– अजिंक्य उजळंबकर
आयुष्य “जगण्याचं” तत्वज्ञान इतकं पोटतिडकीनं ..इतकं मनापासून.. आणि तितक्याच सहजतेनं सांगणारा ‘आनंद’ शिवाय दुसरा हिंदी सिनेमा नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज (१२ मार्च) आनंदला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणाल तर या ५ दशकांमध्ये नवीन ५ पिढ्या जन्मल्या व जुन्या ५ पिढ्या मरण पावल्या आहेत परंतु प्रत्येक पिढीला, ‘मृत्यू शय्येवर पडून जगावं कसं’ हे ‘आनंद’ ने इतकं सहज सोप्या भाषेत समजावलं की ‘आनंद’ केवळ एक व्यावसायिक सिनेमा न राहता हिंदी सिनेसृष्टीने जगाला दिलेली एक अजरामर कलाकृती बनली. “बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही” हा गुलजार लिखित संवाद आयुष्यातील कुठल्याही प्रकारच्या नैराश्याला दूर करण्यास तेंव्हाही पुरेसा होता, आजही आहे आणि नेहमीच राहील.

१९५७ साली दिलीप-कुमार व किशोर कुमार अभिनीत ‘मुसाफिर’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकणारे ह्रिषीकेश मुखर्जी यांची आनंद ही १४ वी कलाकृती होती. ह्रिषीदांनी एका मुलाखतीत म्हटले होते की ‘प्रत्येक दिग्दर्शकामधील कलात्मकता त्याच्या १०-१५ चित्रपटानंतर कमी होत जाते अथवा संपते’. परंतु ह्रिषीदा त्याला अपवाद होते. ह्रिषीदा व राज कपूर यांची घट्ट मैत्री होती. जीवश्च-कंठश्च मित्र. नर्गिस सोडून गेल्यावर राज कपूर यांना त्या दुःखातून बाहेर काढणारे नाव म्हणजे ह्रिषीदा. ‘मुसाफिर’ हा पहिला चित्रपट सपशेल अयशस्वी ठरल्यानंतरही ‘अनाडी’ साठी निर्मात्यांकडे ह्रिषीदांच्या नावाचा आग्रह त्यांचा मित्र राज कपूरनेच धरला होता. दोघांची मैत्री इतकी की राज कपूर एकदा गंभीर असतांना ह्रिषीदांना जबरदस्त नैराश्याने ग्रासले होते. आपला जिवलग मित्र हे जग सोडून जातो कि काय अशी सतत त्यांना भीती वाटत होती. ही मैत्री ह्रिषीदांचा दिग्दर्शक म्हणून असलेल्या अनाडी या दुसऱ्या सिनेमापासून होती ज्यात राज कपूर प्रमुख भूमिकेत होते. राज कपूर ह्रिषीदांना प्रेमाने बाबू मोशाय म्हणत व ह्रिषीदांना राज कपूर यांचे ‘चार्ली चॅप्लिन स्टाईल दुःखाची किनार असतांनाही हसत हसत जगण्याचे तत्वज्ञान’ मनापासून आवडे. या सर्वाचा परिणाम असा झाला की राज कपूर आजारी पडल्यावर ह्रिषीदांना त्यांचा आनंद सापडला जो की खऱ्या आयुष्यातील त्यांचा जिवलग मित्र राज कपूर होता. सिनेमाच्या सुरुवातीलाच ‘आनंद’ हा चित्रपट मुंबईच्या जनतेला व राज कपूर यांना समर्पित असल्याचे त्यामुळेच वाचायला मिळते.

आनंद खरंतर ६० च्या दशकातच बनणार होता. दक्षिणेतील एका निर्मात्याने यासाठी ह्रिषीदांना विनंतीही केली होती. परंतु ती त्यांनी नाकारली कारण ‘त्या निर्मात्याला आनंद मध्ये खूपच व्यवसायिकता हवी होती जी मला मान्य नव्हती.’ असे ह्रिषीदांनी एका मुलाखतीत यावर बोलतांना सांगितले होते. आनंदच्या पटकथेवर काम करण्यास ह्रिषीदांना साथ मिळाली ती गुलजार, बिमल दत्ता व डी.एन. मुखर्जी या तिघांची. पटकथा लिहून झाल्यावर आनंद व बाबू मोशाय अर्थात भास्कर बॅनर्जी या दोन प्रमुख भूमिकांसाठी सर्वात आधी ज्या नावांचा विचार झाला ते होते किशोर कुमार व मेहमूद. परंतु झाले असे कि ह्रिषीदा किशोरदांच्या घरी याकरिता गेले असता किशोरदांच्या गेटकिपरचा जरा गैरसमज झाला. किशोरदांनी गेटकिपरला ‘एका बंगाली माणसाला (ज्यांच्यासोबत त्यांचे काही आर्थिक भांडण होते) अजिबात घरात घुसू नको देऊस’ असे बजावून ठेवले होते. गेटकिपरने ह्रिषीदांना तोच बंगाली समजून दारावरूनच परत पाठवले. ह्रिषीदांना याचा मोठा राग आला व त्यामुळे आनंदची भूमिका किशोरदांना मिळाली नाही. मग मेहमूदचा विचारही मागे पडला. मग राज कपूर यांचे बंधू शशी कपूर यांच्या नावावरही विचार मंथन झाले. अखेरीस १९७१ साली हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार म्हणून ज्या नावाची देशभरात जोरदार हवा होती अशा काकाच्या म्हणजेच राजेश खन्नाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. १९६९ साली प्रदर्शित ‘सात हिंदुस्तानी’ या आपल्या पहिल्या चित्रपटानंतर जवळपास दोन वर्षे अमिताभ काम शोधत असतांनाच त्यांना आनंदच्या बाबू मोशाय च्या भूमिकेसाठी ह्रिषीदांनी संधी दिली ज्याचे सोने करीत अमिताभने उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा, आपल्या करिअरमधील पहिला फिल्मफेअर सन्मान मिळविला. एका सुपरस्टारने दुसऱ्या सुपरस्टारची हिंदी सिनेमाला करून दिलेली ओळख या अर्थाने सुद्धा ‘आनंद’ कडे बघितले जाते.

आनंदचे प्रमुख वैशिट्य होते ते म्हणजे त्याचे भावस्पर्शी संवाद. आजही आनंद आठवला की आधी आठवतात त्याचे एकाहून एक संवाद व त्याचे सर्व श्रेय जाते गुलजार यांच्या प्रतिभेला. त्यात बिरेन त्रिपाठी यांचीही मदत त्यांना लाभली होती. दुसऱ्या क्षणाचा भरवसा नसलेले मानवी आयुष्य, त्यात आपल्याला भेटणारे लोकं मग ते आपले कुटुंबीय असोत, नातेवाईक, मित्र वा अनोळखी लोकंया सर्वांना समाविष्ट करून आयुष्य कसे जगावे याचे मनोवैज्ञानिक पद्धतीने मांडलेले तत्वज्ञान आनंदच्या पटकथेचा मूळ गाभा होता. परंतु हा विषय प्रेक्षकांना कुठेही डोईजड ना होऊ देता तो तितक्याच सोप्या भाषेत कसा मांडता येईल यासाठी दिग्दर्शक ह्रिषीदा यांनी स्वतः लिहिलेल्या कथेला पटकथेत रुपांतरीत करतांना खूप मेहनत घेतली. इथे कुठल्या एका ठरावीक सीनचा उल्लेख खूप सुंदर म्हणून करणे खरोखर शक्य नाही कारण प्रत्येक सीन अविस्मरणीय आहे. असे सीन्स पाहायचे नसतात तर ते अनुभवायचे असतात.

कथा-पटकथाकार व दिग्दर्शक यांचे अपेक्षित म्हणणे भावस्पर्शी संवादाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या ह्रदयापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य केले ते गुलजार यांच्या लेखणीने. पण यासाठी तितकाच महत्वाचा ठरला तो काकाचा जबरदस्त अभिनय. राजेश खन्ना यांच्या करिअरमधील एक माईलस्टोन भूमिका म्हणजे आनंद. आपले आयुष्य केवळ काही महिन्यांपुरतेच शिल्लक आहे, आपल्याला असाध्य रोग झाला आहे, ज्याला डॉक्टरी भाषेत ‘लिंफोसर्कोमा ऑफ इंटरस्टाईन’ असे काहीतरी म्हणतात, हे सर्व माहीत असूनही हातात असलेले दिवस कसे आनंदात घालवता येतील व त्यातही इतरांच्या चेहऱ्यावर कसे हास्य आणता येईल हे सांगणारा आनंद, राजेश खन्नाने असा काही रंगविला की बस्स. चित्रपटभर हसणारा …हसविणारा आनंद अखेरीस हे जग सोडून जातो तेंव्हा त्याच्या सोबत असलेला व त्याच्या जाण्याने उद्विग्न झालेला बाबू मोशाय जेंव्हा त्यावर चिडून म्हणतो, ” बोलो, बाते करो मुझसे, छे महीनेसे बकबक करके मेरा सर खा गए हो तुम, बाते करो मुझसे…बाते करो मुझसे”, तेंव्हा चित्रपटगृहातील एकना एक प्रेक्षक आपले अश्रू तेंव्हाही थांबवू शकला नव्हता व आज ५० वर्षांनंतरही तसे करणे त्याला जमलेले नाही..कधी जमणारही नाही.
आनंदची बाबू मोशाय सोबत ओळख करून देणारे महाराष्ट्रीयन दाम्पत्य…डॉ प्रकाश कुलकर्णी व त्यांची पत्नी सुमन या भूमिकेत रमेश व सीमा देव यांचा अभिनयही अगदी सहज व सुंदर होता. सोबतच ललिता पवार या अजून एका मराठी नावाने रंगविलेली नर्स डिसुझा सुद्धा आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. कथेत फारसे काम नसले तरी बाबू मोशाय भास्करचे प्रेम असलेली रेणू, सुमिता संन्याल या अभिनेत्रीने खूपच संयमित साकारली होती. ह्रिषीदा बंगाली असले तरी हा सिनेमा त्यांनी राज कपूर सोबतच सामान्य मुंबईकरांनाही समर्पित केला होता म्हणून त्यातील पात्रे सुद्धा सामान्य मुंबईकर वाटतील अशीच होती.

आनंदच्या यशात ज्यांचा वाटा खूप मोठा होता असे आणखी एक व तेही बंगाली नाव म्हणजे संगीत दिग्दर्शक सलील चौधरी. बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे सलील चौधरी. आनंदच्या आधी ह्रिषीदांनी सलील चौधरींसोबत काम केलेले नव्हते. ‘आनंदचे संगीत दिग्दर्शन तुम्ही करा’ अशी विनंती ह्रिषीदांनी लता मंगेशकर यांना करून पहिली परंतु लता दीदींनी केवळ गायनासाठी होकार दिला. मग लतादीदींसोबत मन्ना डे व मुकेश या दोघांना घेऊन सलील चौधरी यांनी दिलेल्या मेलडीयस म्युझिकने कानसेनांना अगदी तृप्त करून टाकले. केवळ चारच गाणी होती. गुलजार आणि नवोदित गीतकार योगेश यांनी लिहिलेली. ‘जिंदगी कैसी है पहेली हाए’ (मन्ना डे), ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ (मुकेश व लता मंगेशकर दोघांच्याही आवाजात), ‘मैंने तेरे लिएही सात रंगके सपने चुने’ (मुकेश), ‘ना जिया लागेना’ (लता मंगेशकर) या चार गाण्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनात कायमचे घर केले आहे. खरंतर राजेश खन्ना यांचा त्याकाळचा आवाज किशोर कुमार होता. याच्या एकच वर्ष आधी आलेला व राजेश खन्ना यांच्या आनंद च्या गंभीर भूमिकेशी मिळता-जुळता असलेला ‘सफर’ सुपरहिट झाला होता, ज्यात ‘जिंदगी का सफर है ये कैसा सफर’ अथवा ‘जीवन से भरी तेरी आँखें’ ही गाणी किशोरदांनी गायली होती. परंतु तरीही वर उल्लेख केलेल्या ह्रिषीदा-किशोर प्रसंगाच्या गैरसमजुतीने म्हणा किंवा इतर काही कारणाने … सलील चौधरी यांनी संधी दिली ती मुकेश आणि मन्ना डे यांना. तेंव्हा ऑड वाटत असेल तरी आज ती गाणी ऐकतांना घेतलेला निर्णय योग्यच वाटतो.
ह्रिषीदांना आपल्या कारकिर्दीत तब्बल सात वेळा राष्ट्रीय उत्कृष्ट चित्रपटासाठी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. आनंद त्यातले शेवटचे नाव. याआधी मुसाफिर, अनाडी, अनुराधा, अनुपमा, आशीर्वाद व सत्यकाम साठी ह्रिषीदा सन्मानित झाले होते. आनंदला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यात उत्कृष्ट चित्रपट, अभिनेता (राजेश खन्ना), सहाय्यक अभिनेता (अमिताभ बच्चन), संवाद (गुलजार) व कथा व संकलनाचे दोन पुरस्कार (ह्रिषीकेश मुखर्जी) यांचा समावेश होता. योगायोग असा की ज्या फिल्मफेअर समारंभात आनंदने इतके पुरस्कार जिंकले त्याच समारंभात, त्यावर्षीचा उत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला राज कपूर यांना. मेरा नाम जोकर साठी. म्हणजे ह्रिषीदांनी आपल्या या मित्राला आनंद खऱ्या अर्थाने समर्पित केल्यासारखे झाले.

आनंदने ‘एक ताडासारखा उंच माणूस’ एवढीच ओळख असलेल्या अमिताभ नामक इसमाला एका दिवसातून स्टार बनवले. होय. एका रात्रीतून नव्हे तर एका दिवसातून. त्याचा किस्सा असा की अमिताभ आनंदच्या प्रदर्शनाच्या दिवशी सकाळी इर्ला या मुंबईतील विले-पारले जवळ असलेल्या वस्तीतील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेला होता. त्याकडे सकाळी कोणाचेच लक्ष गेले नाही. संध्याकाळी त्याच पंपावर पुन्हा तो पेट्रोल भरण्यास आला तेंव्हा मात्र रसिकांनी त्यास ओळखण्यास सुरुवात केली होती. या प्रसंगाची पुष्टी खुद्द अमिताभनेही ट्विटर वर केली आहे. म्हणून एका दिवसात झालेला स्टार.
कोणाला आनंदचे संवाद भावतात तर कोणाला त्याचे संगीत, कोणाला काकाचा अभिनय व त्याची बाबू मोशाय म्हणायची स्टाईल आवडते तर कोणाला गाण्यांचे बोल. कित्येकांनी आनंदची पारायणे केली आहेत. आवडीचे कारण जरी वेगवेगळे असले तरी या ना त्या कारणाने आनंद अजून रसिकांच्या मनात जिवंत आहे.
त्यातील बाबू मोशाय अमिताभच्या अखेरच्या संवादाप्रमाणे “आनंद मरा नही …आनंद मरते नही…”
थँक्स ह्रिषीदा, थँक्स गुलजार..थँक्स सलील चौधरी..थँक्स काका..थँक्स बाबू मोशाय बिग बी
