-अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

25 Years of 1997 hindi film Pardes, directed, produced, and co-written by Subhash Ghai. यावर्षी आपण सर्व जण ज्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, अगदी त्याच जोशात २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ साली भारतभर स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत होता. सुवर्ण महोत्सवाच्या या जल्लोषात भर घालणारे गीत त्यावेळी प्रत्येकाच्या ओठावर होते. ज्येष्ठ गीतकार आनंद बक्षी लिखित आणि संगीतकार नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेले ते गीत म्हणजे ‘आय लव्ह माय इंडिया’. 

८० आणि ९० च्या दशकात हिंदी सिनेमाचे शो-मॅन म्हणून ओळखले जाणारे निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या परदेस या सुपरहिट सिनेमाने आज २५ वर्षे पूर्ण केली आहेत. १९९७ या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात १५ ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला म्हणजे ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित परदेस या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळाले होते हे आपण सर्व जण जाणतोच. आज परदेस ला २५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने जाणून घेऊ यात परदेस शी निगडीत काही रंजक गोष्टी: 

१. परदेस हा सुभाष घई यांचा दिग्दर्शक म्हणून १३ वा, शाहरुख खान सोबतचा त्रिमूर्ती नंतर दुसरा आणि संगीतकार नदीम श्रवण यांच्यासोबतचा पहिला चित्रपट होता. 

२. १९८३ च्या हिरो या सिनेमा सोबतच मेरी जंग, कर्मा, राम लखन, सौदागर आणि खलनायक अशा सलग ६ सुपरहिट संगीत दिलेल्या व सुभाषजींच्या फेव्हरेट असलेल्या संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीसोबत काम न करण्याची सुभाषजींची ही पहिलीच वेळ होती. 

३. परदेस पर्यंत लार्जर दॅन लाईफ सिनेमांसाठी ओळखले जाणाऱ्या सुभाषजींनी परदेस ही माझी पहिली अगदी साधी प्रेमकथा असणार आहे हे आधीच घोषित केले होते त्यामुळे लक्ष्मी-प्यारे यांचे भव्यदिव्य संगीत टाळून सुभाषजींना यावेळी रोमँटिक संगीतासाठी ओळखली जाणारी संगीतकार जोडी हवी होती आणि त्यामुळेच नदीम श्रवण यांची वर्णी लागली होती. 

४. सुमधुर संगीत हा परदेस या सिनेमाचा आत्मा होता ज्यासाठी नदीम श्रवण यांना फिल्मफेअर साठी नामांकन सुद्धा मिळाले होते. परदेस च्या यशाच्या काही मुख्य कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे नदीम श्रवण यांचे सुपरहिट संगीत. जहाँ पिया वहां मैं , जरा तसवीर से तू निकलके सामने आ मेरी मेहबुबा, ये दिल दिवाना दिवाना है ये दिल, दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके आणि आय लव्ह माय इंडिया या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. फिल्मफेअर हुकलं पण नदीम श्रवण यांना परदेस साठी स्क्रीन अवॉर्ड मिळाला होता. नदीम श्रवण यांच्या नावाच्या आधी संगीतकार म्हणून सुभाषजींच्या डोक्यात ए आर रेहमान होते पण तारखा आणि बजेट या दोन्ही गोष्टी ना जुळल्याने नदीम श्रवण यांची वर्णी लागली.  

५. माधुरी दीक्षित आणि मनीषा कोईराला या दोघी खरंतर परदेस साठी नायिका म्हणून सुभाषजींच्या फर्स्ट चॉईस होत्या. पण काही कारणाने दोघींसोबत सुभाषजींचे ट्युनिंग बिघडले होते. पेप्सी च्या जाहिरातीत आमिर खान सोबत मॉडेल म्हणून तेंव्हा चमकलेली रितू चौधरी वर सुभाषजींचे लक्ष गेले आणि रितू चौधरी ची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली महिमा या नावाने. सुभाषजींचा असा विश्वास होता की म या अक्षरापासून नाव सुरु होणारी अभिनेत्री त्यांच्यासाठी लकी आहे म्हणून त्यांनी रितू हे नाव बदलून महिमा असे केले. 

६. संगीतकार लक्ष्मी प्यारे यांच्याप्रमाणेच आणखी एक व्यक्ती परदेस द्वारे पहिल्यांदाच सुभाषजींसोबत दिसली नाही ती म्हणजे आपला जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ. सुभाषजी जॅकी ला लकी मानायचे म्हणून अगदी कथानकात जागा नसतांनाही सौदागर मध्ये छोट्याशा रोल साठी का होईना पण जग्गू दादाची वर्णी लागली होती पण परदेस मध्ये मात्र सुभाषजींना जग्गू दादाला खूप इच्छा असूनही कुठलाच रोल देता आला नव्हता. 

७. १९९५ च्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे नंतर एकानंतर एक फ्लॉप सिनेमांची लड लागलेल्या व यशासाठी आसुसलेल्या शाहरुख खान साठी परदेस हा अत्यंत महत्वाचा सिनेमा ठरला. 

८. दिलवाले नंतर परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांमध्ये (एनआरआय) शाहरुख खान नावाची नव्यानेच मोठी क्रेझ निर्माण झाली होती जी आजही आहे. सुभाषजींनी नेमक्या याच गोष्टीचा फायदा उचलला आणि मोठ्या हुशारीने कथानकाची रचना अशा प्रकारे केली की परदेस ने परदेशात विक्रमी कमाईचे नवे उच्चांक स्थापित केले. 

९. रंगीला द्वारे पार्श्वगायनात पदार्पण केलेला गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण च्या गायनाचा सहभाग असलेल्या ‘आय लव्ह माय इंडिया’ या गाण्याने प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण केली होती. त्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव असल्याने गाण्याच्या प्रसिद्धीत अधिक भर पडली. 

१०. एकूण १२ फिल्मफेअर नामांकनं मिळालेल्या परदेस ने ३ फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले. उत्कृष्ट पटकथा म्हणून सुभाष घई, उत्कृष्ट नवोदित कलाकार म्हणून महिमा चौधरी आणि मेरी मेहबुबा गाण्यासाठी उत्कृष्ट गायिका म्हणून अल्का याग्निक. 

११. १९९७ सालच्या सर्वात यशस्वी चित्रपटांच्या यादीत परदेस चौथ्या स्थानावर आहे. दिल तो पागल है, बॉर्डर आणि इश्क नंतर. 

१२. शाहरुख खान परदेस मधील स्वतःचा रोल कमी केल्यामुळे सुभाषजींवर नाराज झाला असल्याची चर्चा प्रदर्शनानंतर ऐकण्यात होती. शाहरुख व सुभाषजी परत कधी कुठल्या चित्रपटासाठी एकत्र आले नाहीत.

१३. परदेस चे नाव आधी ‘गंगा’ ठेवावे असा विचार सुभाषजींचा होता. पण कथानकाचा आशय लक्षात घेऊन नंतर परदेस फायनल झाले. 

तर असा हा परदेस. व्यावसायिक दृष्टीने निर्मिती केलेली असली तरी भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात याने देशभक्तीचे रंग भरण्यात मदतच केली होती. आज २५ वर्षानंतर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना परदेस प्रमाणे व्यावसायिक का होईना पण एकही सिनेमा बॉलिवूड कडून येऊ नये अथवा आय लव्ह माय इंडिया सारखे एकही गाणे गुणगुणण्याचा आनंद रसिकांना मिळू नये हे मोठे दुर्दैवी आहे. त्यासाठी बॉलिवूडमध्ये एखादा तरी शोमॅन उरलाय का याचा शोध घ्यावा लागेल. 

९० च्या दशकावर आधारित हिंदी चित्रपटांच्या इतर लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.