आर के चा ‘प्रेमरोग’ चाळीस वर्षाचा झाला!

-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

40 Years of Raj Kapoor’s Evergreen Film Prem Rog. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात राज कपूर खऱ्या अर्थाने ‘सपनोंका सौदागर’ होते. त्यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून रसिकांना स्वप्न दाखवली, स्वप्न दिली. इथल्या सामान्यांच्या जीवनात प्रेमाचा अर्थ समजावून सांगितला. त्यामुळे राजचे प्रेमपट हे सामान्यांना आपलेसे वाटतात. इथल्या कॉमन मन च्या आयुष्यातील प्रेम दाखवताना ते अर्थातच चाकालेताच्या वेष्टनात गुंडाळलेले गुडी गुडी प्रेम नसायचे या प्रेमाला सामाजिक/आर्थिक/ कौटुंबिक दु:खाची जाणीव असायाची. त्या मुले या प्रेमकथा इथल्या अस्सल मातीतल्या वाटायच्या. श्री ४२० असेल, आह असेल, अनाडी असेल किंवा आवारा असेल प्रत्येक ठिकाणाचा राज आणि त्याची प्रेयसी तुम्हाला तुमच्या आमच्यातील एक वाटते. त्या मुले आर के चे सिनेमे प्रेक्षक स्वत: सोबत को रीलेट करत आणि त्याना ते जास्त अपील करत. आज आपण आर के च्या एका वेगळ्या चित्रपटाची चर्चा करणार आहोत. मला राज कपूर यांचे या बाबतीत खूप कौतुक करावसं वाटतं ते असं की चाळीसच्या दशकातील सामाजिक विषयाला घेऊन त्यांनी ऐंशीच्या दशकात एक चित्रपट निर्माण केला आणि तो ‘सुपरहिट’ करून दाखवला. बालविवाह, विधवा विवाह, विधवांचे होणारे कौटुंबिक छळ हा खरंतर स्वातंत्र्य पूर्वीच्या काळातील समस्येचा विषय! पण राज कपूर यांनी 1982 साली ‘प्रेम रोग’ या चित्रपटातून याच ज्वलंत सामाजिक विषयाला वर्तमान काळात आणून रसिकांच्या पुढे पेश केले. या चित्रपटाला राज कपूरचा ‘मिडास टच’ इतका जबरदस्त होता की हे कथानक जुनं असलं तरी; कालबाह्य अजिबात वाटलं नाही. राज कपूर साठी किंबहुना आरके फिल्मसाठी या चित्रपटाला यश मिळणं खूप महत्त्वाचं होतं कारण यापूर्वी चा त्यांचा चित्रपट ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा सिनेम‘ वेगळ्याच’ कारणाने गाजल्यामुळे राज कपूरची दिग्दर्शनाची पकड ढिली होत आहे की काय असा समज रसिकांमध्ये पसरला होता. पण राज कपूरने या सर्व शंका-कुशंकांनी खोटे ठरवत ‘प्रेम रोग’ या चित्रपटाला दणदणीत यश मिळवून दिले. राज कपूरचा हा करिष्मा अफलातून होता. आज १३ ऑगस्ट २०२२, आर के चा ‘प्रेम रोग’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या काही आठवणी आणि या चित्रपटाच्या मेकिंग ची कहाणी खास राज कपूरच्या चित्रपट प्रेमींसाठी! 

या चित्रपटाची कथा राज कपूर यांना लेखिका कामना चंद्रा यांनी ऐकवली होती. हा काळ साधारणता 1977- 78चा होता. आर के चा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट त्य वेळी फ्लोअर वर होता. राज यांना ही कथा खूपच आवडली आणि त्यांनी ताबडतोब जैनेंद्र जैन यांना या कथेची पटकथा आणि संवाद लिहिण्यासाठी बोलावले.त्य वेळी  राज कपूर यांनी जैनेंद्र जैन यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तुम्हाला करायचे आहे असे सांगितले होते.खुश झाले आणि जोमाने कामाला लागले. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाची नायिका झीनत अमान  होती परंतु तिचा बालपणी चारोल पद्मिनी कोल्हापुरे हिने केला होता. राजकपूर यांच्या डोक्यात त्याच वेळी आपल्या आगामी ‘प्रेम रोग’ साठी पद्मिनी कोल्हापुरे ला नायिका  म्हणून घेण्याचे ठरवले होते. सत्यम शिवम सुंदरम चवळी पद्मिनी कोल्हापुरे  फक्त बारा वर्षाची  होती. (जन्म १९६५) . खरंतर पद्मिनी कोल्हापुरे आणि ऋषी कपूर यांचा हा दुसरा चित्रपट या दोघांचा पहिला चित्रपट होता. नासिर हुसेन यांचा ‘जमाने को दिखाना है’ हा चित्रपट चांगला असून देखील बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला. या दोन्ही चित्रपटात ची सुरुवात साधारणतः एकाच वेळी झाली होती, पण नासिर हुसेन यांना चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्याची घाई झाल्याने हा सिनेमा आधी प्रदर्शित झाला. जर कदाचित ‘प्रेम रोग’ नंतर ‘जमाने को दिखाना है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कदाचित यशस्वी देखील झाला आला!

‘प्रेम रोग’ या चित्रपटाचे छायाचित्रण आरके चे जुने जाणते  सिनेमॅटोग्राफर राघू कर्माकार (ज्यांनी जिस देश मे गंगा बहती है हा चित्रपट दिग्दर्शित केला होता) होते. चित्रपटाचे संकलन राज कपूर यांनी स्वतः केले होते. या चित्रपटात शम्मी कपूर, नंदा, तनुजा, ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, बिंदू , ओमप्रकाश, विजयेंद्र घाटगे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी पंडीत नरेन्द्र शर्मा , अमीर कजलबाश आणि संतोष आनंद यांनी लिहिली होती तर चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे होते. या चित्रपटात एकूण सहा गाणी होती आणि ही गाणी लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अन्वर आणि सुधा मल्होत्रा यांनी गायली होती. खरं तर या चित्रपटातील सर्व गाणी अन्वर गाणार होते परंतु त्यांनी अधिक मानधन मागितल्यामुळे राजकपूर त्यांच्यावर नाराज झाले आणि केवळ एका गाण्या नंतर त्यांची बोळवण करण्यात आली आणि उरलेली सर्व गाणी सुरेश वाडकर यांच्या स्वरात स्वरबद्ध करण्यात आली. या चित्रपटात जुन्या जमान्यातील एक गायिका सुधा मल्होत्रा यांचा स्वर खूप वर्षानंतर ऐकायला मिळाला होता हे गाणे सुधा मल्होत्रा यांनी अन्वर यांच्यासोबत गायले होते.गाण्याचे बोल होते ‘ ये प्यार था या कुछ और था’. या चित्रपटातील ‘भंवरे ने खिलाया फूल फुल को ले गया राज कुंवर ‘ हे गाणेपंडीत नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले होते. तर ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’ हे गाणे अमीर कजलबाश यांनी लिहिले होते. उर्वरित मुहोब्बत है क्या चीज हमको बतावो , मै हू प्रेम रोगी, ये प्यार था या कुछ और था, आणि ये गलीया ये चौबारा यहां आना न दोबारा हि  चारही गाणी संतोष आनंद यांच्या लेखणीतून उतरलेली होती. १९८२ साली  प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यादीत  बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये या चित्रपटाचा दुसरा क्रमांक होता. या चित्रपटाचे एकूण बजेट दोन कोटी  होते आणि या चित्रपटाने साडेसहा कोटी चा बिजनेस केला होता. यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता सुभाष घई यांचा ‘विधाता’!  योगायोगाने या चित्रपटाची नायिका देखील पद्मिनी कोल्हापुरी होती. दुसऱ्या क्रमांकावर ‘प्रेमरोग’ हा चित्रपट होता तर तिसऱ्या क्रमांकावर प्रकाश मेहरा यांचा ‘नमक हलाल’ होता. यावर्षी ‘डिस्को डान्सर’,’ सनम तेरी कसम’,‘नदिया के पार’,’ शक्ती ‘, ‘निकाह’,‘राजपूत’,’ सत्ते पे सत्ता’ हे चित्रपट लोकप्रिय ठरले होते.

आर के च्या  चित्रपटातील नायिकांना राज  मोठ्या ग्‍लॅमरस बोल्ड पद्धतीने रसिकांपुढे आणत असे परंतु या चित्रपटाचे कथानकच वेगळे असल्यामुळे चित्रपटातील नायिका पद्मिनी कोल्हापुरे ला अंगभर कपड्यात दाखवावे लागले! त्याची उणीव या चित्रपटात अभिनेत्री बिंदू ने काही प्रमाणात पूर्ण केली होती. चित्रपटाची कथा कामना चंद्रा यांनी लिहिली होती. या कामना चंद्रा यांनी पुढे ‘चांदनी’, ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचे कथानक लिहिले.(कामना चंद्रा यांचे चिरंजीव विक्रम चंद्रा आजच्या काळात मोठे नाव आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘सिक्रेट गेम्स” या वेबसिरीज च्या दोन्ही सिजन ला प्रचंड लोकप्रियता मिळाली.) या चित्रपटाची नायिका जरी पद्मिनी कोल्हापुरे असली तरी या चित्रपटासाठी मधू कपूर या अभिनेत्रीचा देखील विचार झाला होता परंतु मधू कपूर चा देखील विचार झाला होता. पण मधू कपूर त्यावेळी राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात काम करीत असल्यामुळे आणि या संस्थेशी करार बध्द असल्याने तिची संधी गेली. पद्मिनी कोल्हापुरी ने मात्र या चित्रपटात अप्रतिम भूमिका केली होती हे मान्य करावेच लागेल. शम्मी कपूर, तनुजा  आणि नंदा पहिल्यांदाच राज कपूर यांच्या दिग्दर्शनात काम करीत होते.राजकपूर आणि शम्मी कपूर यांनी यापूर्वी चार दिल चार राहे (१९५९) मध्ये  एकत्र अभिनय केला होता.

‘प्रेम रोग’ या चित्रपटाचे कथानक काहीसे जुने असले तरी राज कपूरने त्याला अजिबात जुनाट होऊ दिले नाही. या चित्रपटात दुहेरी संघर्ष होता. एक संघर्ष होता स्त्री-स्वातंत्र्याचा तिच्या हक्कांचा, तिच्या जाणिवांचा!आणि  दुसरा संघर्ष होता सामाजिक विषमतेचा. या दोन्ही प्रश्नांना राज कपूरने मनोरंजनाच्या वेस्टणातइतक्या चांगल्या पद्धतीने गुंफले होते की चित्रपट कथानकाची थीम  जरी जुनी  असली तरी तीवर्तमान पिढीला प्रचंड आवडून गेली. ठाकूर खानदानातील लाडात वाढलेली मनोरमा (पद्मिनी कोल्हापुरे) अल्लड वयाची  असते.प्यार, मोहब्बत  वगैरे तिला काही काही माहीत नसतं. त्या गावात असलेल्या पुजाऱ्याचा (ओम प्रकाश)भाचा  देवधर (ऋषी कपूर) तिचा बालपणीचा मित्र असतो. देवधर ला ठाकूरने(शम्मी कपूर) ने आर्थिक मदत करून   शहरात शिक्षणासाठी पाठवलेले असते. शिक्षण घेऊन देवधर जेव्हा गावात येतो तेव्हा मनोरमाने  तारुण्यात पदार्पण केलेले असते. देवधर तिच्याकडे आकर्षित होतो. मनोरमा अजूनही अल्लड असते. ती देवदार सोबत पूर्वीप्रमाणेच दंगामस्ती करते.त्याच्या हाताचा चावा घेते. देवधर तिच्यावर मनातल्या मनात एकतर्फी प्रेम करत असतो. त्याला स्वत:च्या सामाजिक परिस्थितीची जाणीव असते. याच काळात मनोरमा साठी ठाकूर घराण्याला तोलामोलाचे असलेले कुमार नरेंद्र प्रताप सिंग (विजयेंद्र घाडगे) यांचे स्थळ येते.कुंडली जमत नसताना ही मुद्दाम हून ती जमवली जाते. पद्मिनी आणि विजयेंद्र यांचे लग्न ठरते. आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणी ला विसरत देवधर मोठ्या मनाने त्या लग्नात सामील होतो. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी विजेयेंद्र घाडगे यांच्या कारचा एक्सीडेंट होतो आणि त्यात त्याचे निधन होते! एका दिवसात पद्मिनी कोल्हापुरेचे वैवाहिक आयुष्य संपते आणि ती  विधवा होते. मग सुरू होतात तिच्या आयुष्यातील छळाचे अध्याय! तिला पांढरे कपडे घालायला मजबूर केले जाते. सौंदर्यप्रसाधनं तिच्यापासून काढून घेतली जातात. आणि सर्वात कहर म्हणजे तिचे केस कापायला न्हाव्याला बोलावले जाते.विधवा स्त्रिया वरील हा पराकोटीचा अन्याय असतो. कुणालाच हा मान्य नसतो पण जुन्या परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वजण मूक संमती देत असतात.मनोरमा ची आई छोटी मां(नंदा) हिला आपल्या मुलीचे दुःख कळत असतं. आपल्या हसऱ्या खेळत्या मुलीएच्य आयुष्याची राख रांगोळी ती पाहत असते.  तिच्या नजरेने देवधर आणि मनोरमा यांच्या न उमललेल्या प्रेमाच्या अंकुराची  देखील माहिती असते. तिकडे सासरी मनोरमा च्या कौटुंबिक छळाची मालिका चालूच राहते आणि एका रात्री तिच्यावर तिचा मोठा दीर अतिप्रसंग करायला पुढे येतो.  आता मनोरमा पुरती हादरते आणि ती माहेरी परत येते.

इकडे देवधर पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आता संघर्ष मोठा बाका झालेला असतो कारण मनोरमा आता पूर्वीची  राहिलेली नसते तर ती आता एक विधवा असते. तिच्या लिंगपिसाट दिराकडून वारंवार तिला पुन्हा बोलावले जाते पण मनोरमा आई तिच्या बाजूने ठाम उभी राहते! कोवळ्या वयातील वैधव्य आणि नव्याने फुटलेला प्रेमाचा अंकुर या प्रश्नाच्या गुंत्यात मनोरमा पुरती अडकून जाते. काय निर्णय घ्यावा याबाबत ती प्रचंड गोंधळलेली असते. पण शेवट गोड होतो. देवधर मोठा संघर्ष करून मनोरमाला आपली करतो.दोन प्रेमी जीव एकत्र येतात.

या चित्रपटातील ‘भंवरे ने खिलाया फूल ‘ हे गाणे राज कपूर यांनी ॲम्स्टरडॅम च्या ट्यूलिप गार्डनमध्ये चित्रित केले होते. त्यावर्षी यश चोप्रांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे अमिताभ आणि रेखा चे गाणे देखील ॲम्स्टरडॅम ला चित्रित केले होते. त्याची त्या काळात फिल्मी वर्तुळात मोठी चर्चा होत होती. राज कपूर यांनी देखील आपल्या ‘प्रेम रोग’ मधील ‘भंवरे ने खिलाया फूल’ हे गाणे तिकडे चित्रित करायचे ठरवले. राज कपूर यांचे चिरंजीव रणधीर कपूर यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यांच्या मते आपल्या चित्रपटाचा जॉनरवेगळा असल्याने तिकडे चित्रित करायची अजिबात आवश्यकता नाही. परंतु राज कपूर यांनी हट्टाने ते गाणे तिकडे चित्रीत केले. तब्बल नऊ दिवस या गाण्याचे चित्रीकरण तेथे चालू होते. राजकपूर यांनी ‘आपण स्वप्न विकायला हवीत. त्यासाठी कुठलीही तडजोड करता कामा नये’ असे सांगितले. या सिनेमाचे प्रॉडक्शन पूर्णतः रणधीर कपूर हाताळत होता तर राज कपूर यांचा तिसरा मुलगा राजीव कपूर दिग्दर्शना मध्ये  राज कपूर यांना मदत करत होता. राजीव कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचे सूत या चित्रपटाच्या सेटवर जुळले होते परंतु राज कपूर यांनी दोघांनाही तंबी दिली आणि पद्मिनी कोल्हापुरी ला तर चक्क ‘जर पुन्हा तु राजीव  कपूरसोबत दिसली तर या चित्रपटातून तुला काढून टाकण्यात येईल’ असा दम दिला! आणि दोघांच्या प्रेम कहाणीला पूर्णविराम मिळाला.

अभिनेत्री नंदा शम्मी कपूर पहिल्यांदाच आर के फिल्म मध्ये काम करत होते. नंदा आणि पद्मिनी कोल्हापुरी या दोन्ही मराठी अभिनेत्रींनी यापूर्वी 1981साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात आई आणि मुलीची भूमिका केली होती. यानंतर 1983 मध्ये आलेल्या  यश चोप्रांच्या ‘मशाल’ या चित्रपटात तिसऱ्यांदा या दोघींनी आई आणि मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच ऋषी कपूर आणि सुषमा सेठ यांनी एकत्र भूमिका केली होती त्यानंतर या दोघांनी ‘चांदनी’,‘बोल राधा बोल’,’ दिवाना’,‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटात आई आणि मुलाची भूमिका केली. नंदा यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी राजकपूर यांनी त्या पूर्वी आशा पारेख आणि सिमी गरेवाल यांनादेखील विचारले होते पण दोघींनी देखील आईची भूमिका करायला नकार दिल्याने ही भूमिका नंदा यांच्या वाट्याला आली. यावर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये तब्बल 10 कॅटेगिरी या चित्रपटाला मध्ये नामांकन मिळाले होते. त्यापैकी राजकपूर – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पद्मिनी कोल्हापुरे- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, संतोष आनंद – सर्वोत्कृष्ट गीतकार (मोहब्बत है क्या चीज हमको बताओ)आणि  राज कपूर – सर्वोत्कृष्ट संकलन हे पुरस्कार मिळाले. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (ऋषी कपूर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (नंदा), सर्वोत्कृष्ट कथा (कामना चंद्रा), सर्वोत्कृष्ट संगीतकार (लक्ष्मीकांत-प्यारेलाल) सर्वोत्कृष्ट गीतकार अमीर कजलबाश(मेरी किस्मत मे तू नही शायद) आणि सर्वोत्कृष्ट गायक सुरेश वाडकर(मेरी किस्मत में तू नहीं शायद) यांना फिल्मफेअर चे नामांकन मिळाले होते.सर्वात कमी वयात सर्वोत्कृष्ट नायिकेचा फिल्मफेयर पुरस्कार मिळविणारी पद्मिनी कोल्हापुरे हि सर्वात कमी वयाची अभिनेत्री होती! (बॉबी च्या वेळी डिम्पलला देखील याच वयात पुरस्कार मिळाला होता पण तो विभागून होता जया भादुरी सोबत! जयाला ‘अभिमान’ साठी पुरस्कार होता.)  तर हि होती ‘प्रेमरोग’ या सिनेमाच्या मेकिंग ची कहाणी!

‘कॉस्मोपोलिटन या मासिकाने भारतातील सर्वोत्कृष्ट दहा रोमांटिक चित्रपटात ‘प्रेम रोग’ समावेश केला आहे!

हेही वाचा – मुघल-ए-आझम ची ६१ वर्षे; मुघल-ए-आझम च्या अजरामर संगीताच्या मेकिंगची कहाणी

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment