जन्मदिन विशेष….मेरा सलाम लेजा – निम्मी

– © नयना पिकळे

“बरसात” ( १९४९) मधली पहाडी गावंढळ नीला …….
“आन” ( १९५२ ) मधली अवखळ भोळी मंगला …….
“अमर” ( १९५४ ) मधली गवळणीच्या भूमिकेतील सोनिया …..
“उडन खटोला” ( १९५५) मधली सोनी ……
“बसंत बहार” ( १९५६) मधली गोपी …….
म्हणजेच नवाब बानू ……..
म्हणजेच आपली सर्वांची निम्मी …….

नुकतीच तारुण्यात पदार्पण करणारी नवाब बानू . त्या काळच्या वहीदन बाई नावाच्या सीनेसृष्टीत बऱ्यापैकी जम बसवलेल्या गायिका कम नायिकेची मुलगी .चित्रपट कसा बनतो या विषयी जाणून घ्यायच तिचं कुतूहल पाहून दिग्दर्शक मेहबूब खान यांनी तिला आपल्या “अंदाज” ( १९४९ ) ह्या चित्रपटाच्या वेळी चित्रिकरण कसं करतात हे पाहायला सेट वर बोलावलं .

राज कपूर तेव्हा आपल्या आगामी “बरसात” च्या तयारीला लागला होता. नर्गिस बरोबरच सिनेमात आणखीन एक नायिका त्याला हवी होती . दुसऱ्या नायकासाठी त्याने प्रेमनाथ ची निवड केलीच होती …. आता कमी होती फक्त दुसऱ्या नायिकेची.

तेव्हाच “अंदाज” च्या सेट वर रोज हजेरी लावणाऱ्या गोबऱ्या गालाच्या , नकट्या नाकाच्या आणि अपार कुतूहलाने भरलेल्या निरागस नजरेच्या निम्मी ला राज कपूरच्या पारखी नजरेने अचूक हेरले आणि ती बनली त्याच्या ” बरसात ” ची दुसरी नायिका नीला .

 

“बरसात में हमसे मिले तुम ओ सजन
तुमसे मिले हम बरसात में”
म्हणणारी प्रेमाच्या परिणामांपासून अनभिज्ञ असलेली निरागस लाघवी नीला ….

“जिया बेकरार है , छाई बहार है
आजा मोरे बालमा , तेरा इंतजार है”
मध्ये बालमाच्या प्रतीक्षेत अविरत बरसणारे डोळे आणि त्याच्या इंतजारात कातर झालेल्या मनाची नीला ….
आणि चित्रपटाच्या शेवटी आपण प्रेमात फसवले गेलो आहोत , आपली निष्ठा , आपलं प्रेम फोल ठरलंय हे कळल्यावर स्वतःच आयुष्य संपवून घेतानाची विद्ध , घायाळ , भान हरवलेल्या डोळ्यांची नीला …..
ह्या साऱ्या छटा निम्मीच्या अभिनयातून जबरदस्त ताकदीने आपल्यासमोर येतात ….

“बरसात” ची मुख्य नायिका जरी नर्गिस असली तरी निम्मी देखील तेवढाच भाव खाऊन जाते .
निसर्गरम्य डोंगराळ प्रदेशाच्या पार्श्व भूमीवरील प्रेम कथा , शंकर जयकिशन च संगीत , राज नर्गिस , प्रेमनाथ निम्मी या दोन जोड्या .
नर्गिसच्या रेश्मा बरोबरच निम्मीची नीला देखील प्रेक्षकांना तेवढीच भावते.

Jiya Beqarar hai...Nimmi in Barsat
Jiya Beqarar hai…Nimmi in Barsat

 

पदार्पणा तिच्या साथीला आहे डफली चा जबरदस्त ठेका ..
” ताक धिना धिन
धिना धिन ताक धिना धिन ” …..
मग मेंडोलीन चे सूर आणि पाठोपाठ वायोलिन चा ताफा
” बरसात में हमसे मिले तुम सजन
तुमसे मिले हम बरसात में
ताक धिना धिन ” …..
कोरस मध्ये परत ” ताक धिना धिन ” चा भन्नाट ठेका …..
गाण्याची सुरुवातच ऐकणाऱ्याना आणि पहाणाऱ्यांना धुंवाधार भिजवून तृप्त करणारी .

“प्रीत ने सिंगार किया मैं बनी दुल्हन
मैं बनी दुल्हन”
सपनों की रिमझिम में नाच उठा मन
मेरा नाच उठा मन
आज मैं तुम्हारी हुई तुम मेरे सनम
तुम मेरे सनम
बरसात में तक धिना धिन ” …..

निम्मी चे हसरे नाचरे लाजरे डोळे , मोहक मादक हालचाली , चेहऱ्यावर पसरलेला पहिल्या मिलनाचा गोडवा , आपल्या सनम वर पूर्णपणे फिदा असलेली नजर . सर्वस्व समर्पित केल्यावर येणारी तृप्ती निम्मीच्या चेहऱ्यावर विलसते आहे ….
आणि या सर्वाच काहीही भान नसलेला बेफिकीर पणे तोंडात चणे टाकणारा प्रेमनाथ …..

Actress Nimmi

 

” ये समाँ है जा रहे हो
कैसे मनाऊँ कैसे मनाऊँ
मैं तुम्हारी राह में ये
नैन बिछाऊँ
नैन बिछाऊँ ” ….
आपल्या साजनला अशा धुंद पावसाळी वातावरणात अचानक आपल्या पासून दूर जाताना पाहून त्याच्या मागे धावणारी आणि डबडबल्या डोळ्यानी त्याला थांबवायचा असफल प्रयत्न करणारी निम्मी. आणि एखाद्या अजाण लहान मुलाला समजावतात तशा बेफिकीरीने तिला समजावून निघून जाणारा प्रेमनाथ .

पहिली दोन कडवी आनंदी आहेत तर ह्या तिसऱ्या कडव्यात साजन दूर जात असल्याचं दुख
” तुम ना जाओ तुमको मेरी
जान की क़सम
जान की क़सम ” ….
म्हणतानाची केविलवाणी अगतिक निम्मी .
आणि हे खालच चौथ कडव तर कहर आहे …
मघाशी गाण्याच्या सुरुवातीला मनाला उल्हासित करणारा डफलीचा ठेका आता अचानक भकास वाटतो तर मेंडोलीन आणि वायोलीनचे सूर क्षणोक्षणी केविलवाणे होत जातात . दूर दूर जाण्याऱ्या कार बरोबर निम्मीच्या चेहऱ्यावरील आनंदही लांब लांब जातो .

” देर ना करना कहीं ये
आस छूट जाये , साँस टूट जाये
तुम ना आओ दिल की लगी
मुझको ही जलाये , ख़ाक़ में मिलाये
आग़ की लपटों में पुकारे ये मेरा मन
मिल ना सके हाय मिल ना सके हम ” ….

मिलनानंतर येणारा विरह दाहक असतो ….. ह्या आगीचा असा काही भडका उडतो की त्या विरहाग्नीत स्वतःची आहुती देण्यावाचून गत्यंतर उरत नाही. ह्या कडव्यानंतर ” ताक धिना धिन ” चा तो ठेका नाहीये कारण इथे ” मिल ना सके हाय मिल ना सके हम ” ही शेवटच्या ओळीतील आर्तता ऐकणाऱ्याच्या काळजाचाच ठोका चुकवते . आणि निम्मी रसिकांच्या काळजात कायमची घुसून बसते. “बरसात” सुपर सुपर हीट झाला आणि रातोरात सिने सृष्टीच्या क्षितिजावर निम्मी नावाची चांदणी चमकू लागली.

त्यानंतर निम्मी ने देव आनंद , प्रेम नाथ , भारत भूषण , दिलीप कुमार अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर वेगवेगळ्या चित्रपटातून भूमिका केल्या. दिलीप कुमार बरोबर तर तिने दीदार, आन , दाग , अमर , उडन खटोला अशा पाच चित्रपटात काम केले. निम्मी चा सहज सुंदर अभिनय , बोलके डोळे आणि प्रत्येक भूमिकेत अगदी सहज शिरून सामावून जाण ह्यामुळे लवकरच तिच्या नावावर सिनेमे चालू लागले .

“आन” मध्ये तर निम्मी बरोबर अत्यंत लोकप्रिय आणि कसलेला अभिनेता दिलीप कुमार होता. पण तरीही काही सिनेमा वितरकांना तिचा चित्रपटातील अकाली होणारा मृत्यू रुचला नाही म्हणून त्यांनी आक्षेप घेतला. ह्यामुळे दडपण येवून शेवटी “आन” चे दिग्दर्शक मेहबूब खान यांना निम्मी वर चित्रित केलेले एक जास्तीचे स्वप्न दृश्य सिनेमात टाकावे लागले. ह्यावरून निम्मीची त्याकाळची लोकप्रियता लक्षात येते .

Actress Nimmi

निम्मी अत्यंत चोखंदळ पणे आपल्या फिल्मी भूमिका निवडत असे. पण तरीही काही वेळा तिचे निर्णय चुकले .
“मेरे मेहबूब” आणि “वो कौन थी” ह्या दोन्ही चित्रपटातील साधनाने साकारलेले रोल्स आधी निम्मी ला देण्यात आले होते . पण निम्मीने ते नाकारले. दोन्ही सिनेमे प्रचंड गाजले आणि तिचा अंदाज चुकला. तसेच “साधना” (१९५८) चित्रपटातील वैजयंतीमाला ची भूमिकेसाठी देखील आधी निम्मी ला विचारले गेले होते पण तिने हा चित्रपट देखील नाकारला. तीनही वेळी साधना हे नाव अजाणते पणे का होईना पण निम्मी ला लाभले नाही असेच म्हणावे लागते .

एस. अली. रझा ह्या बरसात , आन , अमर सारख्या यशस्वी हीट चित्रपटांच्या संवाद लेखकाशी तिने साठ च्या दशकात लग्न केले आणि हळूहळू चित्रपटातून आपले अंग काढून घेतले ….

चित्रपटात बहुतेक करून रडव्या भूमिकाच मिळालेली निम्मी प्रत्यक्षात मात्र समाधानी स्वभावाची होती .
सिनेसृष्टीत ती जेवढी सुखी समाधानी होती तितक्याच सुखा समाधानाने खाजगी आयुष्यात देखील दोघांनी संसार केला . मुंबईतील जुहू विभागातील आपल्या घरी साधं समाधानी आयुष्य जगली .

फक्त मुल नसणं हे एक दुख सोडलं तर कधीच तिने कशाबद्दल तक्रार केली नाही .जे मिळालं नाही त्याबद्दल न कोणती खंत ना खेद. जे आयुष्याने दिल त्याबद्दल मात्र भरभरून कृतज्ञता व्यक्त केली .

गेल्याच वर्षी 25 मार्च 2020 ला निम्मीचं निधन झालं . पण त्या आधी अगदी शेवट पर्यन्त अनेक फिल्मी कार्यक्रम आणि व इतर समारंभाना अगदी उत्साहाने उपस्थित असायची. म्हणूनच पतीच्या मृत्युनंतर सुद्धा ती जरी एकटी रहात असली तरी एकाकी कधीच नव्हती. म्हणूनच ह्या गोड अभिनेत्रीला पाहिलं की हेच गाणं गुणगुणावस वाटतं ..

“पतली कमर है
तिरछी नजर है
खिले फूल से तेरी जवानी
कोई बताए कहा कसर है”

 

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment