– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

20 Years of Actor Sharman Joshi “कमीने! बाबा को स्कूटर पे लेके आया!?” असे आपल्या मित्रावर ओरडणारा राजू रस्तोगी त्यामागचे कारण कळल्यावर “रँचो मुझे माफ करदे ..मैं डर गया था यार” असे म्हणत जेंव्हा रँचोच्या गळ्यात पडून आपल्या भितीला अश्रूंद्वारे वाट मोकळी करून देतो ..तेंव्हा तुमच्या माझ्यातल्या असंख्य रसिकांना आजही हा सीन इतक्या वेळा बघूनही त्याच्यासोबत रडण्याची इच्छा होते. “टेल मी हाऊ दि इंडक्शन मोटर स्टार्ट्स?” या व्हायरस उर्फ वीरू सहस्रबुद्धे च्या प्रश्नावर त्याने काढलेला मोटरच्या आवाजावर आज १२ वर्षांनंतरही तितकेच खळाळून हसू येते. पण माझ्या मते ‘३ इडियट्स’ मधील त्याचा कळस म्हणावा असा सीन म्हणजे जेंव्हा तो व्हील चेअर वर बसून दिलेल्या कॅम्पस इंटरव्यूह मध्ये भूतकाळात केलेल्या सर्व चुका कबुल करतो. मुलाखत घेणारी मंडळी यावर त्याला ऑफर देतात की “तू फारच फ्रॅंक आहेस, आम्हाला थोडा डिप्लोमॅटिक कँडिडेट हवाय, तू तसा बनू शकलास तर आम्ही तुझा विचार करू शकतो” यावर “दोनो टाँगे तुड़वाकर अपने पैरों पर खड़ा होना सीखा है सर..  बड़ी मुश्किल से आया है ये एटीट्यूड। आप अपनी नौकरी रख लीजिये, मैं अपना एटीट्यूड” असे स्पष्टपणे कबूल करणाऱ्या राजुच्या अक्षरशः प्रेमात पडायला होतं … आज शर्मन ने रंगविलेल्या राजू रस्तोगी ची आठवण यावी यामागे कारणही खास आहे. आज काही त्याचा वाढदिवस नाही तर शर्मन ने आज बॉलिवूडमध्ये नायक म्हणून तब्बल २० वर्षे पूर्ण केली आहेत. आजच्या दिवशी २००१ साली शर्मन चा नायक म्हणून पहिला ‘स्टाईल’ प्रदर्शित झाला होता.

खरंतर १९९९ च्या शबाना आझमी यांच्या ‘गॉडमदर’ मधील एका छोट्या भूमिकेने शर्मनचा रुपेरी दुनियेत प्रवेश झाला होता पण नायक म्हणून त्याची एंट्री झाली ती ‘स्टाईल’ने. स्टाईल तेंव्हा कसा काय चालला किंवा एन चंद्रा सारख्या दिग्दर्शकाने असला टुकार विषय का निवडला यावर काथ्याकूट करण्यापेक्षा या सिनेमाने बॉलीवूडला शर्मन सारखा प्रतिभाशाली अभिनेता दिला हे जास्त महत्वाचे. 

शर्मनचे वडील गुजराती रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक अरविंद जोशी.  म्हणजे अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळालेल्या शर्मनने वयाच्या २० व्या वर्षी ‘गॉडमदर’ स्वीकारायच्या आधी गुजराती रंगभूमीवर आपला अभिनय प्रवास सुरु केला होता.  २००१ सालच्या ‘स्टाईल’ या आपल्या सुपरहिट पदार्पणानंतर मात्र अडखळलेल्या शर्मनच्या करिअरसाठी २००६ हे वर्ष लकी ठरले. या वर्षी शर्मनने  ‘रंग दे बसंती’ मधील सुखी आणि आणि ‘गोलमाल’ मधील लक्ष्मण या भूमिकांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अशातच अर्शद वारसी या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केली ज्यावर मी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. योगायोग असा की अर्शद आणि शर्मन दोघेही अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कंपनीने ९६ साली घेतलेल्या टॅलेंट हंट मध्ये सापडलेले हिरे आहेत.

पण मला अर्शद आणि शर्मन या दोन्ही अभिनेत्यांबद्दल कायम असे वाटते की या दोघांचाही अभिनयाचा आवाका प्रचंड असूनही या दोघांनीही स्वतःला बऱ्याच अंशी विनोदी भूमिकांमध्ये बंदिस्त करून घेतले. का कुणास ठाऊक? असे ठरवून केले नसेलही कदाचित पण त्यांची मुख्य ओळख अशीच बनली आहे जी त्यांच्या प्रतिभेवर अतिशय अन्यायकारक आहे. तुम्ही शर्मन चा ‘फरारी कि सवारी’ मधील संयमीत, शांत आणि समंजस बाप बघा, ‘अल्ला के बंदे’ मधील माफीया विजय कांबळे बघा,  किंवा ‘लाईफ इन अ मेट्रो’ मधील कॉल सेंटरवरील कॉर्पोरेट राहुल .. या भूमिका पाहिल्यावर शर्मनची स्केल लक्षात येते. ‘३ इडियट्स ‘आणि ‘रंग दे बसंती’ मध्ये सुद्धा शर्मन च्या अभिनयाच्या विविध छटा रसिकांना दिसल्या पण त्यातील विनोदी छटा जास्त लक्षात राहिली.

 वाट्याला येईल ती भूमिका न स्विकारता शर्मन वर्षाला एक किंवा दोनच चित्रपट करतो आणि आपल्या भूमिकेला जमेल तितका न्याय देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. गोलमालच्या नंतरच्या सिरीजमध्ये शर्मन दिसला नाही कारण निर्मात्यांसोबत मानधनावरून सुरु असलेल्या त्याच्या वाटाघाटी फसल्या. ‘फरारी की सवारी’ नंतर सुरु झालेला शर्मनचा बॅड पॅच अजूनही सुरूच आहे. गेल्या ९ वर्षात शर्मन ने जवळपास डझनभर चित्रपट केले, भूमिकांमध्येही वैविध्य दाखवले पण ‘हेट स्टोरी-३’ व ‘मिशन मंगल’ मधील एका छोट्याशा भूमिकेचा अपवाद वगळता शर्मन ला या ९ वर्षात यशाची चव चाखायला नाही मिळाली. दुर्दैवाने या वर्षी मार्च मध्ये दुसऱ्या लाटेच्या गोंधळात आलेला शर्मन चा ‘मेरा फौजी कॉलिंग’ हा दर्जेदार सिनेमा दुर्लक्षित राहिला. गेल्या वर्षी शर्मन ‘बारीश’ नावाच्या वेब सिरीजमध्येही झळकला. २०१७ ला त्याने आपले पहिले प्रेम म्हणजे रंगभूमीला परत जवळ केले होते. ‘राजू राजा राम और मैं’  व ‘मैं और तुम’ या दोन हिंदी नाटकांमुळे शर्मन मध्यंतरी बऱ्यापैकी हिंदी रंगभूमीवर व्यस्त होता. यातील  ‘राजू राजा राम और मैं’ हे नाटक म्हणजे आपल्या मराठी ‘सही रे सही’ चे हिंदी रूपांतर ज्यात शर्मन च्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हिंदी सिनेमात येण्यापूर्वी शर्मन ने असेच आपले प्रचंड गाजलेले मराठी नाटक ‘ऑल दि बेस्ट’ च्या गुजराती रूपांतरात बहिऱ्याचा रोल केला होता जो रसिकांना प्रचंड आवडला होता. 

बहुतांश रसिकांना माहीत आहे की शर्मन हिंदी सिनेमाचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांचा जावई आहे. प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा आणि शर्मन यांचे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. २००० साली दोघांचे लग्न झाले व या मेड फॉर इच आदर जोडप्यास दोन जुळी मुले व एक मुलगी आहे. 

‘फरारी की सवारी’ मध्ये शर्मन चा एक सीन बहुतांश रसिकांना खूप आवडतो. आपल्या मुलाला स्कुटरवर घेऊन जाणाऱ्या शर्मन कडून चुकीने सिग्नल तोडला जातो. शर्मन ने रंगविलेला रुस्तुम बेहराम देबू प्रामाणिक इतका असतो कि त्या सिग्नलवर कुठलाही ट्रॅफिक हवालदार नसतानाही दुसऱ्या सिग्नलवर जाऊन तेथील हवालदाराला स्वतःच्या झालेल्या चुकीची पावती फाडण्याची विनंती तो करतो. यावर तो हवालदार त्याला “अरे तुझे किसीने देखा नही ना क्या फरक पडता है?” असे म्हणतो. यावर शर्मन ने रंगविलेला देबू उत्तर देतो ” देखा ना, मेरे बेटे ने देखा ना। जो देखेगा वही सीखेगा ना. सिग्नल तोड़ा तो फाइन तो भरना चाहिए ना” शर्मन आपल्या अभिनयाशी सुद्धा गेल्या २० वर्षात असाच प्रामाणिक राहिला आहे. जरी त्याला काही फ्लॉप्स सिनेमांची पावती फाडावी लागली तरी! शर्मनला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. वुई लव्ह यु शर्मन!

हिंदी सिनेमाच्या ९० च्या दशकावरील इतर लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment