38 Years of Hero; हिरोगिरी ची ३८ वर्षे!

– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

38 Years of the 1983 Hindi Film Hero Starring Jackie Shroff, Meenakshi Seshadri, Directed by Subhash Ghai. आजच्या दिवशी १९८३ साली हिरो प्रदर्शित झाला त्याच्या पंधरा दिवस आधी म्हणजे २ डिसेंबर १९८३ ला ‘कुली’ प्रदर्शित झाला होता. ‘कुली’च्या शूटिंगदरम्यान झालेल्या जीवघेण्या अपघातातून परतलेला सुपरस्टार महानायक अमिताभचा ‘कुली’ सर्वत्र तुफान गर्दी खेचत होता. अशा वेळी कोण्या एका नवख्या जॅकी नावाच्या माणसाला घेऊन दिग्दर्शक सुभाष घई हिरोगिरी करायला आले! दारासिंग समोर कुस्तीच्या आखाड्यात एखाद्या नवशिख्या पहेलवानाला उभे करण्यासारखे धाडस होते हे! ना प्रदर्शनास थिएटर मिळत होते ना वितरक! कोण रिस्क घेणार? कोण जबाबदारी घेणार? 

केवळ एका चित्रपटाचा अनुभव असलेल्या व हातात बासरी घेतलेल्या जॅकी दादासमोर उभा होता एक असा नायक जो तेंव्हा प्रेक्षकांसाठी देवापेक्षा कमी नव्हता. त्याच्या अपघाता दरम्यान बोललेले अवघडातले अवघड नवस फेडणेही अजून  संपले नव्हते लोकांचे. कित्येक वितरक सुभाषजींवर हसत होते… खिल्ली उडवत होते. ‘कोण कुठला नवखा हिरो, जो सिनेमात एक गुंड आहे आणि बासरी काय वाजवत असतो…?! याचा सिनेमा लावायचा? तेही अमिताभ समोर!’ प्लस पॉईंट काय तर फक्त हिट म्युझिक! सिंगल स्क्रीन मध्ये लागलेले सिनेमे कित्येक आठवडे हलायचे नाहीत असा तो काळ. दिग्दर्शक म्हणून हिरोच्या आधी कालिचरण, विश्वनाथ, कर्ज, क्रोधी, विधाता या सिनेमांची पुण्याई सुभाषजींच्या खात्यावर जमा होती. ‘अजून महिना दोन महिने थांबा’ असा वितरकांनी दिलेला सल्ला सुभाषजींनी न मानता ‘हिरो’ कुली समोर रिलीज केलाच. या रोमँटिक म्युझिकल ने हळूहळू तरुणाईवर अशी काही जादू केली की बस्स!

सुभाषजींनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना कथा ऐकवली तेंव्हा जोडीचे म्हणणे होते की या सिनेमास असे संगीत हवे की जे वर्षानुवर्षे रसिकांना स्मरणात राहील. झालेही तसेच. बासरीची जादू अशी काही चालली कि रसिक श्रोत्यांना अक्षरशः वेड लागले. बासरी चा तो प्रसिद्ध ट्यून चा पॅच प्यारेलाल जींनी पियानो वर आधी बनवला. सुप्रसिद्ध बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांना मग तो ऐकवण्यात आला आणि मग त्यांनी आपल्या मधुर बासरीने ती ट्यून अजरामर केली. जे जॅकी बाबत घडले तेच मीनाक्षी बाबत. सुभाषजी आधी मीनाक्षीला या रोलसाठी फायनल करण्यास फारसे उत्सुक नव्हते पण त्यांना या भूमिकेसाठी उत्कृष्ट नर्तिका हवी होती. मीनाक्षी एक उत्तम भरत नाट्यम नर्तिका आहे हे कळल्यावर तिला फायनल करण्यात आले. या सिनेमाने मीनाक्षीचेही नशीब पालटले. जसा जॅकीचा ‘स्वामी दादा’ नंतर ‘हिरो’ हा दुसराच चित्रपट होता तसाच मीनाक्षीचाही ‘पेंटर बाबू’ नंतर हा दुसराच सिनेमा होता. 

सुभाषजींनी पटकथेवर व लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीने संगीतावर प्रचंड मेहनत घेतली. प्रत्येक गाणे इतके काही सुंदर बनले की आजही सर्व गाण्यांची जादू कायम आहे. रेश्मा यांच्या दर्दभऱ्या आवाजातले ‘लंबी जुदाई’; अनुराधा पौडवाल, मनहर उधास यांच्या आवाजातले ‘तू मेरा हिरो है’; लता मंगेशकर, मनहर यांच्या आवाजातले ‘प्यार करने वाले कभी डरते नही’;  लतादीदींचे सोलो ‘निंदिया से जागी बहार’; सुरेश वाडकर-लता यांचे ड्युएट ‘मोहब्बत ये मोहब्बत’ व अखेरीस ज्या गाण्याने तरुणाईला डोलायला लावले ते अनुराधा पौडवाल-मनहर यांचे ‘डिंग डाँग ओ बेबी सिंग सॉंग’. सर्व गाणी एकाहून एक. एक परफेक्ट म्युझिक अल्बम.  आजही यापैकी कुठलेही गाणे ऐका …तितकेच फ्रेश व एव्हरग्रीन. ‘डिंग डाँग’या गाण्यात जॅकी व त्याच्या मित्रांनी चालवलेल्या यामाहा राजदूत बाईकची मोठी क्रेझ तरुणाई मध्ये निर्माण झाली होती. कलाकारांमध्ये शम्मी कपूर, संजीव कुमार, अमरीश पुरी, बिंदू, शक्ती कपूर या सर्वांचीच कामे छान झाली होती. 

महानायकाच्या सिनेमासमोर आठवडाभर तरी तग धरतो कि नाही अशी शंका असलेल्या लोकांची बोलती बंद झाली. नव्हे तर ती केली होती. सुभाष घई व लक्ष्मीकांत प्यारेलाल या त्रिकुटाने. एका नवख्या पहेलवानाने कुस्तीच्या आखाड्यात दारासिंग समोर उभा ठाकायचे आवाहन लीलया स्वीकारले व यशस्वीरीत्या पेलले होते. कित्येक ठिकाणी हिरोने रौप्य महोत्सव (२५ आठवडे), सुवर्ण महोत्सव (५० आठवडे) साजरा केला. १९८३ साली तरुणाईने आवडलेला असाच रोमँटिक म्युझिकल चित्रपट होता सनी देओल-अमृता सिंग चा ‘बेताब’. हिम्मतवाला, अंधा कानून, मवाली, अवतार, सौतन, अगर तुम ना होते हे यावर्षीचे इतर ब्लॉकबस्टर हिट चित्रपट. पण या हिरोने दाखवलेली हिरोगिरी काही वेगळीच होती!

हेही वाचा – राजा हिंदुस्तानी ..संगीतमय प्रेमकथेची २५ वर्षे

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment