सुश्रुत भागवतचा ८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी! 

“कागर” सारखा सामाजिक, राजकीय विषयावरच्या दमदार चित्रपटाची निर्मिती केलेल्या उदाहरणार्थ निर्मित ह्या निर्मिती संस्थेतर्फे आता “८ दोन ७५” फक्त इच्छाशक्ती हवी ! या अनोख्या चित्रपटाची निर्मिती होत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आलं. 
विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते हे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी खुमासदार संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. मुंबई टाइम, अ पेईंग घोस्ट आणि असेही एकदा व्हावे असे उत्तमोत्तम चित्रपट सुश्रुत भागवत यांनी दिग्दर्शित केले आहेत. “८ दोन ७५ ‘ फक्त इच्छाशक्ती हवी !’ ” असं आगळंवेगळं नाव असल्यानं ह्या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.
अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार अवधूत गुप्ते ही जोडी ह्या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळत आहे.
चित्रपटातून महत्त्वाचा विषय अतिशय रंजक पद्धतीनं मांडला जाणार आहे. त्यामुळे आताच त्याबद्दल सांगणं योग्य ठरणार नाही. तसंच अन्य तपशीलही टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितलं.
Website | + posts

Leave a comment