हिंदी सिनेसृष्टीच्या पहिल्या घराण्याची करिश्माई वारसदार .. करिष्मा कपूर

चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या घराण्यातले सदस्य असण्याचे जसे फायदे असतात तितकेच मोठे त्यामुळे निर्माण होणारे आव्हानही असते. ते आव्हान असते पूर्वजांनी प्रस्थापित केलेल्या मानका (स्टॅंडर्ड) पर्यंत स्वतःला सिद्ध करण्याचे. कारण प्रेक्षकांच्या मुळातच तशा अपेक्षाही असतात. शोमॅन राज कपूर यांची नात म्हणून तुमच्याकडे जर प्रेक्षक बघणार असतील तर साहजिकच त्या अपेक्षाही काही चुकीच्या ठरवता येत नाहीत. पण अशा सर्व अपेक्षांना पुरून उरलेले नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर.

 

१९९१ ला ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाने झालेल्या जोरदार पदार्पणानंतर २००१ पर्यंत म्हणजे जवळपास १० वर्षे करिश्मा चे करिअर फॉर्मात होते. २००१ च्या बॉबी देओल सोबत आलेल्या सुपरहिट ‘आशिक’ नंतर करिश्माचा वावर थोडा कमी झाला. पण या दहा वर्षात करिश्मा ने एक नॅशनल अवॉर्ड (दिल तो पागल है), चार फिल्मफेअर अवॉर्ड (राजा हिंदुस्तानी, फिजा, दिल तो पागल है व झुबेदा) जिंकत रसिकांच्या मनावर अगदी राज्य केले. ‘बीवी नं.१’ व ‘शक्ती’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी तिला फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.
करिश्माच्या अभिनयातील सहजता व तिच्या व्यक्तिमत्वात असलेला उत्साह व ऊर्जा हे तिचे प्लस पॉईंट आहेत. वडिल रणधीर कपूर यांच्या इच्छेविरुध्द व आई बबिता हिच्या पूर्ण पाठिंब्याने व प्रोत्साहनामुळे करिश्मा चित्रपटसृष्टीत आली. अनाडी, जिगर, राजा बाबू, कुली नं. १, साजन चाले ससुराल या सुरुवातीच्या काही व्यावसायिक यशा नंतर करिश्माने राजा हिंदुस्तानी, जीत, दिल तो पागल है, बीवी नं. १, फिझा, झुबेदा, रिश्ते अशा चित्रपटातून अर्थपूर्ण भूमिका साकारल्या.

‘खुद्दार’ या चित्रपटातल्या तिच्या ‘सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले’ किंवा ‘राजा बाबू’ च्या ‘सरकाईलो खटिया जाडा लगे’ या तिच्या गाण्यांनी १९९४ साली चांगलाच धुमाकुळ घातला होता. खुद्दार सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटातील हिरोईन ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ‘झुबेदा’ सारख्या अर्थपूर्ण दर्जेदार चित्रपटातील अभिनेत्री हा प्रवास करिश्मा ने आपल्या कपूर आडनावाच्या भरवशावर नव्हे तर स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केलाय.
Website | + posts

Leave a comment