स्मिताजींचे सहकारी, ज्येष्ठ निवेदक व नवरंग रुपेरी दीपोत्सव विशेषांकाचे अतिथी संपादक प्रदीप भिडे यांचा नवरंग रुपेरी २०१५ च्या अंकातील लेख आज खास नवरंगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. स्मिताजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
१९७२ चा सुमार असावा. वरळीच्या बीडीडी चाळीच्या समोर असणार्या १००० फूट उंचीच्या मनोर्याच्या वळचणीला आम्ही जन्माला येत होतो. सरिता होती, हरिष होता, सिद्धार्थ होता; पण ही मंडळी हिंदी आणि इंग्लिश भाषेचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली होती. त्यांच्याबरोबर आम्हीपण होतो, अनंता होता, चारू होती, छोटुकली भक्ती होती, ज्योत्स्ना होती आणि दोन स्मिता होत्या. त्यातली एक भावुक होती तर दुसरी लय भारी. ‘गोईंग ईअर्स’ असा इंग्रजीतला शब्दप्रयोग करतो आपण कधी कधी अशा जुन्या दिवसांसाठी. खूप धमाल करायचो आम्ही. एकमेकांच्या फिरक्या घ्यायचो. टॉवरच्या खाली भटाचा चहाचा ठेला होता. काचेच्या बाटल्यातलं शेव-पापडीचं मिक्स्चर आणि ग्लुकोज बिस्किटांबरोबर चहा पीत पीत आम्ही मोठे होत होतो. एखाद्याला प्रश्न पडेल इतक्या मोठ्या कुटुंबात एवढ्या मुली कशा? पण होत्या खर्या. त्या काळात त्यांचीच वट होती. खूप दादागिरी करायच्या आमच्या या मैत्रिणी. आपण एखाद्या कुटुंबात जन्माला येतो. खूप हुंदडतो, भांडतो आणि ते करता करता खूप काही शिकतो आणि मग एक दिवस आपलं नवं आयुष्य घडवण्यासाठी बाहेर झेप घेतो. असंही काहीसं होत होतं. तुमच्या एव्हाना लक्षात आलंच असेल. मी वरळीच्या, ग्लॅक्सो नामक औषध कंपनीच्या मागे उभ्या असलेल्या दूरदर्शनच्या मनोर्याबद्दल सांगतोय. तो कृष्णधवल कार्यक्रमांचा काळ होता. टीव्ही रंगीत होण्याच्या आधीचा काळ.
१९७२ च्या ऑक्टोबरमध्ये हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही लोकांच्या घरात दिसू लागला. भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किरपेकर यांचे कृष्णधवल चेहेरे घरोघरी बातम्या घेऊन जाऊ लागले. हरिष भिमाणी, सरिता सेठी, कुमुद मिरानी ही मंडळी हिंदी तर डॉली ठाकूर, सिद्धार्थ काक, लुकू संन्याल इंग्रजी बातम्या वाचताना दिसू लागले. आपण म्हणतो की, ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांमधून नटनट्या जास्त सुंदर दिसायच्या. टीव्हीवरचे चेहरेदेखील त्याला अपवाद नव्हते.
भक्ती आणि ज्योत्स्नाच्या जोडीला चारुशीला पटवर्धन, स्मिता पाटील आणि स्मिाता तळवळकर देखील पुढील एक-दोन वर्षांत टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागल्या. बातम्यातले चेहरे चित्रपटातल्या नटनट्यांसारखे रसिकांच्या हृदयावर विराजमान झाले. माझीपण १९७५ च्या जानेवारीमध्ये या सुंदर्यांच्या गर्दीत एन्ट्री झाली. माझ्याआधी वर्षभर, आमचे दाढीवाले आणि गुरुस्थानी असणारे अनंत भावे बातम्या वाचू लागले आणि हा हा म्हणता लोकप्रिय झाले. बातम्यांच्या पुढेमागे चालणार्या कार्यक्रमांमध्ये सुहासिनी मूळगावकरांचा ‘सुंदर माझे घर’ आणि केशव केळकरांचा ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, आकाशानंद यांचा ‘ज्ञानदीप’, विनायक चासकरांची नाटके, विनय आपटे यांचा ‘युवदर्शन’ कार्यक्रम हेदेखील त्यानंतरच्या काळात लोकप्रिय होत गेले. तर मी तुम्हाला सांगत होतो, माझ्या ‘लय भारी’ मैत्रिणीविषयी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सगळ्या सुंदर्यांमधली माझी ‘लय भारी’ मैत्रीण म्हणजे स्मिता तळवळकर. पूर्वाश्रमीची स्मिता गोविलकर. तळवळकर जिमनॅशियाच्या अविनाश तळवळकरशी तिचा विवाह होऊन गेलेला होता आणि सुंदर मोकळं हास्य असणारी स्मिता जिमनॅशियमवाल्या तळवळकरांच्या कुटुंबात गेल्यासारखीच दिसायची!
आपल्या खणखणीत आवाजात, धिप्पाड स्मिता अशा काही टेचात बातम्या वाचायची की, माझ्यासारखा नवखा वृत्तनिवेदक अवाक् होऊन पाहातच राहायचा. टेन्शन किंवा भीती यांसारख्या गोष्टी तिला घाबरून पळून जात असणार इतकी ती बिनधास्त होती. मी बातम्या वाचायला लागलो तेव्हा 22 वर्षांचा होतो. तसा किरकोळ शरीरयष्टीचाच होतो. स्मिता अचानक पाठीवर थाप मारून ‘काय रे, कुठल्या विचारात आहेस’ असे विचारल्यावर मी हेलपाटत भांबावून तिच्याकडे पाहायचो. मग एक गडगडाटी हास्य आणि ‘चल, चहा प्यायला जाऊ’ असा हुकूमच ती सोडायची. बरोबर कधी कधी भारती आचरेकर असायची, भारतकुमार राऊत असायचा, तर कधी ज्योत्स्ना किरपेकर. चहा पिता पिता खिदळणं आणि गॉसिप्सचं गप्पाष्टक असा तो कार्यक्रम असायचा. मी मात्र थोडा गप्पगप्प असायचो; पण चहा पिता पिता माझ्या या ‘लय भारी’ मैत्रिणीकडे बघत राहायचो. थक्क होऊन बघत राहायचो म्हणूया खरे तर. स्मिताच्या बोलण्यातून तिला खूप काही तरी करायचंय असं जाणवायचं. तसं त्यावेळी आम्हा सर्वांनाच काही वेगळं करावं याची उर्मी होती.
दुसरी स्मिता म्हणजे स्मिता पाटील. ती केव्हाच चित्रपटातून कामे करायला लागली होती. नंतरच्या काळात ज्योत्स्ना किरपेकरनेही मनोज कुमार निर्मिती साईबाबांवरील चित्रपटात काम करून नाव मिळवलं. भक्ती बर्वे तर मुळातली नाटकातलीच. तीदेखील अनेक नाटकांतून कामं करीत होती. भक्ती बर्वे सोडली तर ही सगळी वृत्तनिवेदक मंडळी दूरदर्शनच्या पूर्णवेळ नोकरीत नव्हती. मीपण ई मर्क या कंपनीत नोकरी करीत होतो. ‘प्रासंगिक करार’ स्वरूपाचंच वृत्तनिवेदकाचं काम होतं. त्यामुळे केवळ वृत्तनिवेदन न करता काही वेगळं करावं असं साहजिकच प्रत्येकाला वाटतं होतं. स्मिता तळवळकर त्याला या दिवशी स्मिता पाटील या आमच्या एकेकाळच्या सहकारी वृत्तनिवेदिकेचं आणि अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झालं. स्मिता पाटीलच्या निधनाची बातमी त्या दिवशी स्मिता तळवळकरनंच दिली. त्याचं तिला मनस्वी दु:ख झाल्याचं मला अजूनही स्मरतंय. असो.
स्मिता तळवळकरची चित्रपटविश्वात धडपड सुरू होती, त्यावेळी मी हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी करीत होतो आणि योगायोगानं खारमधील स्मिताच्या घराजवळच मला कंपनीच्या फलॅटमध्ये राहण्याचा योग आला. तिला मी ते सांगताच तिनं माझ्या पाठीत धपाटा मारत मला तिच्या घरी जेवायला बोलावलं. मी माझ्या पत्नीबरोबर स्मिताच्या घरी गेलो. तिचे पती अविनाश यांनी आमचं प्रेमानं स्वागत केलं आणि मग आम्हा चौघांच्या गप्पा खूप रंगल्या. हे बातम्या वाचणं थांबवून पूर्णवेळ नाट्यसिनेक्षेत्रात काम करण्याचा तिचा मनसुबा तिनं बोलून दाखवल्याचं मला आजही आठवतंय आणि त्याप्रमाणं तिनं ते करून दाखवलं.
स्मिता तळवळकरच्या गाडीनं त्याचदरम्यान रूळ बदलून आपला वेगळा कलाप्रवास सुरू केला. मी आधी म्हटलं त्याप्रमाणं एका घरात जन्मलेली मुलं पुढं मोठी होऊन आपापलं विश्व उभं करण्यासाठी घरटं सोडून जातात. स्मितानं तशीच गरूडझेप घेतली.
स्मिताचा त्यानंतरचा प्रवास स्तिमित करणारा होता. ‘कळत-नकळत’ या तिनं निर्मिलेल्या पहिल्या चित्रपटांतूनच मी निर्मिती म्हणून वेगळी वाट चोखाळू इच्छिते असं तिनं दाखवून दिलं. केवळ मनोरंजन नाही तर आशयगर्भ असं काही देण्याचा तिचा प्रयत्न राहिला. एक हसरी, उत्साही आणि मदतीला तत्पर असणारी स्मिता असा लौकिक तिनं मिळवला. ‘चौकट राजा’, ‘तू तिथं मी’, ‘सवत माझी लाडकी’, ‘आनंदाचे झाड’, ‘सातच्या आत घरात…’ किती किती म्हणून चित्रपटांची नावं घ्यावीत! नाट्यविश्वांतही तिची कारकिर्द कौतुकास्पद ठरली. नाटकवाल्यांच्या गोतावळ्यात ती रमून जायची. टीव्हीचं माहेर सोडून मनोरंजन विश्वातल्या सासरी गेल्यानंतर मात्र तिच्या माझ्या भेटी कमी होत गेल्या. माझ्या खाजगी कंपनीतल्या नोकरीच्या धबडग्यात भेटी होणं संपलं; पण तिच्या चित्रपटाच्या-नाटकाच्या जाहिराती पाहिल्या की, मन कौतुकानं भरून जायचं. छान रमलीय आणि तिथल्या रंगीबेरंगी संसारातही गुंतून गेलीय स्मिता, असंच वाटायच. नाही म्हणायला कधीमधी अवचित भेटी व्हायच्याही, नाही असं नाही. दोन-तीन वेळा पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलमध्ये अरे तिकडे कुठे बसतोयस. मी इकडे आहे इथे येऊन बस. असा हुकूम स्मितानं सोडल्याचं मला आठवतंय आणि नंतर डोसा खाता खाता झालेल्या गप्पा मी विसरूच शकत नाही.
मग नंतर कानावर आलं की, तिचा कॅन्सरशी संघर्ष सुरू झाला; पण त्या दुर्धर रोगाशी ती मोठ्या हिमतीनं लढा देतेय, हे तिनं गेल्या वर्षीच्या अखेरीस अचानक झालेल्या भेटीत मला सांगितलं; पण दैवगतीपुढे माणसाचं काही चालत नाही म्हणतात. ६ ऑगस्टला स्मिता तळवळकर यांचे निधन ही बातमी टीव्हीवर पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. वरळी टीव्हीच्या मनोर्याच्या वळचणीला जन्मलेल्या माझ्या सर्व संख्यांमधल्या माझ्या मलय भारीफ मैत्रिणीनं आयुष्याशी लढत लढत एक्झिट घेतली.
जगण्यावर समरसून प्रेम करणार्या स्मृतीला लक्ष लक्ष प्रणाम!
