– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

25 Years of Arshad Warsi आजच्या दिवशी बरोबर २५ वर्षांपूर्वी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. मी १२ वी संपवून पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला ते १९९६ चे ते वर्ष. डोक्यात हवा आणि मनात बरीच सपने असलेल्या या वर्षाची प्रवेशानंतर सहा महिने उलटली आणि ‘तेरे मेरे सपने’ आजच्या दिवशी प्रदर्शित झाला. महाविद्यालयीन जीवनात फर्स्ट डे फर्स्ट शो ची प्रचंड क्रेझ असते. टपोरी बालू च्या भूमिकेतील त्याच्या “आंख मारे ये लडका आंख मारे” या गाण्याची कॉलेजमध्ये प्रचंड क्रेझ होती. असे असले तरी मला मात्र यातील हरिहरन आणि साधना सरगम च्या आवाजातील “कुछ मेरे दिलने कहा” हे जास्त भावलं होतं. असो. मुद्दा हा की हा पहिल्यांदा दिसलेला हा बालू आवडला होता खरा पण खरं सांगायचं तर त्याला फार काही गांभीर्याने घेतलं नव्हतं. सिनेमा संपल्यावर अर्शद वारसी (Actor Arshad Warsi) नावाचा न्यूकमर आहे एवढंच काय ते समजलं.

१९९६ ते २००३ पर्यंत अर्शदचे किमान डझनभर चित्रपट आले असतील पण कबुली द्यायची झाल्यास एवढंच सांगेन की ‘होगी प्यार की जीत’ या अजय देवगण सोबतच्या सिनेमाशिवाय मी एकही पहिला नव्हता आणि बहुधा एकालाही बॉक्स-ऑफिसवर यश सुद्धा मिळाले नव्हते. २००३ च्या अखेरच्या महिन्यात आलेल्या एका सिनेमाने मात्र हा सर्किट कायमचा डोक्याच्या सर्किट मध्ये जाऊन बसला. होय, मुन्नाभाई एमबीबीएस मधला सर्कीट. नायक म्हणून आलेल्या पहिल्या सिनेमानंतर बरोबर ७ वर्षे हा माणूस यशासाठी चाचपडत होता. अंगात सर्व गुण असूनही. पण लहानापासून अंगात भिनलेली लढाऊ वृत्ती इथे कामाला आली. सोबतीला कामी आला प्रचंड जिद्दी स्वभाव, जीवतोड मेहनत करण्याची सवय व सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणीही गॉडफादर नाही, कुठलाही वारसा नाही, आपल्याला टिकायचे असेल तर मेहनतीला, संयमाला आणि चिकाटीला पर्याय नसल्याची त्याला असलेली जाणीव. अर्शद असा का बनला? यामागे पण एक कहाणी आहे.

मुंबईतील एका अतिशय साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या अर्शदचे वडील अर्शद १३-१४ वर्षांचा असतानांच वारले. नाशिकच्या एका बोर्डिंग स्कुलमध्ये अर्शदने कसेबसे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मग शाळेला रामराम ठोकला. अंगात लवचिकता इतकी होती की शाळेत असतांनाच जिम्नॅस्टिक मध्ये नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचला होता. परंतु घरच्या आर्थिक परिस्थिती त्याहूनही जास्त लवचिक होती ..त्यामुळे या पठ्ठ्याने कुठे सेल्समन बनवून दारोदार जाऊन कॉस्मेटिक्स विकल्या.कुठल्याशा फोटो-लॅबमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम… अशी मिळेल ती कामे केली. परंतु अंगातल्या लवचिकतेने अर्शद डान्सकडे खेचला गेला. मुंबईतील अकबर सामी यांचा डान्स ग्रुप जॉईन केला आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद मिळवले. मग स्वतःचा डान्स स्टुडियो सुरु केला. मुंबईतील एका इंग्रजी थिएटर ग्रुपसोबत काम करतांना अर्शदची ओळख भरत दाभोळकरांशी झाली आणि इथेच त्याला पहिला मोठा ब्रेक मिळाला. ‘रूप की रानी चोरो का राजा’ सिनेमाच्या टायटल साँगसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळाली. दरम्यान अमिताभ बच्चन यांची निर्मिती संस्था एबीसीएल त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी नवोदित कलाकारांचा शोध घेत होती. ऑडिशन मध्ये त्वरित सिलेक्ट झालेल्या अर्शदचे तेंव्हा वय होते साधारण २७ वर्षांचे. जया बच्चन यांनी स्वतः थेट अर्शद ची निवड केली होती आणि अशा प्रकारे अर्शदसाठी इंडस्ट्रीचे दरवाजे उघडले गेले होते. अर्शद मध्ये फायटिंग स्पिरीट कुठून आले त्यामागे आहे ही कहाणी.

अर्शदच्या ‘तेरे मेरे सपने’ ते ‘मुन्नाभाई’ या सात वर्षांच्या खडतर काळात त्याला साथ मिळाली त्याच्या पत्नीची. एमटीव्ही ची सुप्रसिद्ध व्हीजे मारिआ गोरेट्टी सोबत अर्शद चे लग्न झाले १९९९ साली. मुन्नाभाई मात्र अर्शदसाठी जणू पुनर्जन्म होता. दोन्ही मुन्नाभाईमधील सर्कीटच्या जागी अर्शद च्या जागी आज दुसऱ्या कुठल्या कलाकाराची आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या सहजतेने, सुंदरतेने आणि अतिशय नैसर्गिकरित्या अर्शद सर्कीट ही व्यक्तिरेखा अक्षरशः जगला आहे. अर्शदची विनोदी सहनायकाची इमेज प्रेक्षकांना आवडतेय हे पाहून निर्माते-दिग्दर्शक मंडळी अर्शद ला त्याच प्रकारच्या रोल्स चे ऑफर देऊ लागले. २००६ आणि २००७ च्या अनुक्रमे ‘गोलमाल’ आणि ‘धमाल’ या दोन फ्रॅन्चायजी अर्शदला मिळण्याचे हेच मुख्य कारण ठरले.

२००३ च्या मुन्नाभाई नंतर २०१३ पर्यंत अर्शद ला भरपूर काम मिळाले, सुपरहिट सिनेमा मिळाले परंतु एखाद दोन अपवाद वगळता सर्व रोल्स कॉमेडीच होते. तेही इतर नायकांसोबत. सोलो जवळपास नाही. करिअर सुरु झाल्याच्या तब्बल १७ वर्षानंतर म्हणजे २०१३ साली अर्शदने केवळ स्वतःच्या खांद्यावर ओझे असलेला पहिला सोलो हिट सिनेमा दिला …तो होता ‘जॉली एलएलबी’. अष्टपैलू अभिनेत्याचे सर्व गुण व प्रतिभा असूनही केवळ एकसारख्या विनोदी भूमिकाच मिळत जाणे व एकट्याच्या नावावर हिट सिनेमा मिळण्यास लागलेला तब्बल १७ वर्षांचा कालखंड हाही एक प्रकारचा संघर्षच नाही तर काय?

खरंतर २००५ सालच्या ‘सेहर’ सारख्या सिनेमांमधून अर्शद ने आपण गंभीर भूमिका सुद्धा किती सहजरित्या करू शकतो हे दाखवून दिले होते तरीही त्याच्या वाटेला विनोदीच भूमिका जास्त आल्या. एकदा एक इमेज बनली की ती स्वतःसाठीच किती घातक ठरते याचे इंडस्ट्रीमधील अशातले उदाहरण म्हणजे अर्शद. असो. नसिरुद्दीन शहा सारख्या कलाकाराने ज्याला ‘ऑल राउंड ऍक्टर’ म्हटले आहे आणि विद्या बालन सारख्या अभिनेत्रीने अर्शद ला ‘अंडर युटिलाईज्ड अभिनेता’ म्हटले तिथे आपण काही वेगळे बोलायची काय गरज?

असो. आज तेरे मेरे सपनेच्या प्रदर्शनाला २५ वर्षे पूर्ण झाली व त्यायोगे अर्शदला सुद्धा. खूप आनंद दिलाय या अभिनेत्याने. पुढेही देतच राहील हा विश्वास आहे. थँक्स अर्शद. ऑल दि बेस्ट. वुई लव्ह यू.

हिंदी सिनेमाच्या ९० च्या दशकावरील इतर लेखांसाठी क्लिक करा

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment