-अशोक उजळंबकर
भारतीय चित्रपटात सुरुवातीच्या काळात जेव्हा पार्श्वगायनाची पद्धत सुरू झाली नव्हती तेव्हा ज्यांना गायन कला अवगत असेल अशाच कलावंतांना संधी मिळत असे. न्यू थिएटर्स या कंपनीच्या काही नामवंतांपैकी पंकज मलिक यांनी अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शक या तिन्ही बाजू सांभाळल्या होत्या. त्यांच्या काळात के. सी. डे., काननबाला, जमुना, राजकुमारी, सैगल ही मंडळीदेखील खूपच प्रकाशझोतात आली होती.
कोलकाता येथील एका मध्यमवर्गीय, कर्मठ कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. गायन-वादन या कलांना ज्या घरात अजिबात वाव नव्हता अशा घरात पंकज मलिक जन्मले. घरात संगीत निषिद्व असल्यामुळे त्यांना चोरून वाद्ये वाजविण्याचा नाद लागला होता. पंचम जॉर्जच्या राज्यारोहण समारंभात स्वागतगीत गाऊन पंकज यांनी सर्वांची मने जिंकली होती. आपला मुलगा उत्तम गातो याचा त्यांच्या वडिलांनाही खूप आनंद झाला होता. अशा रीतीने घरच्यांचा विरोध थंड करून त्यांनी गायन क्षेत्रात नाव मिळवलं होतं.
कोलकाता आकाशवाणी केंद्रात त्यांची नोकरी चालू असतानाच एच. एम. व्ही. व कोलंबिया या कंपनीने त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांच्या नावाचा सर्वत्र बोलबाला झाला होता. १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यहूदी की लडकी’ या चित्रपटाला संगीत देण्याचा मान त्यांनी मिळवला होता. ‘बडी दीदी’, ‘दुष्मन’, ‘कपाल कुंडला’, ‘नर्तकी’, ‘डॉक्टर’, ‘मेरी बहेन’, ‘मीनाक्षी’ या चित्रपटांना त्यांचेच संगीत लाभलं होतं. पंकज मलिक यांच्यासारखी अविस्मरणीय कामगिरी नंतरच्या काळात एस. डी. बर्मन यांनी पार पाडली होती. पंकज मलिक यांचं नाव उच्चारताच ‘पिया मिलन को जाना’ हे ‘कपाल कुंडला’ या चित्रपटातील गीत लगेच आठवते. या शिवाय या आवाजातील ‘ये कौन आया सवेरे सवेरे’ (नर्तकी) ‘कोन देस है जाना मुसाफिर’ (मुक्ती) ही गाणीदेखील लगेच लक्षात येतात. नंतरच्या ‘डॉक्टर’ या चित्रपटातील पंकज मलिक यांच्या आवाजातील सगळीच गाणी अविस्मरणीय ठरली. या चित्रपटातील डॉक्टरची मध्यवर्ती भूमिकाही त्यांनीच पार पाडली होती. डॉक्टरमधील पंकज मलिक यांनी गायिलेली ‘चले पवन की चाल,’ ‘आयी बहार,’ ‘गुजर गया वह जमाना,’ ही गाणी खूपच गाजली होती.

आपण गायक होण्यापेक्षा इतरांना या क्षेत्रात पुढे आणण्याचे मोठे काम पंकज मलिक यांनी पार पाडलं होतं. भारत सरकारने त्यांना १९७० मध्ये पद्मश्री ही पदवी बहाल केली होती तर १९७३ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला होता. असा महान नायक, गायक, संगीत दिग्दर्शक १९७८ मध्ये काळाच्या पडद्याआड गेला. भारतीय चित्रपट संगीत समृद्ध करण्यात सुरुवातीच्या काळात त्याने केलेली कामगिरी खरोखरच महान म्हणावी लागेल.
***
