आज प्रख्यात विनोदी व चरित्र अभिनेते देवेन वर्मा यांचा स्मृतिदिन. देवेन वर्मा हे दादामुनी अर्थात अशोक कुमार यांचे जावई होते. दादामुनींची दुसरी कन्या रूपा गांगुली यांचे पती. दुःखद योग असा दादामुनींची तिसरी कन्या व विनोदी अभिनेत्री प्रीती गांगुली हिचा सुद्धा आजच्या दिवशीच स्मृतिदिन असतो. देवेन वर्मा आपल्या अभिनयासाठी व त्यातही विनोदी भूमिकांसाठी रसिकांच्या स्मरणात आहेत. पण अभिनेत्या सोबतच देवेन वर्मा हे निर्माता-दिग्दर्शक पण होते याबद्दल फार कमी चर्चा होते. निर्माता म्हणून त्यांनी यकीन (धर्मेंद्र, शर्मिला टागोर, १९६९), नादान (नवीन निश्चल, आशा पारेख, १९७१), बडा कबुतर (अशोक कुमार, १९७३), बेशरम (अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, १९७८), चटपटी (१९७८) व दाना पानी (मिथुन चक्रवर्ती, पद्मिनी कोल्हापुरे, १९८९) या सिनेमांची निर्मिती केली होती ज्यात नादान, बडा कबुतर, बेशरम व दाना पानी चे दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले होते.
‘नवरत्न फिल्म्स’ नावाची त्यांची निर्मिती संस्था होती. वरील पैकी ‘यकीन’ व ‘बेशरम’ वगळता इतर सिनेमांना व्यावसायिक यश काही लाभले नाही. देवेन यांना विनोदी अभिनेता म्हणून ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ व ‘अंगूर’ या सिनेमातील भूमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.