महानायक अमिताभ बच्चन @ 79

— डॉ. राजू पाटोदकर
————————————–
महानायक अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर हा वाढदिवस. ते वयाचे ७८ वर्ष पूर्ण करून ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा… हॅपी बर्थडे सर….
————————————–
चंदेरी दुनियेच्या झगमगाटात अनेक तरुण देशाच्या कानाकोपऱ्यातून आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबापुरीत येतात. अगदी त्यातील काहीच यात आपले कार्य कर्तुत्व सिद्ध करतात त्यातीलच एक भाग्यशाली म्हणजे अमिताभ बच्चन..
**अमिताभ एक दंतकथा**
डॉ. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन या दांम्पत्याच्या पोटी ११ ऑक्टोबर १९४२ ला अलाहाबादच्या कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये जन्मलेले अमिताभ बच्चन म्हणजे एक दंतकथाच… डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी एक ठिकाणी असे सांगितले आहे की, माझ्या मुलांची नावे माझे मित्र झा यांनी अमिताभ यांच्यासाठी इन्कलाब राय व अजिताभ यांच्यासाठी आझाद राय असे सुचवले होते कारण ऑगस्ट क्रांती नंतर अमिताभ आणि भारत स्वातंत्र्यानंतर अजिताभ जन्मले. अमिताभ बच्चनचे मुळनाव ‘इन्कलाब’ मात्र कविवर्य सुमित्रानंदन पंत यांनी डॉ. हरिवंशराय यांना अमिताभ म्हणजे न संपणाऱ्या प्रकाश असे नाव सूचित केले आणि त्यांनी अमिताभ हे नाव स्वीकारले. मुन्ना हे त्यांचे टोपण नाव आई-वडील त्यांना याच नावाने बोलावत असत. डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ यांना लहानपणी एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता की, “अमित मनासारखं घडलं तर चांगलं पण मनासारखं नाही घडलं तर ते अधिक चांगलं” पुढे हा मंत्र अमिताभ यांनी जपला.
बॉलीवूड प्रवेशाचा संघर्ष अमिताभ यांनाही चुकला नाही. कठोर परिश्रमानंतर त्यांना एक चित्रपट मिळाला. आणि ७ नोव्हेंबर १९६९ रोजी सात हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांच्या सिने कारकिर्दीला नुकतीच ५१ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपल्या अर्धशतकाच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांनी साचेबद्ध भारतीय चित्रपट सृष्टीला एका नवीन बदलाच्या उंबरठ्यावर घेऊन जाण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांनी आपला सहज अभिनय, प्रभावी संवाद आणि वस्तुनिष्ठ भूमिकांमुळे इतर नायकांपेक्षा हिंदी चित्रपटावर अधिक प्रभावी ठसा उमटविला.
कोणताही खरा कलावंत हा तत्कालीन परिस्थितीतून समोर येत असतो आणि त्या परिस्थितीचे त्याला भान ठेवावे लागते. अमिताभ बच्चन यांनी अशाच प्रकारच्या सामाजिक वास्तवाचे भान ठेवल्यामुळे ते कष्टकरी, कामगार, त्याचप्रमाणे बेकार, संतप्त युवकांचे प्रतिनिधी म्हणून तत्कालीन चित्रपटातून आपणास दिसले. त्यांनी त्याकाळी साकारलेला अँग्री यंग मॅन हा केवळ कृत्रिम वा तकलादू नसून तो सभोवतालच्या जीवनाचा प्रतिनिधी आहे असे वाटले.
अमिताभ बच्चन यांची चित्रपटातील कारकीर्द १९७३ नंतरच्या काळात हळूहळू मार्गक्रमण करत उच्च शिखरावर पोहोचली. त्यांनी आपल्या स्वयंप्रज्ञेने या काळात विविध चित्रपटातून प्रभावी भूमिका करून आपले अढळ स्थान निर्माण केले. सभोवतीच्या समाजातील जिवंत प्रश्नांचे भान ठेवून संतप्त तरुणांची मते चित्रपटातून मांडली आणि त्यामुळेच ती युवकांना, तत्कालीन लोकांना भावली. मध्यमवर्गाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपली लोकप्रियता संपादन केली.
आपल्याला माहीतच आहे की, १९७५ मध्ये भारतात आणीबाणी आली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीसाठी आंदोलन सुरू झाले त्यातून व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी युवापिढी ही जीवनाच्या विविध क्षेत्रात खंबीरपणे उभी राहू लागली. अशाच असंतोषाने ग्रासलेल्या संतप्त युवा पिढीचे प्रभावी नेतृत्व रूपेरी पडद्यावर साकारण्याचे श्रेय अमिताभ बच्चन यांना जाते. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या नव्या पिढीच्या आशाआकांक्षा मांडताना त्यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली. जंजीर, दिवार, कालीया, कालापत्थर, शोले, लावारिस, अग्निपथ या सारख्या दमदार चित्रपटांतून त्यांनी पारंपरिक साचेबद्ध केलेला साचेबद्धतेला धक्का दिला. प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा आदी मातब्बर निर्मात्यांनी त्यांना तशी संधी दिली आणि अमिताभ बच्चन यांनी या संधीचे सोने केले.
**अष्टावधानी अमिताभ**
अभिनय, संवाद कौशल्य व कलात्मक प्रभावांचा विचार करताना असे लक्षात येते की, अमिताभ बच्चन यांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित केले अगदी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी नाटकात भाग घेऊन रंगभूमीची प्राथमिक ओळख करून घेतली होती. पुढे त्यांनी शब्द आणि उच्चार यावर हुकूमत मिळवली. आई वडील यांच्या प्रभावाने ते कला व साहित्यात रस घेऊ लागले. त्यातून त्यांच्या स्वतंत्र संवादशैलीचा उदय झाला असे म्हणता येईल. मुख्य म्हणजे आपल्या अभिव्यक्ती मध्ये त्यांनी कृत्रिमतेचा स्पर्श कधी होऊ दिला नाही. कुठलाही कृत्रिम पलायनवाद त्यांनी आपल्या चित्रपटातून कधीही पुरस्कृत केला नाही. अगदी सहज, सुलभ, सुसंवादी अभिनयातून सामाजिक वास्तव मांडण्यावर भर दिला.
जनतेच्या सुखदुःखाचे समरस होणारा नायक ही अमिताभ बच्चन यांची रास्त भूमिका आहे, आणि ती मुळातच इतरांपेक्षा वेगळी वाटते. त्यांच्या निवडक चित्रपटांचा अभ्यास केला असता हे अधिक स्पष्ट होते की, शोषित पीडित माणसाचे दुःख अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटातून मांडले. त्या दुःखाची त्यांनी जाहिरात केली नाही तर त्यावर विजय कसा मिळवायचा, त्यासाठी संघर्ष कसा करायचा हे देखील दाखवून दिले.
**अडीअडचणींवर मात**
आपणास माहीतच आहे की, सध्या संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करत आहे. अगदी लहान थोर सर्व स्तरावरील मंडळी स्वयंतेने या कोरोनाच्या विरुद्ध लढत आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील कोरोनावर मात करून विजय मिळवला. कोट्यावधी चाहत्यांसाठी तो मोठा दिलासा ठरला. अडीअडचणींवर मात करणे, हा त्यांचा स्वभाव गुण. त्यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक अडीअडचणींवर समर्थपणे मात केली. आरंभीच्या काळातील चित्रपट प्रवेशासाठी करावा लागणारा संघर्ष, कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेला अपघात पुढे राजकारणात आलेले अपयश, व्यवसायात मध्ये एबीसीएल कार्पोरेशनमध्ये त्यांना आलेली खोट, अशाप्रकारच्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न व मेहनत घेतली. मोठा संघर्ष केला. काही चित्रपटातील भूमिकांसाठी केलेल्या तडजोडी या सर्व पाहता त्यांनी आपले अपयश सुद्धा खिलाडू वृत्तीने स्वीकारल्याचे दिसून येते.अपयशाने खचून न जाता त्यावर मात करण्यात त्यांना यश आले. ही एक फार मोठी जमेची बाजू. अमिताभ बच्चन यांचे खरे यश हे अपयश पचविण्यातून दिसून येते. आपल्या वडिलांनी लहानपणी दिलेला कानमंत्र त्यांनी आयुष्यभर जपला निश्चितच त्याचा फायदा त्यांना होत आहे.वैयक्तिक जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात आणि प्रकृतीची चिंता या तीनही बाबतीत त्यांना अनेक वेळा पडती बाजू स्विकारावी लागली परंतु ते कधीही खचून गेले नाहीत. नैतिक मूल्यांच्या दृष्टीने त्यांनी तडजोड न करता संघर्षातून यशाचा मार्ग प्रखर केला. अगदी छोट्या पडद्यावरील भूमिकांत कष्ट करून त्यांनी आपल्यासमोर असलेल्या कर्जाचा डोंगर सहजपणे दूर केला आणि स्वतःमधील कलावंत जिवंत ठेवून स्वच्छ,नैतिक चारित्र्याला अधिक दिप्तीमान करून यशाचे सर्वोच्च शिखर गाठले.
**अँग्री ओल्ड मॅन**
कालोघात वाढत्या वयाचा विचार करून अमिताभ बच्चन यांनी काही वेगळ्या भूमिका स्वीकारल्या. साठीनंतर वृद्धावस्थेत झुकत असतानासुद्धा आपल्यातील कलावंत जिवंत ठेवला. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विविध माध्यमातून स्वीकारले आहे, ही एक महत्त्वाची बाजू. चित्रपट असो, केबीसी मालिका असो की अन्य जाहिराती, अमिताभ बच्चन यांची स्वतंत्र शैली आहे आणि या शैलीमुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांच्या समकालीन नायकांना जे जमलं नाही, ते त्यांनी सिद्ध करून दाखविले. तसेच सामाजिक संदेश असो की संस्कृती ज्ञानवर्धन असो त्यांनी विविध माध्यमांत काम करून आपला रचनात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. ही बाब अधोरेखित करण्यासारखीच आहे. कलात्मक अभिव्यक्तीतून सामाजिक जबाबदारीचे तत्व अनुसरत कलात्मक चित्रपट असो की जनसेवा जाहिराती असो अथवा कोणतेही समाज माध्यम असो त्यातील त्यांचे काम, त्यांचा हेतू निर्लेप लोकशिक्षणाचा आहे. शतकाच्या पलीकडे डोकावण्याची सामर्थ्य एक कलावंत या नात्याने त्यांच्यात आहे, म्हणूनच त्यांना वैश्विक महत्त्व प्राप्त झाले हे विसरता येणार नाही.
अमिताभ बच्चन यांनी बदलत्या काळाचा वेध घेऊन नव्या जीवनाची चाहूल ओळखली. त्यांनी जाहिराती प्रमाणेच केबीसी सारख्या मालिकांतून काम केले. छोट्या पडद्याचे महत्त्व जाणले आणि त्यावर आपला विलक्षण प्रभाव टाकला. हजरजबाबीपणा चतुराई व वस्तुनिष्ठता यांच्यावर भर देऊन त्यांनी आपली पावले विचारपूर्वक टाकली. असेही म्हणता येईल की, छोट्या पडद्याचे २१ व्या शतकातील महत्त्व जेवढे त्यांना कळले तेवढे महत्त्व अन्य कोणत्या नटाला कळले नाही.अगदी आजही आपण त्यांच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील जाहिराती पाहतो. यात पल्स पोलिओ सारखी प्रभावी जाहिरात सुद्धा त्यांनी या छोट्या पडद्याच्या माध्यमातून केली आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचले. काळाची पावले ओळखून त्याचा वेध घेणे हा एक महत्त्वाचा गुण अमिताभ बच्चन यांच्यात दिसतो कदाचित तो त्यांचा एक वेगळेपणा आहे.
एकूणच या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असे म्हणता येईल की, आपल्या चित्रपट सृष्टीवर प्रमुख्याने हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रभाव टाकणाऱ्या भारतीय महानायकांपैकी श्री. अमिताभ बच्चन हे एक प्रमुख आहेत.
**अमिताभ बच्चन आणि पीएच.डी.**
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेण्याचा योग पत्रकारितेत असताना आला होता. २ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांच्या प्रतिक्षा या बंगल्यावर जाऊन त्यांची मुलाखत घेतली. माझ्यासोबत यावेळी छायाचित्रकार सुरेश देशमाने होते.( सुरेश देशमाने हे सध्याचे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सिनेमॅटोग्राफर आहेत) मुलाखत घेताना व त्यानंतर अमिताभ बच्चन या नावाने मला गुंफून ठेवले. काहीही झाले तरी आपण या महान व्यक्ती वर निश्चितच पीएचडी करायची हा निश्चय त्या दिवशी केला आणि मास कम्युनिकेशन मध्ये मी अमिताभ बच्चन यांच्यावर “श्री.अमिताभ बच्चन चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद: एक चिकित्सक अभ्यास.” (१९७५ ते २००५) या विषयावर पीएचडी केली.
त्या अनुषंगाने बरीच पुस्तके वाचली. तसेच त्यांचे सर्वच चित्रपट पाहिले. निवडक ३० चित्रपटांचा अभ्यास केला. त्यांच्यासोबत काम केलेल्या कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. या क्षेत्रातील मान्यवरांकडून माहिती मिळवली. पीएचडी साठी आवश्यक ती प्रश्नावली तयार केली,त्या आधारे अनुमान, निष्कर्ष काढले. या सर्वांच्या आधारे श्री.अमिताभ बच्चन यांच्या बद्दल थोडीफार वेगळी माहिती देऊ शकलो. लवकरच या शोधनिबंधावर मराठी इंग्रजी व हिंदी या तीनही भाषेत पुस्तक प्रकाशित करीत आहे.
raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment