पिकनिकसाठी  विनोद विद्यार्थ्यांना बाहेर घेवून जातो. पिकनिकला गेल्यानंतर बिंदू रात्री विनोद खन्नाच्या रूम मध्ये येते आणि त्याच्या  गळ्यात पडते. तो जेव्हा तुला दूर करतो त्यावेळी त्याच्यावर बळजबरीचा आरोप करते. आणि कांगावा सुरु करते.  आता सर्व विद्यार्थी, मॅनेजमेंट विनोद खन्नाचा विरुद्ध उभी राहतात. तनुजाला विनोदच्या निर्दोषत्वाची खात्री असते. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये असा प्रश्न उभा रहातो.  विनोद खन्ना साठी हा एक मोठा बाका प्रसंग असतो. ज्या विद्यार्थ्यांना त्याने त्यांच्या गुंड प्रवृत्ती पासून दूर करून पुन्हा एकदा सुसंस्कारारीत बनवले तोच शिक्षक आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतो! पण शेवटी ‘दूध का दूध पानी का पानी ‘ होते आणि विनोद आरोपातून तो बाहेर पडतो. तनुजा ला घेऊन कालेजमधून बाहेर पडतो. सोनं अग्निपरीक्षा दिल्यानंतर आणखी झळाळून निघते. त्याचं ‘मिशन’ पूर्ण झालेलं असतं पण मोठा ‘इम्तिहान’ देवून!

इथे कुठेही दोन्ही चित्रपटांची तुलना रादर त्या मूळ कलाकृती शी प्रामाणिक राहण्याची चर्चा करायची नाही. एक सशक्त कथानक हाती असताना यावर आणखी चांगला चित्रपट नक्कीच बनला असता. थोडे प्रयत्न कमी पडले.  या सिनेमाचे बव्हंशी शूटिंग नाशिक जवळच्या देवळाई इथे झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मदन सिन्हा यांनी केले होते. ते मूळचे छायाचित्रकार होते. त्यांच्या बाबत फारशी माहिती नाही पण या चित्रपटाच्या नंतर त्यांचे निधन झाले असं म्हणतात. या सिनेमातील गाणी मजरूह सुलतानपुरी यांची होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. ‘रुक जाना नाही तू कभी हार के ‘ या किशोरच्या गाण्य सोबतच ‘ रोज शाम आती थी मगर ऐसी न थी’ हे लताच्या  स्वरातील ‘ब्ल्यू मूड ‘ चे गाणे देखील अप्रतिम होते. बिदू ला तिच्या भूमिकेसाठी फिल्मफेयर चे नामांकन मिळाले होते. हा चित्रपट मुंबई मध्ये फक्त मॉर्निंग शो मध्ये प्रदर्शित झाला आणि हळू हळू माउथ पब्लिसिटी तून लोकप्रिय ठरला.आपल्याकडे चर्चा किंवा आठवण नेहमीच हिट सिनेमाची काढली जाते पण अशा काही ऑफ बीट प्रयोगांची देखील दाखल घ्यायला हवी.वाचकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.

आज ३१ मे! आजच्याच दिवशी १९७४ साली ‘इम्तिहान’ हा  सिनेमा प्रदर्शित झाला होता.

To Sir With Love Book Cover
To Sir With Love Book Cover

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment