गोविंदा-डेव्हीड धवन…बॉक्स ऑफिसवर नंबर-१ ठरलेली जोडी!

डेव्हीड धवन. ९० च्या दशकातील मसाला व्यावसायिक सिनेमा दिग्दर्शकांमधील आघाडीचे नाव. कॉमेडी हा त्यांचा हुकुमी एक्का. आज डेव्हीडजींचा वाढदिवस. डेव्हीडजींचे खरे नाव आहे राजिंदर धवन. मूळचे लुधियाना, पंजाबचे. अगरतला (त्रिपुरा) येथे पंजाबी कुटुंबात जन्मलेले डेव्हीड यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मात्र कानपूर येथे झाले. डेव्हीड यांचे वडील बँकेत नौकरीला असल्याने व त्यांची कानपुर येथे बदली झाल्याने धवन कुटुंबियांना अगरतला येथून कानपूरला शिफ्ट व्हावे लागले होते. त्यांच्या शेजारी एक ख्रिश्चन कुटुंब रहायचे जे राजिंदर ला लाडाने डेव्हीड नावाने संबोधित करत. पुढे जाऊन जेंव्हा राजिंदर धवन यांनी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला तेंव्हा त्यांनी आपले नाव बदलून डेव्हीड धवन असे केले, ज्या नावाने नंतर बॉलिवूडमध्ये यशाचा झेंडा रोवला.

दिग्दर्शक म्हणून डेव्हीडजींनी आजपर्यंत ४३ सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. गोविंदा सोबत त्यांची जोडी गाजली. ४३ पैकी गोविंदा-डेव्हीड धवन जोडीचे यात १७ चित्रपट आहेत. या जोडीची सुरुवात झाली ‘ताकतवर’ (१९८९) या डेव्हीडजींच्या पहिल्या चित्रपटाने. २००९ साली आलेला ‘डू नॉट डिस्टर्ब’ हा गोविंदा सोबत डेव्हीडजींनी केलेला आजपर्यंतचा शेवटचा चित्रपट आहे. म्हणजे बरोबर २० वर्षात १७ चित्रपट देणारी ही हिंदी सिनेमातील एकमेव अभिनेता-दिग्दर्शक जोडी ठरावी. १७ सिनेमांपैकी एखाद-दोन ऍव्हरेज चाललेले सिनेमांचे अपवाद वगळता इतर सर्व चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या कमालीचे यशस्वी ठरलेले आहेत. या चित्रपटांची नावे आहेत- ताकतवर, स्वर्ग, शोला और शबनम, आँखें, राजा बाबू, कुली नंबर-१, साजन चले ससुराल, बनारसी बाबू, दीवाना मस्ताना, हीरो नंबर-१, बड़े मियाँ छोटे मियाँ, हसीना मान जायेगी, कुंवारा, जोड़ी नंबर-१, एक और एक ग्यारह, पार्टनर व डू नॉट डिस्टर्ब.
सिनेमाच्या व्यवसायाच्या भाषेत ज्याला मास अपील (म्हणजेच विशेषकरून पिट्यातल्या प्रेक्षकांना आवडणारे) असे म्हणतात ती वरील सर्वच चित्रपटांना होती. अशा प्रकारची मास अपील ७० व ८० च्या दशकात प्रकाश मेहरा व मनमोहन देसाई यांच्या सिनेमांना असायची व या दोन दिग्दर्शकांची अशीच हिट जोडी तेंव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमवेत जमली होती.
Website | + posts

Leave a comment