त्या वर्षी आजच्या दिवशी-‘मैने प्यार किया’ची ३३ वर्षे!

– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

33 Years of Maine Pyar Kiya.

एलपी रेकॉर्ड्सचा काळ संपून बाजारात नव्याने टेप रेकॉर्डर व ऑडियो केसेट्स चे युग सुरु झाले…साधारणतः ८० चे दशक अर्धे संपले होते तो काळ. रेडिओसमोर दूरदर्शनचे आवाहन होते… एलपी रेकॉर्डस् समोर कॅसेट्सचे व सिनेमागृहांसमोर व्हीसीआर चे! १९८५ ते ९० चा तो काळ. १९८८ साली, वय वर्षे ९ या फारसे काही न कळण्याच्या वयातही घरात नव्या फिलीप्सच्या टेप रॅकोर्डरवर ‘कयामत से कयामत तक’ व ‘शहेनशाह’ च्या कॅसेट्स ची ‘ए’ आणि ‘बी’ बाजूची आलटून पालटून पारायणं मी केली आहेत. सिनेपत्रकारितेच्या निमित्ताने वडिलांचे औरंगाबादेतील आमच्या घराजवळच असलेल्या अभिनय सिनेमागृहात नेहमी येणे-जाणे असायचे. बऱ्याचदा माझी पण त्यांच्यासोबत जाण्याची लॉटरी लागायची. त्यांचे काम होईपर्यंत १०-१५ मिनिटे कधी कधी अर्धा तास आत चालू असलेला सिनेमा, बाल्कनीत आत जायच्या पायऱ्यांवर उभा राहून पाहण्याचे भाग्य मला लाभायचे. त्याकाळी असा सिनेमा बघायला मिळणे हे म्हणजे भाग्याचेच लक्षण. ८७ सालच्या ‘मि. इंडिया’ व ८८ सालच्या ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमांची अशी थोड्या-थोड्या वेळ उभे राहून खूप पारायणे झाली. १९८९ साली जेंव्हा डोक्यात फक्त आणि फक्त अमिताभ होता व ‘शहेनशहा’ मधील त्याचा लोखंडी हात, तेंव्हा वडिलांनी घरात नवख्या हिरो-हिरोईन असलेल्या सिनेमाच्या गाण्यांची कॅसेट आणली. क्यूएसक्यूटीने (कयामत से कयामत तक ) हिरो-हिरोईन मध्ये जरी नवखेपण असलं तरीही सिनेमातील गाणी छान असतात हे लव्ह स्टोरीज मधले आकर्षण नसलेल्या वयातही कळलं होतं. ‘सर्व गाणी लता मंगेशकर यांनी गायली आहेत’ हे एमपीके (मैने प्यार किया) ची कॅसेट आणल्यावर वडील कोणालातरी सांगतानाचे ऐकून लता मंगेशकर म्हणजे खूप मोठी गायिका हे पहिल्यांदा डोक्यात घट्ट बसले. वयाच्या १० व्या वर्षी. यानंतर या ‘एमपीके’ च्या गाण्यांनी व नंतर सिनेमानी काय इतिहास घडविला ते आपण सर्व जाणतोच. 

Maine Pyar Kiya cassette cover

आज ‘एमपीके’ ३३ वर्षांचा झालाय. हिंदी सिनेमा इंडस्ट्रीतले एकमेव कौटुंबिक चित्रपटांचे निर्माते अशी ओळख असलेले राजश्री प्रोडक्शन हे बॅनर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असतांना, ज्या चित्रपटाने नुसत्या बॅनरलाच जीवनदान नव्हे तर नायकाला, संगीतकाराला व दिग्दर्शकाला ओळख मिळवून दिली असा चित्रपट म्हणजे  मैने प्यार किया… एमपीके! बीवी हो तो ऐसी या सिनेमामधील छोट्याशा भूमिकेनंतर नव्याने आलेल्या दूरदर्शनवर थम्स-अप च्या जाहिरातीत दिसणारा सलमान नावाचा २३ वर्षांचा तरुण कोणी आपल्याला नायक म्हणून काम देईल का यासाठी संघर्ष करत होता. वडील सलीम खान प्रथितयश लेखक असल्याने सिनेमाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही होते. असेच आवाहन आणखी एका २३ वर्षाच्या तरुणावर होते. तो होता दिग्दर्शक सुरज बडजात्या. दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट हातात घेतांना राजश्री प्रोडक्शन चा वारसा पुढे नेण्याचे आवाहन. व तेही अशा वेळी जेंव्हा बॅनर न भूतो ना भविष्यती अशा आर्थिक संकटात सापडलेले असतांना. सिनेमा उद्योगाच्या अपेक्षा असलेले हे दोन तरुण पहिल्यांदा नायक व दिग्दर्शक या दोन जबाबदाऱ्या हातात घेत होते. 

Salman Khan and Bhagyashree in Maine Pyar Kiya

सिम्पल लव्हस्टोरी असलेल्या एमपीके साठी फ्रेश चेहरे नायक-नायिका म्हणून हवे होते. शबीना दत्त या सलमान सोबत त्या काळात एका जाहिरातीत काम केलेल्या मॉडेलची एमपीकेच्या सुमन या नायिकेच्या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट झाली. शबीना त्यात फेल झाली पण सुरज यांनी तिला  चित्रपटाच्या नायकासाठी म्हणून कोणाचे नाव आहे का? असे विचारल्यावर तिने सलमानचे नाव सुचवले. सुरज यांना हवा असलेला प्रेम त्यांना सलमान मध्ये लगेच सापडला. आता नायक फायनल झाल्यावर नायिकेचा शोध सुरु झाला. 

आपल्या महाराष्ट्रातील सांगलीच्या राजघराण्याची तेंव्हाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी असलेल्या भाग्यश्री पटवर्धन ची कहाणी थोडी वेगळी होती. तिला सिनेमात येण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तिचे वडील व सुरज बडजात्या यांचे वडील राजकुमार बडजात्या यांची मैत्री होती. राजूकमार बडजात्यांनी भाग्यश्रीचे दूरदर्शनवरील कच्ची धूप या मालिकेतील काम पाहिले होते, तेंव्हा त्यांना तिच्यात सुमन सापडली होती. परंतु सुरज बडजात्या यांचा प्रस्ताव भाग्यश्रीने सतत काहीना काही कारण सांगून नाकारला. पण सुरज काही ऐकेनात हे बघून तिने अखेर होकार दिला. एमपीकेचे शुटिंग सुरु झाले तेंव्हा १९ वर्षीय तरुण भाग्यश्री हिमालयाच्या प्रेमात पुरती बुडाली होती. 

Salman Khan and Laxmikant Berde in Maine Pyar Kiya

एमपीके मधील तीन मराठी नावांनी इतिहास घडविला. पहिली भाग्यश्री. भाग्यश्री नंतर दुसरे मराठी नाव एमपीके सोबत जोडले गेले ते म्हणजे विजय पाटील. आता विजय पाटील कोण? विजय पाटील म्हणजे संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतले लक्ष्मण. कारण या जोडीतले सुरेंद्र म्हणजे राम यांचे ७७ सालीच निधन झाले पण तरीही विजय पाटील यांनी रामलक्ष्मण हे नाव कायम ठेवले. रामलक्ष्मणांच्या एमपीके मधील संगीताने काय जादू केली व काय इतिहास घडविला हे इथे वेगळे सांगण्याची गरज नाही.  एमपीके सिनेमाच्या यशाचे जेवढे श्रेय सुरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाला आहे तितकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे ते रामलक्ष्मण यांच्या सुमधुर व एव्हरग्रीन रोमँटिक संगीताला जे कि आजही त्याची जादू टिकवून आहे. आजची यु-ट्यूबवरील तरुणाई सुद्धा कोट्यवधींच्या संख्येने ही गाणी ऐकते, बघते हे आकड्यानिशी यु-ट्युबर गेल्यावर दिसते. 

salman khan and bhagyashree in maine pyar kiya

भाग्यश्री व रामलक्ष्मण नंतर तिसरे मराठी नाव ज्याला सुद्धा या सिनेमाच्या यशाचे मोठे श्रेय जाते तो म्हणजे आपला लक्ष्या अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्याची ही हिंदीतील एंट्री होती. लक्ष्या तेंव्हा मराठीतला सुपरस्टार नायक होता व त्याच्या चाहत्यांना त्याने हिंदीत केलेली दुय्यम दर्जाची भूमिका खटकली होती परंतु एमपीके मध्ये सलमान व भाग्यश्री पेक्षाही अभिनयात लक्ष्या जास्त प्रभावी वाटला होता. प्रेमचा मित्र मनोहर ही भूमिका साकारताना लक्ष्याने जेवढी विनोदी प्रसंगात मजा आणली होती तितक्याच ताकदीने त्याने इमोशनल सीन्स सुद्धा साकारले होते. लक्ष्या हा एमपीके चा पाठीचा कणा होता.

लक्ष्यानंतर या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेले चौथे मराठी नाव पण आहे पण ते अर्धेच मराठी आहे कारण त्या कलाकाराची केवळ आई मराठी आहे. ती आई म्हणजे अभिनेत्री नूतन तो कलाकार म्हणजे त्यांचा मुलगा मोहनीश बहल ज्याने या सिनेमातील खलनायक जीवन साकारला. सूरज बडजात्या यांना जीवनच्या खलनायकी भूमिकेसाठी मोहनीश हवा होता. पण नूतन यांना यासाठी कसे विचारावे या विवंचनेत सुरज बडजात्या होते. राजश्री प्रोडक्शन आणि नूतन यांचे संबंध खूप जुने आणि चांगले होते त्यामुळे अधिकच अडचण सुरज यांना जाणवत होती. अखेर सुरज यांनी नूतन यांना कसेबसे विचारले. त्या तयार झाल्या पण एका आश्वासनानंतर. या सिनेमा नंतर भविष्यात मोहनीश यांना अतिशय सकारात्मक, चांगल्या व नूतन यांना अभिमान वाटेल अशा भूमिका देण्यात येतील हे ते आश्वासन होते. ‘हम आपके है कौन’ व ‘हम साथ साथ है’ मध्ये हे दिलेले आश्वासन सुरज यांनी पूर्ण केले. एमपीकेत आणखी एक प्रमुख मराठी नाव होते..  ते म्हणजे रिमा लागू, सलमानच्या आईच्या भूमिकेत ज्यांनी रंग भरले होते. 

Mohnish Behl and Salman Khan in Maine Pyar Kiya

इतक्या कठीण आर्थिक परिस्थितीत असूनही व जवळपास सर्वच नवोदित कलाकार घेऊनही एमपीकेचे निर्मिती बजेट तेंव्हा २ कोटी एवढे झाले होते. कमाईचा आकडा साधारण ४५ कोटींच्या घरात आहे. राम-लखन, चांदनी, त्रिदेव, चालबाज व ऐलान-ए-जंग या त्यावर्षीच्या सर्व सुपरहिट सिनेमांना त्याने मागे टाकले. स्टिरिओफोनिक साउंड नावाचा ध्वनीमधील अत्याधुनिक प्रकार या सिनेमाद्वारे सुरज यांनी प्रथमच हिंदीत आणला होता. प्रदर्शनाची वेळ जवळ आली तेंव्हा सिनेमागृहात श्रीदेवीचा चालबाज धुमाकूळ घालत होता. राजश्रीचे कौटुंबिक म्हणजेच अव्यावसायिक बॅनर अशी इमेज, त्यात नवे हिरो-हिरोईन ज्यांना कोणीच ओळखत नाही यामुळे सुरुवातीला वितरक सिनेमाला हात लावायला तयार नव्हते.

आदल्या वर्षी आलेल्या क्यूएसक्यूटी ने तरुणाईला आवडेल अशा म्युझिकल लव्ह स्टोरीज च्या सिनेमांची वातावरण निर्मिती केली होती हा एमपीके साठी प्लस पॉईंट ठरला. वितरकांना गाणी ऐकवली गेली… तब्बल ११ गाणी हेही त्याकाळी पचायला अवघड मानले जायचे. सुरुवातीला ३० प्रिंट्सने सिनेमा प्रदर्शित केला गेला. म्हणजे प्रमुख शहरांमध्ये. नंतर ही संख्या वाढत वाढत १ हजारापर्यंत गेली. एका-एका गाण्याने तरुणाईवर अक्षरशः जादू केली. १९ वर्षीय भाग्यश्रीला आवाज दिला गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ज्या तेंव्हा बरोबर ६० वर्षांच्या होत्या तर २३ वर्षीय सलमानला आपला जादुई आवाज देणारे एस.पी. बालसुब्रमण्यम तेंव्हा ४३ वर्षांचे होते.

 

सिनेमाच्या संगीताने इतका काही धुमाकूळ घातला कि नव्याने आलेल्या कॅसेट उद्योगाला चालना मिळाली. १ कोटीच्या वर कॅसेट्स ची विक्री झाली. व्हेन लव्ह कॉल्स नावाने सिनेमा इंग्रजी भाषेत डब करून रिलीज करण्यात आला. ही इंग्रजी आवृत्तीसुद्धा जगभर रेकॉर्डब्रेक करणारी ठरली.  तेलगू व तामिळ भाषेतही डबिंग करून सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. एमपीके ला त्यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तब्बल १२ नामांकन मिळाली ज्यातील ६ पुरस्कार सिनेमाने पटकावले. सलमान खान व भाग्यश्रीला सर्वोत्कृष्ट नवोदित नायक व नायिका, एस.पी. बालसुब्रमण्यम यांना उत्कृष्ट गायक, असद भोपाली यांना उत्कृष्ट गीतकार, रामलक्ष्मण यांना उत्कृष्ट संगीतकार व उत्कृष्ट चित्रपट म्हणून राजश्री प्रॉडक्शन ला. 

Maine Pyar Kiya

एमपीके ने हिंदी सिनेमाला काय दिले त्याचे उत्तर आहे सलमान खान व सुरज बडजात्या व रामलक्ष्मण. एमपीकेने प्रेक्षकांना काय दिले याची अनेक उत्तरे आहेत. तरुणांना साधी-भोळी सुमन आवडली तर तरुणी डॅशिंग प्रेमवर भाळल्या. आमच्यासारखी शाळकरी मुले नव्याने आलेल्या टेप रेकॉर्डवर ऐकायला अजून एक हिट गाण्यांची कॅसेट आली यावर आनंदी होती. 

९० च्या दशकावर आधारित हिंदी चित्रपटांच्या इतर लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment