– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

30 years of actor Ajay Devgn. १९९१ चे वर्ष. मी हायस्कुल म्हणजेच आठवीत प्रवेश करून अजून आठ महिनेही नव्हते झाले. नाकाच्या खाली मिसुरडं पण अजून धड फुटलं नव्हतं पण ऑगस्ट महिन्यात आलेल्या ‘साजन’ मधील ‘देखा है पहेली बार साजन की आँखों में प्यार’ सतत गुणगुणावं वाटायचं. असं का होतंय हे समजण्याइतकी सुद्धा अक्कल नव्हती. घरच्या टेप रेकॉर्डरवर वाजवायला ज्या कॅसेट्स चे ऑप्शन्स होते त्यात नदीम श्रवण जोडीच्या सिनेमांची संख्या हळूहळू वाढत होती. आशिकी आणि दिल है की मानता नही नंतर साजन ही या जोडीची घरात आलेली तिसरी कॅसेट. वडील सिनेपत्रकार असल्याने म्युझीकल हिट सिनेमाची ऑडियो कॅसेट चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच  घरात यायचा रतीब होता. अशात टिप्स म्युझीक कंपनीची कोण्या एका काळ्या/सावळ्या आणि अगदीच अति सामान्य दिसणाऱ्या हिरोच्या आगामी सिनेमाची कॅसेट घरात आली. संगीतकार नदीम-श्रवण यांची ही घरात आलेली चौथी कॅसेट. येणारा सिनेमा होता ‘फुल और कांटे’. ना हिरो ओळखीचा ना हिरोईन. असो. ऐकून बघावं म्हटलं तर गाणी आवडायला लागली. १९९१ साली आजच्या दिवशी जेंव्हा सिनेमा लागला तेंव्हा तो हिट आहे आणि सिनेमाच्या त्या अति-सामान्य दिसणाऱ्या हिरोची सिनेमातील एंट्री मात्र असामान्य आहे, हिरोने सिनेमात जबरदस्त ऍक्शन सीन्स दिले आहेत असं ऐकू यायला लागल्यावर अजय देवगण या नावाला गांभीर्याने घेण्यास सुरुवात झाली. पण सिनेमा पाहून आल्यावरही हा नवीन हिरो काही फारसा आवडला नव्हताच.

आमचा आठवी ते दहावी हा प्रवास संपेपर्यंत म्हणजे १९९४ पर्यंत या नवीन ऍक्शन हिरोचे तीनच वर्षात १२-१५ सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्यातील बरे चालले ते ‘जिगर’, ‘दिलवाले’, ‘सुहाग’ वैगरे. हिट संगीत आणि सोबतीला प्रचंड मारधाड असे व्यावसायिक गणित बसलेल्या सिनेमांचा हा हिरो अशी त्याची ओळख. या ओळखीला सार्थ ठरवणारा ‘नाजायज’, ‘गुंडाराज’, ‘हलचल’, ‘हकीकत’, ‘दिलजले’, ‘जान’ असा त्याचा प्रवास आम्ही ११वी-१२ वी या महाविद्यालयीन जीवनात अनुभवला. या काही वर्षात बऱ्याचशा सिनेमांत आई किंवा वडील अकाली मरण पावलेला किंवा वडिलांच्या शोधात असलेला अनाथ नायक अशा प्रकारच्या बहुतांश पात्रांमुळे अजयची ओळख  ९० च्या दशकात ‘हिंदी सिनेमाचा नाजायज हिरो’ अशी होऊन बसली होती.  

अजयने काहीतरी वेगळे केले आहे किंवा चौकटीबाहेर केले आहे आणि त्यामुळे तो पहिल्यांदा मला आवडला ती वर्षे होती १९९७ आणि १९९८.  ‘इश्क’ आणि ‘प्यार तो होना ही था’ हे या दोन वर्षातील दोन सिनेमे ज्यात अजयने आपल्या  इंटेन्स हिरोच्या इमेजला तडा देऊन पहिल्यांदा कॉमेडी ट्राय केली. ‘ऐसा ही हूँ मैं’ असे त्याच्या खास स्टाईल मध्ये म्हणणारा ‘प्यार तो होना ही था’ मधील अजयने रंगविलेला शेखर प्रचंड आवडला. आणि तिथून मला तरी अजय देवगण आवडायला सुरुवात झाली.  शिवाय आपल्या करिअरमधील पहिला राष्ट्रीय सन्मान अजयला मिळाला १९९८ साली. ‘जख्म’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला.

मग त्यानंतर आलेल्या पाच-सहा वर्षात त्याच्या बऱ्याच सिनेमांपैकी एकानंतर एक आवडलेले अजयचे सिनेमे म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’, ‘कच्चे धागे’, ‘कंपनी’, ‘लेजंड ऑफ भगत सिंग’ (दुसरा राष्ट्रीय पुरस्कार), ‘दिवानगी’, ‘कयामत’, ‘गंगाजल’, ‘जमीन’, ‘खाकी’ आणि ‘युवा’. म्हणजे २००४ पर्यंतचे. माझ्या मते अजय देवगण खऱ्या अर्थाने खुलला तो या ५-६ वर्षात. त्याने आपल्या भूमिकांमध्ये इतकी काय व्हरायटी आणली की बस्स. त्यासोबत काम करण्यास एकाहून एक टॉपचे दिग्दर्शक उत्सुक असायचे असा हा काळ. १९९९ आणि २००० साली त्याने स्वतः निर्माता बनण्याची घाई केली आणि ‘हिंदुस्तान की कसम’, ‘दिल क्या करे’ आणि ‘राजू चाचा’ असे फ्लॉप्स सिनेमे निर्माता अजय देवगण च्या नावावर जमा झाले. 

२००५ हे वर्ष त्याच्यासाठी अत्यंत खराब ठरले. यावर्षी प्रदर्शित झालेल्या तब्बल ८ सिनेमांपैकी ७ सपशेल आपटले .. लक्षात राहिला केवळ प्रकाश झा यांच्या ‘अपहरण’ मधील त्याने रंगविलेला अजय शास्त्री. २००६ मात्र अजयसाठी गेम चेंजर होते. विशाल भारद्वाज ने अजयला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन बनविलेला शेक्सपिअरचा ऑथेल्लो म्हणजेच ‘ओंकारा’ प्रेक्षकांना आवडला. शिवाय अजयच्या करिअरमध्ये सर्वात महत्वाची आणि यशस्वी ठरलेली त्याची दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबतची जोडी यावर्षी जमली. तसे हे दोघे २००३ साली ‘जमीन’ मध्ये पहिल्यांदा एकत्र आले होते पण ‘गोलमाल’ सीरिजने आजपर्यंत जे यश मिळवले आहे ते बघता, २००६ हे वर्ष जास्त महत्वाचे. शिवाय रोहित शेट्टी ने अजयला ‘गोलमाल’ व्यतिरिक्त ‘सिंघम’ आणि ‘बोल बच्चन’ या सिनेमांद्वारे त्याच्या करिअरमधील एव्हरग्रीन कल्ट क्लासिक व्यक्तिरेखाही दिल्या आहेत. जसा निर्माता म्हणून आपल्या पहिल्या प्रयत्नात अजय फसला तसा २००८ साली ‘यु, मी और हम’ या पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रयत्नातही तो आपटला. सिंघम, गोलमाल सिरीज आणि बोल बच्चन व्यतिरिक्त २०१० ते २०२० या १० वर्षांमधील अजयच्या काही विशेष भूमिकांचा उल्लेख करायचा झाल्यास त्यात ‘वन्स अपॉन या टाइम इन मुंबई’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘सन ऑफ सरदार’, ‘सत्याग्रह’, ‘दृश्यम’, ‘रेड’, ‘दे दे प्यार दे’ आणि ‘तान्हाजी’ या सिनेमांचा समावेश करावा लागेल.

आज अजयने फिल्म इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. २ राष्ट्रीय पुरस्कारांसहित त्याला एकूण ३२ पुरस्कार या ३० वर्षात मिळाले आहेत. मोठ्या मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने व मुख्य म्हणजे कुठल्याही गॉडफादर शिवाय स्वतःच्या बळावर रसिकांच्या लाडक्या या तान्हाजीने  हा ३० वर्षांचा अवघड असा गड अगदी सहजरित्या सर केला आहे. आज अजय आघाडीचा सुपरस्टार तर आहेच शिवाय निर्मिती, दिग्दर्शन, फायनान्स, वितरण, जाहिरात अशा सर्वच क्षेत्रात ‘दि अजय देवगण’ एक मोठा ब्रँड आहे. पुढल्या वर्षी त्याने निर्मित-दिग्दर्शित व अभिनीत केलेला ‘मेडे’ नावाचा सिनेमा येत आहे, ज्यात अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत यांची प्रमुख भूमिका असणार आहे. 

अजय १९९१ साली आला तेंव्हा अमिताभचा ‘हम’ प्रदर्शित झाला होता. सुपरस्टार बीग बी यांची ती  नायक म्हणून मावळतीची वर्षे होती. अजयच्या वडिलांनी म्हणजे ऍक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी कित्येक सिनेमात अमिताभ यांची ऍक्शन दृश्ये दिग्दर्शित केली आहेत. ३० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी उदयास आलेल्या सुपरस्टार अजय देवगण ला आज अमिताभ यांनी रात्री बरोबर १२ वाजता ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत आणि अभिनंदन केले आहे. पुत्र अभिषेक बच्चन च्या अभिनयाची तारीफ झालेला यावर्षीचा ‘दि बिग बुल’ ही अजयची निर्मिती होती हे पिता अमिताभ बच्चन कसे विसरू शकतात. 

अजयला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा  

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.