गायक सोनू निगम बद्दल आपणास हे माहीत आहे का?

हिंदी सिनेसृष्टीत गेल्या ३० वर्षांपासून आपल्या सुमधुर गायनाने रसिक श्रोत्यांना भुलविणारा, जादुई व मखमली आवाजाचा मालक, गायक सोनू निगम. सुरुवातीला प्रति-रफी म्हणून ज्याच्या आवाजाकडे बघितले जायचे त्या सोनुने नंतर विविध भाषांतील असंख्य गीतांनी स्वतःच्या आवाजाला वेगळेपण प्राप्त करून दिले. केवळ बॉलिवुडचाच नव्हे तर भारताचा सुप्रसिद्ध गायक अशी मोठी ओळख आज जागतिक पटलावर व संगीत विश्वात सोनू निगम याची आहे. सोनू निगम बद्दल काही खास गोष्टी आज आपण जाणून घेऊ यात-
१. १९७३ साली जन्मलेल्या सोनुने वयाच्या चौथ्या वर्षी, गायक वडील अगम कुमार निगम यांच्यासोबत स्टेजवर गाण्याची सुरुवात केली.
२. प्रसिद्ध शास्त्रीय गायक ‘उस्ताद गुलाम मुस्तफा खान’ यांच्याकडून सोनुने गाण्याचे प्रशिक्षण घेतले.
३. सोनुने आतापर्यंत १४ हुन अधिक भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.
४. सोनूचे पहिले चित्रपट गीत ‘जानम’ या १९९० सालच्या चित्रपटासाठी त्याने गायले होते पण काही कारणामुळे ते रिलीज झाले नाही.
५. सोनूचे रिलीज झालेले पहिले चित्रपट गीत ठरले १९९२ सालचे ‘आजा मेरी जान’ चित्रपटातील ‘ओ आसमां वाले’
६. याच वर्षी सोनूचा पहिला अल्बम सुद्धा बाजारात आला….’रफी कि यादें’
७. ‘१९४२-ए लव्ह स्टोरी’ चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे कुमार सानू यांनी म्हणायच्या आधी सोनू कडून गाऊन घ्यायची संगीतकार आर.डी. बर्मन यांची इच्छा होती.
८. १९९५ या एकाच वर्षी ‘झी-टीव्ही’ चा पहिला सिंगिंग रिऍलिटी शो ‘सारेगामा’ चा होस्ट व सोनूचे सर्वात जास्त गाजलेले गाणे ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ यामुळे सोनूची लोकप्रियता कमालीची वाढली.
९. १९९५ प्रमाणेच १९९७ साली सुद्धा ‘संदेसे आते है’ (बॉर्डर) व ‘ये दिल दिवाना’ (परदेस) या गाण्यांनी सोनूला अनेक पुरस्कार व लोकप्रियतेत वाढ मिळवून दिली.
१०. १९९९ साली त्याच्या पहिल्या पॉप अल्बम ‘दिवाना’ ने रेकॉर्डब्रेक विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले.
११. २००२ साली ‘साथिया’ चित्रपटातील शीर्षक गीतासाठी सोनूला ‘पहिला फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला.
१२. २००३ साली सोनूला त्याच्या करिअरचा ‘पहिला राष्ट्रीय पुरस्कार’ व सोबत ‘दुसरा फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला तो ‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी.
१३. सोनुने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक व संस्था यांच्यासोबत गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१४. आपल्या अभिनयाच्या वेडापायी सोनुने लहानपणी चाईल्ड आर्टिस्ट म्हणून १९८३ साली बेताब, कामचोर, हमसे है जमाना आदी चित्रपटात काम केले होते. नंतर नायक म्हणूनही जानी दुश्मन, काश आप हमारे होते, लव्ह इन नेपाल या चित्रपटांमध्ये सोनू झळकला आहे.
१५. २००२ साली सोनूचा विवाह मधुरिमा मिश्रा हिच्यासोबत झाला. त्यांच्या मुलाचे नाव आहे नेवान.
Website | + posts

Leave a comment