त्या वर्षी, आजच्या दिवशी.. चमको ची चाळीशी! 40 years of Chashme Buddoor

– अजिंक्य उजळंबकर

ज्या लोकांनी ७० च्या दशका अखेरीस अथवा ८० च्या दशकाच्या सुरुवातीला आपले कॉलेज लाईफ जगलंय त्यांना मी खरंच भाग्यवान समजतो. म्हणजे १९८०-८१ ला ज्यांनी दहावी संपवून महाविद्यालयीन जीवन सुरु केले ते लोकं. तसं तर प्रत्येकाला आपल्याच कॉलेज लाईफचे दिवस छान होते असे वाटते पण तरीही या दशकाची मजा काही औरच असावी असे मला वाटते. ७० च्या दशकाच्या सुरुवातीला  तरुणाईचा  हिरो राजेश खन्ना होता. ७० चे दशक संपत आले तेंव्हा रुपेरी पडदा केवळ एकाच व्यक्तीने व्यापला  होता तो म्हणजे ‘अमिताभ बच्चन’.  पण अमिताभ चॉकलेटी इमेजमध्ये कधीच नसल्याने याकाळातील कॉलेज गोइंग प्रेमी युगलांना अमिताभ आवडत जरी असला तरी स्वतःची प्रेमकहाणी रिलेट करण्यासाठी इतर हिरोज  पण शोधावे लागायचे. जितेंद्र, ऋषी कपूर हे त्यांच्या समोर असलेले ऑप्शन्स होते. या पिढीचा मला खरंतर खूप हेवा वाटतो. कारण अर्थातच बिग बी. म्हणजे बघाना दहावीची, बारावीची किंवा ग्रॅज्युएशनची परीक्षा संपली आहे आणि ती संपल्यावर  थिएटरात मस्त अमिताभचा नवा कोरा सिनेमा लागलाय.  सुख म्हणजे नक्की काय असतं? हेच असतं. 

त्या कालखंडात एकीकडे अमिताभच्या चित्रपटांचा झंझावात असायचा. म्हणजे एकीकडे ज्यात सर्व हिट  मसाला घटक असलेले सिनेमे व दुसरीकडे त्यासमोर अगदीच साधे कथानक, तितकीच साधी मांडणी व हिरो-हिरोईनचा टॅग नसलेले कलाकार घेऊन सई परांजपेसारखी प्रतिभाशाली दिग्दर्शक मंडळी आपले चित्रपट घेऊन यायची. सई यांच्या यादीतील  स्पर्श, चष्मे बद्दूर, कथा हि त्यातली काही प्रमुख चित्रपटांची नावे. खरंतर हे तीनही चित्रपट मस्तच जमलेत पण  त्यात १९८१ साली आलेला चष्मे बद्दूर (Chashme Buddoor) हा  त्या दशकातल्या कॉलेज गोइंग जनरेशनला जाम आवडलेला व व्यावसायिक यश मिळालेला सिनेमा. (40 years of Chashme Buddoor)

माझ्या जनरेशनने ( म्हणजे जिने ९५-९६ साली महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला) हा सिनेमा नंतर टीव्ही वर पहिला. Love at first sight वाला हा सिनेमा. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याचे साधेपण आणि खरेपण. कथानकाचे हेच साधेपण आणि खरेपण १००% कॅरी करणारे दीप्ती नवल व फारूक शेख सारखे कलाकार.  तोंडी लावायला पण या सिनेमात फिल्मी काही नव्हते. असे असूनही व्यावसायिक यश मिळवता येते हे या चित्रपटाने सिद्ध केलं हि बाब महत्वाची. कारण १९८१ हे वर्ष तद्दन व्यावसायिक व बिग बजेट चित्रपटांच्या यशाचे होते.  त्यात चष्मे बद्दूरचे बजेट काहीच नाही. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातल्या मुलीसारखी दिसणारी साधी दीप्ती नवल व तसाच काहीसा फारूक शेख हे एकदमच त्या पिढीला स्वतःशी रिलेट होत होतं. आपल्यातलं वाटत होतं.

chashme buddoor 1981 film

दिल्लीत शिकण्यासाठी रूममेट्स म्हणून राहत असलेले तीन मित्र. त्यातील सिद्धार्थ (फारुख शेख) हा एकदम साधा, सिन्सिअर, सरळमार्गी व अभ्यासात हुशार. पण इतर दोघे ओमी (राकेश बेदी) व जोमो (रवी बासवानी) त्याच्या अगदी उलट. वृत्तीने वाईट नसतात पण एक नंबरचे टपोरी व सतत मुलींच्या म्हणजे शिकार (हा शब्द सिनेमात या दोघांच्या तोंडी वापरला गेलाय) च्या शोधात. आता या दोघांना एके दिवशी नेहा (दीप्ती नवल) दिसते,  दोघेही तिच्या घरी जाऊन ट्राय करून येतात पण सपाटून फेल होतात.  नेहा सेल्सगर्ल म्हणून काम करत असतांना तिची आणि सिद्धार्थची ओळख व त्याचे रूपांतर प्रेमात होते. आता हि गोष्ट ओमी व जोमोला कळल्यावरही दोघे उगाच या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करतात. पण सिद्धार्थची नंतर बिघडलेली परिस्थिती बघून त्यांना आपली चूक लक्षात येते व ही दोघे पुन्हा यांचे पॅच-अपही करून देतात.

chashme buddoor 1981 film

या सिनेमाची ओळख मानला जाणारा,  सर्वांनाच मनापासून आवडलेला व गालावर तितकेच निरागस हास्य आणणाराया चित्रपटातला सिन म्हणजे दि फेमस “चमको सीन”. ‘बार बार लगातार, खुशबूदार, झागवाला, चमको’. या सिनबद्दल थोडेसे-  वॉशिंग पावडर चमको ची ‘डोअर-टू-डोअर’ मार्केटिंग करणाऱ्या सेल्सगर्लच्या भूमिकेत दीप्ती नवलने तितक्याच प्रामाणिकतेने म्हटलेला हा संवाद धमाल मजा आणतो. यादृश्यात चमकोची ट्रायल घेण्यासाठी बादलीत  टॉवेल भिजवला जातो. ५ मिनिटे थांबायचे असते. कधी कुणा मुलीशी न बोललेला सिद्धार्थ म्हणजे फारूक शेखचे एक्स्प्रेशन दिग्दर्शक सई परांजपेने यावेळी मस्त टिपले आहेत. रूममध्ये तीन मित्रांच्या तीन भिंती आहेत. प्रत्येकावर त्याच्या आवडीनुसार पोस्टर्स, स्टिकर्स चिटकवले आहेत. जोमोच्या भिंतीवर नुसते सिनेमाच्या हिरोईन्सचे पोस्टर्स.  नेहा या भिंती न्याहाळत असतांना सिद्धार्थ तिला सांगतो “हि माझी भिंत नाहीए, माझी ती आहे महात्मा गांधींची” ५ मिनिटांचा वेळ जाण्यासाठी म्हणून सिद्धार्थ रेकॉर्ड प्लेयरवर गाणे लावतो तर गाणे लागते “हम तुम एक कमरेमें बंद हो और चाबीखो जाये”  मग दोघांच्याही चेहऱ्यावर अतिशय अवघडल्यासारखे भाव. सिद्धार्थ काही न बोलता हळूच रूमचा बंद असलेला दरवाजा उघडतो. नेहा मनातून हसते. ५ मिनिटे झाल्यावर नेहा बादलीतला टॉवेल काढून सिद्धार्थला म्हणते कितना साफ हो गया है ना? यावर तो उत्तरतो- “हां वो तो मैने आपको लौंड्री से धुला हुवा दिया था. ऐसे कैसे आपको गंधा टॉवेल दे देता?”  किती साधे संवाद आहेत! चित्रपटभर असेच आहेत. स्वतः सई परांजपे यांनीच संवाद लेखनही केले आहे.

फारूक शेख – दीप्ती नवल यांचा हॉटेलमधील टुटीफ्रुटीचा सीन, राकेश बेदी व रवी बासवानी पहिल्यांदा दीप्ती नवलच्या  घरात जातात ते सीन्स व त्यांचा खोटा वृत्तांत फारुख शेख यास सांगतात ते सीन्स,  हे सर्व सीन्स निखळ करमणूक करण्यात कमालीचे यशस्वी झालेत. सिगारेट स्मोकिंग हा या तीन मित्रांचा कॉमन पण उधारीचा शौक. लल्लन मियाँ  (सईद जाफरी) यांची टपरी म्हणजे त्यांचा सुट्टा पॉईंट. उधारी वसुलीसाठी तगादा करणाऱ्या लल्लन मियाँसोबत या तिघांचे मैत्रीपूर्ण नाते असते. सईद जाफ़रीजींनी ही भूमिका अतिशय दिलखुलासरित्या सादर केली आहे व ज्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारात त्यांना नॉमिनेशन सुद्धा मिळाले होते.  फारुख शेख व दीप्ती नवल यांनी भूमिका इतक्या सहजतेने रंगविल्या आहेत कि त्या दोघांशिवाय इतर कुणी कलाकारांचा विचारही आपण करू शकत नाही. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री इतकी छान असायची कि त्यामुळे पुढेही दोघे जवळपास ९-१० चित्रपटांत सोबत झळकले.  राकेश बेदी व रवी बासवानी या दोघांनीही आपल्या भूमिका झकास साकारल्या आहेत. राकेश बेदीचा चौथा व रवी बासवानीचा  तर हा पहिलाच सिनेमा! पण दोघांच्याही अभिनयातील सहजता बघून कुणाचा विश्वास बसणार नाही.  दोघेही थेट फिल्मफेअरसाठी नॉमिनेट झाले होते.

“कहांसे आये बदरा” व “काली घोडी द्वार खडी” ही दोन गीते म्हणजे या चित्रपटाची आणखी एक भक्कम बाजू. राजकमल यांच्या संगीत दिग्दर्शनात इंदू जैन लिखित सहा गाण्यांपैकी ही दोन गीतेच तरुणाईला जास्त आवडली.  दोन्ही गीतांमधला येसूदास व हेमंतीशुक्ला यांचा स्वर तर क्या कहने! आज ही गीते ऑल टाइम क्लासिक हिट्स मध्ये मोडतात.  दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद या तिन्ही आघाड्या सई परांजपे यांनीच सांभाळल्या होत्या. मजेत मजा चित्रपटात एके ठिकाणी त्यासालची रुपेरी पडद्यावरील सर्वात हॉट जोडी अमिताभ-रेखा दोन मिनिटांसाठी पाहुणे कलाकार म्हणून दर्शन देतात. त्यासालची यासाठी कि या दोघांचा बहुचर्चित  सिलसिला प्रदर्शित झाला तो याच साली. चष्मे बद्दूरची बहादुरी तरी बघा.  त्या वर्षी कुठल्या कुठल्या मोठ्या सिनेमांना याने टक्कर दिली त्यातील काही नावे अशी- क्रांती, नसीब, लावारीस, लव्ह स्टोरी, एक दुजे के लिए, कालिया, याराना, रॉकी, सिलसिला इत्यादी. असे सर्व दिग्गज समोर असूनही फिल्मफेअर पुरस्कारात ५ कॅटॅगिरीत नॉमिनेशन मिळविण्यात चष्मे बद्दूर यशस्वी ठरला होता. बेस्ट डायरेक्टर (सई परांजपे), बेस्ट मुव्ही, बेस्ट ऍक्टर इन कॉमिक रोल (राकेश बेदी व रवी बासवानी दोघेही), बेस्ट ऍक्टर इन सपोर्टींग रोल (सईद जाफरी) या त्या पाच कॅटॅगिरीज.

तर असा हा चष्मे बद्दूर. साधा. निखळ. निरागस, स्वच्छ, खुशबूदार, झागवाला. बार बार लगातार बघावा वाटणारा. नावा प्रमाणे कोणाचीही नजर ना लागो असा.

chashme buddoor 1981 film

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment